आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकांगी शिक्षण : सर्जनतेचा अभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकआजच्या शिक्षणावरचे आक्षेप मांडताना कृष्णमूर्ती म्हणतात : ‘‘एखादे विशिष्ट तंत्र हस्तगत करणे एवढाच अर्थ शिक्षणाला उरला आहे. ही शिक्षण व्यवस्था फक्त विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञताच बहाल करते. शिक्षणातून विशिष्ट क्षेत्रातील कर्तबदारी असलेली माणसे निर्माण होतील, पण त्यांच्या जीवनात सर्जनशीलतेचा अभाव राहील. शेकडो मुलांनी गजबजून गेलेल्या या शाळांमधून कारकून व्यापारी दलाल उद्योगपती अशी उथळ प्रवृत्तीची माणसेच निर्माण होतात. या माणसांनी आपापल्या क्षेत्रात तांत्रिक कौशल्य हस्तगत केलेले असेल पण त्याचा उपयोग काय... जिच्या व्यक्तिमत्वात सुसंवाद निर्माण झाला आहे अशीच व्यक्ती जगाची आशा आहे. अशा व्यक्ती गर्दी जमवून साचेबंद शिक्षणाची खैरात जिथे केली जाते अशा शाळांमधून निर्माण होऊ शकत नाही. ’’
कृष्णमूर्तींचे हे विवेचन आजच्या स्पेशलायझेशनच्या युगात आपल्या गैरसोयीचे असेलही पण ते जो मुद्दा मांडतात तो नक्कीच भेदक आणि आपल्याला निरूत्तर करणारा आह. समाजाला तंत्रज्ञांची गरज आहे. हे तंत्रज्ञ समाजोपयोगी कामे करतात. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी ते गरजेचेही आहे पण आपण आज या तंत्रज्ञानाच्या शिक्षणालाच शिक्षण म्हणू लागलो आहोत, यावर कृष्णमूर्तींचा आक्षेप आहे.

कृष्णमूर्तींचे हे चिंतन वाचताना हजारो वर्षांचा शिक्षणाचा पट डोळ्यापुढून जातो...आणि लक्षात येते की गुरुकुल व्यवस्थेत कौशल्ये जीवनव्यवहार व आपल्याला मान्य नसली तरी त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार मानसिक विकासाची मांडणी होती....हळूहळू पूर्णवेळ निवासी शिक्षणाकडून शिक्षणाचा प्रवास एका इमारतीत काही काळ घ्यावयाची गोष्ट म्हणजे शिक्षण इथपर्यंत आली...हळूहळू शिक्षणाचा आशय सर्वांगीण विकासाकडून जीवनपयोगी कौशल्ये शिकण्यापर्यंत बदलत गेले... तंत्रज्ञानाच्या त्यातील वापराने तर शिक्षकाची भूमिका अत्यंत मर्यादित करून टाकली...गुरू ते इन्स्ट्रक्टर इथपर्यंत शिक्षकाची व्याख्या बदलत गेली आहे...

या सर्व विवेचनातून लक्षात येते हे की जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची शिक्षणाची व्याख्याच आपण विसरलो आहे. केवळ आर्थिक उदरनिर्वाहाची सोय लावण्यासाठी जे उपयोगी पडते ते म्हणजे शिक्षण अशीच शिक्षणाची आपली सोयीस्कर व्याख्या आहे. ती गरज आहेच, पण त्या धोरणातून निर्माण होणारे धोके कृष्णजी लक्षात आणून देतात. केवळ जीवनाच्या एकाच अंगाचा विचार करणारी कुशल माणसे जीवनाचे साकल्याने दर्शन घेऊ शकत नाहीत. अशा तांत्रिक प्रगतीने मनातील संघर्ष व दु:खे नष्ट होणार नाहीत... माहितीचा संचय आणि शक्तीचा विकास म्हणजेच शिक्षण या आपल्या चुकीच्या समजुतीमुळेच जीवनाचे समग्र असे दर्शनच होऊ शकणार नाही असे ते स्पष्टपणे बजावतात...
शिक्षणाने आपल्या सर्व भावभावना, सुख-दु:खे, वासना-इच्छा यांचे यथार्थ ज्ञान होणे... संवेदनशीलतेने जीवनाला स्पर्श करणे हे सारे व्हायला हवे.

कृष्णमूर्ती अगदी थेटपणे म्हणतात, ‘‘जीवनातील विधायक क्षेत्राचा त्यातील सर्व बारकाव्यांचा विलक्षण सौंदर्यांचा दु:खाचा आणि आनंदाचा बोध होण्यासाठी जर शिक्षणाची मदत होत नसेल तर खरोखर त्या शिक्षणात काहीही अर्थ नाही... तुम्ही पदवीधर व्हाल... तुमच्या नावापुढे पदव्यांच्या आद्याक्षरांची मालिकाही लागेल आणि तुम्ही छानपैकी नोकरीही मिळवाल पण पुढे काय... हे सर्व होता होताच तुमचे मन थकेल. मंद व मूर्ख बनत जाईल तर मग या सर्वांचा उपयोग तरी काय...’’
कृष्णमूर्तींचा आक्षेप केवळ नकारासाठी नाही तर शिक्षणातून जीवनाच्या विशाल परिप्रेक्ष्याचे दर्शन व्हायला हवे या भूमिकेतून घेतले आहेत.

आपण जर समाजात बघितले तर लक्षात येते की आज कौशल्याधारित स्पेशलायझेशनच्या जमान्यात तज्ज्ञता मिळवलेली ही मुले-मुली भावनिक समायोजन करू शकत नाहीत. त्यांच्यामधील आत्महत्यांचे वाढते प्रमाण... नैराश्यातून डिप्रेशनची औषधे.... व्यसनाधीनता, अतिपैसा हातात येताच त्यातून बाहेर पडणारी हिंसकता... व वासनापूर्ती हे सारे आज आपण पाहत आहोत. सुसाट वाहने चालविणारी... रेव्ह पार्ट्यांमधून सापडणारी ...संवेदना हरवून स्वत:ची अस्वस्थता पिकनिकमध्ये लपवणारी... आणि स्वत:चे एकटेपण मोबाइल नेट- फेसबुकच्या गर्दीत विसरू पाहणारी ही पिढी बघितली
की शिक्षणातून आपण काय करून ठेवले आहे, याचा पश्चात्ताप होतो.

herambrk@rediffmail.com