आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघे एकोणीस वयोमान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला सरपंच म्हणजे डोक्यावर पदर घेतलेली वयाच्या चाळिशीत असलेली, भरजरी साडी नेसलेली महिला डोळ्यांसमोर येते. मात्र, यास अपवाद आहे एकोणिसाव्या वर्षी सरपंचपदी विराजमान झालेली कल्पिता पाटील.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ गावाची सरपंच होण्याचा मान राष्‍ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कल्पिताने मिळवला आहे. ती इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाच्या दुस-या वर्षाचे शिक्षण घेत आहे. सरपंच झाल्यानंतर पहिल्या ग्रामसभेत तिने महिलांशी संवाद साधला. कल्पिता जळगावात शिकायला असते, दर शनिवार-रविवार गावाकडे जात असते.


आम्ही सकाळी आठच्या सुमारास तिच्यासोबत गावाकडे निघालो. साडेनऊपर्यंत गावात पोहोचल्यावर, आधी ग्रामपंचायत कार्यालयात गेलो. या वेळी गावातलीच एखादी लहान मुलगी आलीये असा भाव न आणता, सरपंचपदाचा मान राखत कार्यालयात उपस्थित सर्व ग्रामसेवकांनी ‘मॅडम/ताई या,’ अशा शब्दांत तिला संबोधले. सरपंचाच्या खुर्चीवर बसून प्रलंबित कामांच्या कागदपत्रांवर कल्पिताने सह्या केल्या. सर्व जण ग्रामसभेसाठी किती वाजता जमणार, याचा आढावा घेऊन आम्ही तिच्या घराकडे निघालो. वयस्करांनी पदालाच नव्हे, तर तिलाही मान देत कामाच्या इतर बाबीदेखील समजावून सांगितल्या. क ल्पिताच्या घराचा वारसा राजकारणाचा असला तरी त्या दिवशी मात्र तिच्यासोबत वडील, आई कोणीच नव्हते. ती स्वत:च सगळे काम करत होती. जे माहीत नव्हते ते तेथील अनुभवी व्यक्तींना विचारून तिने काम पूर्ण केले.


रस्त्यावरून जातानादेखील गावातील महिला तिच्याशी बोलत होत्या. तीदेखील त्यांच्या प्रश्नांना काकू, मावशी, आजी अशा नात्यांचा उल्लेख करत गप्पागोष्टी करत होती. त्या वेळेस गावातील तिच्या घराजवळच राहणारे कोणी म्हणाले की, नदीला पाणी आले आहे. आम्ही लगेच नदीचे पाणी पाहायला गेलो.


साडेदहा वाजता ग्रामपंचायत ग्रामसभेला सुरुवात झाली. कल्पिताची ही पहिलीच ग्रामसभा. आतापर्यंत फक्त पुस्तकात वाचलेली ग्रामसभा आज स्वत: घ्यायची होती, हे तिच्यासाठी खूप मोठे आव्हान होते. तिने फक्त महिलांसाठी ही सभा ठेवली होती. सभेच्या सुरुवातीलाच ‘तुम्ही सगळे माझ्याहून मोठे आहात; परंतु आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचे आहे. तुमची साथ मला आवश्यक आहे,’ असे सांगून तिने सर्वांची मने जिंकून घेतली.


बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी कामे करण्याचा विचार तिने या वेळी बोलून दाखवला. बचत गट वाढवणे, काम वाढवून गावातील महिलांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून देणे, शिवणयंत्रांचे वाटप व शिवण कोर्सेस सुरू करणे, या कामांसोबतच तिचा भर असणार आहे महिलांना साक्षर बनवण्यावर. त्यांना स्वत:ची सही तरी यायला हवी, जेणेकरून स्वत: पैसा हाती राखून ठेवता येईल व त्यांचा पैसा त्यांनाच मिळेल, अशी तिची यामागची भूमिका आहे. या ठरावास सर्व सभासदांनी आणि गावक-यांनी पाठिंबा दिला. लवकरच गावात महिलांसाठी साक्षरता वर्ग सुरू होईल, मात्र सर्व महिलांनी त्यासाठी उपस्थित राहिले तरच उपयोग होईल, असेसुद्धा तिने हक्काने सांगितले.
महिला मोकळ्या मनाने तिच्याशी बोलत होत्या. आपलेपणाने महिलांशी संवाद साधला तर त्यांच्या समस्या जाणून घेता येतात याच भावनेने ती चर्चा करत होती. ‘ताई, आमच्या समस्या तूच सोडव,’ ‘बहीण, आमल्ये काई बी माहीत नाही, तूच सर्व सोडीसन आण,’ असे म्हणून तिच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला. अखेर 12.30 वाजता ग्रामसभा संपली. गावातील मुली, तरुणांनीदेखील तिच्याशी संवाद साधला. ‘ताई, मी तुझ्यासोबत गावासाठी काम करीन,’ असे एका महाविद्यालयीन तरुणीने सांगितले. सर्व गाठीभेटी घेत सर्वांचा निरोप तिने घेतला. ज्या वयात तरुण महाविद्यालयीन आयुष्य मजेत जगत असतात त्या आयुष्याच्या टप्प्यावर आपल्या गावासाठी काही तरी करण्याची धडपड व जिद्द कल्पिताने उराशी बाळगली आहे. तिला शुभेच्छा!


yamini.kulkarni@dainikbhaskargroup.com