आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरणार केवळ उपचारांपुरते?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 10-15 दिवसांमध्ये प्रचंड घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजपचे एकमेव जनाधार असलेले नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपचे तारणहार नरेंद्र मोदी यांच्यासमोर जोशात येऊन कबुली दिली की, गेल्या निवडणुकीत त्यांनी तब्बल आठ कोटी रुपये खर्च केले. मुंडेंचे हे सत्यवचनी हरिश्चंद्राचे रूप पाहून भाजपमधील त्यांचे विरोधक त्याच कार्यक्रमात खो खो हसत होते. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सीमारेषेपलीकडे जाऊन खर्च केल्याचे हे प्रकरण मुंडे यांना भोवणार, यात काहीच शंका नाही. खरे तर मुंडे यांनी या वक्तव्यामुळे आपली निवडणूक रद्द होऊ शकते, याचा कयास बांधला होता. मात्र, त्यांना वाटले की, देशातील निवडणुकांना केवळ सहा महिनेच राहिले असल्यामुळे झाली तर झाली रद्द! मात्र केवळ त्यांची गेली निवडणूकच रद्द होऊ शकते असे नाही, तर मुंडे यांना पुढील निवडणूक लढवण्यापासूनही मज्जाव केला जाऊ शकतो. असे झाल्यास मुंडे यांची मोठीच अडचण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात आल्यावर मुंडे यांनी तत्काळ आपल्या चेल्यांना सारवासारव करण्यास लावले होते.


मुंडे यांच्या या वक्तव्याचा फायदा उचलण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने नक्की केले आहे. त्यामुळे या घटनेला धरूनच धनंजय मुंडे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते आता थेट राष्ट्रवादीत प्रवेश करते झाले. धनंजय हेच इतकी वर्षे मुंडे यांचा उजवा हात समजले जात होते. परळी विधानसभा मतदारसंघ व बीड लोकसभा मतदारसंघ या दोन्हीमध्ये धनंजय यांना मुंडे यांच्या नाड्या व्यवस्थित ठाऊक आहेत. त्यामुळेच गेल्या महिन्यात झालेल्या परळीमधील शिरसाळा या पंचायत समितीच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत धनंजय यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून राष्ट्रवादीचा झेंडा तिथे फडकवला. त्या आधी ग्रामपंचायतींमध्येही राष्ट्रवादीचा वरचश्मा त्यांनी सिद्ध करून दाखवलेलाच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंडे यांचे आठ कोटींचे वक्तव्य वाटते तितके सहज पचून जाण्यासारखे नाही. बीड जिल्हा सहकारी बँकेद्वारे अनेक शेतक-यांच्या नावावर घेतलेल्या कर्जाचा परतावा वर्षानुवर्षे होत नाही. हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस या आठ कोटींशी जोडू पाहत आहे. या परताव्यासाठी रिझर्व्ह बँकेपासून न्यायालयापर्यंत राष्ट्रवादीने दरवाजे ठोठावायला सुरुवात केल्यास ते मुंडे यांना खूपच त्रासदायक ठरू शकते.


दुसरीकडे सांगली मिरज-कुपवाड महापालिका राष्ट्रवादीच्या हातातून काँग्रेसच्या ताब्यात गेली. काँग्रेसने या महापालिकेत राष्ट्रवादीपेक्षा तब्बल दुप्पट जागा अधिक मिळवल्या. सांगली जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा जणू रायगडच! आणि या रायगडावर मोठमोठाले सरदार ‘जाणत्या राजा’ने देखरेखीसाठी नेमलेले! एक सरदार लहानशा चणीचा चतुर गडी; तर दुसरा शांत, बुद्धिवादी, परदेशात शिकलेला बेरकी! दोघेही राष्ट्रवादीत असून अजित पवारांच्या स्पर्धेत उतरून थेट मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणारे. पण बिननेत्यांच्या काँग्रेसने यांना चारी मुंड्या चित केले. गेले दीड वर्ष या महापालिकेतील राष्ट्रवादीचा एक शिलेदार इद्रिस नायकवडीला राष्ट्रवादीच्या शांत-बुद्धिवादी नेत्याने धक्क्याला लावले. तेव्हापासून तो नाराज शिलेदार थेट काँग्रेसच्याच तंबूत गेला. काँग्रेसच्या नेत्यांनी मग एकेक करत महापालिकेतील स्थायी समितीपासून सगळ्याच गोष्टीत राष्ट्रवादीवर कुरघोडी करायला सुरुवात केली. तरीही महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा असणारे हे दोन्ही नेते शांत बसून होते. ‘कोण कुठला इद्रिस न फिद्रिस’ असे म्हणत पक्षांतर्गत कुरघोड्या करण्यातच धन्यता मानत होते. अन् काय विपरीत झालं बघा, निकाल आले आणि पार भुईसपाट झाले की हो!


अजित पवार कुठेही काहीही बोलतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी अशी व्यक्ती चालणार नाही, असे खासगीत हेच शांत, संयत, चतुर, बुद्धिवादी नेते सांगत असतात. मात्र, अजित पवार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हातची जाऊ देत नाहीत. ‘बारामती एके बारामती’ करीत नाहीत. संपूर्ण जिल्ह्यावर असलेली घट्ट पकड ढिली करून राघोबादादासारखे अटकेपार झेंडे लावायला निघत नाहीत. इथे राष्ट्रवादीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील नेत्यांना मात्र स्वत:च्या जिल्ह्यातील प्रमुख महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा ताब्यातून गेल्या तरी पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळे आपली पदे शाबूत राहतात, हे मनात पक्के झाले आहे. त्यामुळे सारे कसे सुशेगात आहे. नाशिक महापालिका हातची गेली, रायगड जिल्हा परिषद गेली, चिपळूण नगरपालिका तर सध्याच्या अध्यक्षांनीच पक्षाच्या विरोधात उमेदवार टाकून घालवली. तरीही या ठिकाणच्या सगळ्या नेत्यांची खाती, पदे शाबूत राहिली. किंबहुना काहींना तर नव्याने मोठ्या जबाबदा-या मिळाल्या. असे असताना मग निवडणुकीत पक्षाला बळकटी देणारी कामगिरी होणार कशी?


तिकडे राजू शेट्टीच्या आंदोलनामुळे जैन समाज आधीच एकवटला होता. पवारसाहेबांनी त्याची जात काढल्यावर तर धंदा-पाणी करणारा हा समाजही राष्ट्रवादीच्या विरोधात उभा ठाकला. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नाही, एवढी टक्केवारी असणारा सांगलीतील ब्राह्मण समाज तर कधीच काँग्रेस वा राष्ट्रवादीबरोबर नव्हता. तो कायमच भाजपबरोबर असल्याने त्यांची मते मिळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्ट लोकांचे मोहोळ, असे समीकरण सामान्यांच्या मनात पक्के बसले. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेले राजकीय परिश्रम फळाला आल्याचेच सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचा निकाल दर्शवतो. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा काँग्रेस पक्षाला फायदा होत असला तरी राष्ट्रवादीतील ‘सर्फ’ धुलाई फेम स्वच्छ आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेचा राष्ट्रवादीला का फायदा झाला नाही, याचा विचार आर. आर. पाटील करणार नाहीत. मात्र, राष्ट्रवादीच्या हायकमांडला तरी तो विचार करावाच लागणार आहे. नाही तर घोडा-मैदान दूर नाही. पश्चिम महाराष्ट्रातील मतदार जर वेगळा विचार करणार असतील, तर काँग्रेस कधी हात झटकून वेगळा सवता-सुभा मांडेल, हे कळणारही नाही. तसे झाल्यास यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम करण्यापलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना काम उरणार नाही!