आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानवी स्वभाव हेच व्यवस्थेच्या अपयशाचे मूळ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कोर्ट’ चित्रपटाच्या निर्मितीमागे माझ्या अनेक प्रेरणा होत्या. एक म्हणजे, मला आपल्या न्यायव्यवस्थेतील कनिष्ठ न्यायालयात चालणारे कामकाज व अशा न्यायालयांमधील छोट्याशा रुममध्ये सामावलेले विविधांगी जग मांडायचे होते.
प्रत्येकाचे जगणे निराळे असते. तऱ्हा निराळ्या असतात. हे जगणे प्रत्येकाकडून काहीतरी सतत मागत असते. जगण्याच्या माझ्याकडूनही काही मागण्या होत्या. ‘कोर्ट’ ही त्याला दिलेली माझी प्रतिक्रिया होती. ‘कोर्ट’ चित्रपटाच्या निर्मितीमागे माझ्या अनेक प्रेरणा होत्या. एक म्हणजे, मला आपल्या न्यायव्यवस्थेतील कनिष्ठ न्यायालयात चालणारे कामकाज व अशा न्यायालयांमधील छोट्याशा रुममध्ये सामावलेले विविधांगी जग मांडायचे होते. न्यायव्यवस्थेत वकील, अशील व पक्षकार असे घटक असले तरी, या घटकांवर कोर्टरुमच्या बाहेर असणारे जग, त्या जगातले परस्परसंबंध, पूर्वग्रह प्रभाव टाकत असतात. हे दबाव गट एखाद्याच्या जीवन-मरणाचा निर्णय घेत असतात. हेच जग मला लोकांपुढे आणायचे होते.

‘कोर्ट’ विशिष्ट विचारांचा पुरस्कार करणारा चित्रपट आहे, असे मानून मला अनेक जण अलीकडे प्रश्न विचारतात, तुमची आयडिऑलॉजी कोणती? पण मी अशा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा, आयडिऑलॉजीचा किंवा इझमचा समर्थक नाही, ज्यातून मला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी. माझ्या विचारांच्या कक्षा रोजच विस्तारत आहेत. मला वाटते की, चांगल्या हेतूने समाजाची आर्थिक व वैचारिक बैठक तयार केल्यास व ही व्यवस्था वा बैठक चांगल्या पद्धतीने हाताळल्यास समाजाचे हित साध्य होऊ शकते. नाहीतर निर्दोष सैद्धांतिक, समतावादी व्यवस्था, सद््वर्तनी लोकांच्या हातात न जाता वाईट लोकांच्या हातात गेल्यास कोसळण्याची अधिक भीती असते. सध्याची व्यवस्था अत्यंत कठीण काळातून जात असून आपण ती वेळीच न सावरल्यास मोठे संकट निर्माण होऊन आपले भविष्य उद्ध्वस्त होऊ शकते. माझी अशी धारणा आहे की, समाजाचं अपयश हे मानवी स्वभावातून आलेलं अपयश आहे.

आपली व्यवस्था ही अमूर्त स्वरूपाची आहे, मात्र तिची रचना ताठर व औपचारिक अशी आहे. ‘कोर्ट’च्या निमित्ताने जेव्हा मी न्यायव्यवस्थेचा अभ्यास, संशोधन सुरू केले; तेव्हा असे लक्षात आले की, आपली न्यायव्यवस्था एका व्यामिश्र विशाल समाजाचे प्रतिबिंब आहे, यामध्ये समाजाचे काळानुरूप चालत आलेले नीतिनियम आहेत. या व्यवस्थेत व्यक्तीचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आहेत. या संदर्भांना त्याच्या व्यक्तिगत निष्ठा, पूर्वग्रह व नीतिसंकेतांचे अस्तर आहे. त्यामुळे मला वाटतं, ‘कोर्ट’ हा अराजकीय असा नाही, तर तो न उलगडणारे राजकारण सांगणारा चित्रपट आहे. तो राजकारणाच्या रूपावलीचे काटेकोर वर्गीकरण करणाराही नाही. म्हणून मला पक्की खात्री आहे की, ज्या प्रेक्षकांची आकलनशक्ती प्रचंड, अमर्याद आहे, जगण्याविषयीचे भान व्यापक आहे, त्यांनाच अशा चित्रपटाविषयी मत किंवा निवाडा करण्याचा मुख्यत: अधिकार दिला गेला पाहिजे.

सिनेमात समकालीन राजकारण आणि समाजकारणाचे रंग टिपल्यामुळेच कदाचित शेतकरी आत्महत्या, दलित हत्याकांड, वलयांकित व्यक्तींच्या बाबतीत होणारे कोर्टाचे फैसले याबाबत मी व्यक्त होत राहावे, अशी समाजाची अपेक्षा मला जाणवते. ती एका अर्थाने योग्यही आहे; परंतु सध्याच्या वातावरणात कोणत्याही घडामोडींवर, घटनांवर लगेच प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही. कारण, अनेकदा अशा घटनांची माहिती आपल्यापर्यंत विपर्यस्तपणे येते, चुकीची येते. त्यात भावनांचा अतिरेक असतो. अशा प्रसंगी सत्याचा बहुत करून अपलाप होत असतो. मला वाटते, प्रत्येक प्रसंग विलक्षण गुंतागुंतीचा असतो. त्याकडे बघण्याची विविध अंगे असू शकतात. पण हेही खरे आहे की, जेव्हा अन्यायग्रस्त घटना डोळ्यापुढे येतात, व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असते, तेव्हा एक संवेदनशील नागरिक या नात्याने अशा घटनांचा मला मानसिक त्रास होतो. सरकारची संवेदनशून्यता, व्यवस्थेची अशा घटना रोखण्यात असणारी असमर्थता मनाला हादरवून सोडते. अशा वेळी मीडिया व आपण समाज म्हणून मूळ प्रश्नांच्या खोलात जाऊन, त्या शक्यता तपासल्या पाहिजेत. केवळ बातम्यांचे मथळे भडक असावेत किंवा जनक्षोभ उसळावा, इतक्या मर्यादित चौकटीत या घटनांकडे पाहिले जाऊ नये...

chaitanyat13@gmail.com
बातम्या आणखी आहेत...