आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉक शो सम्राज्ञी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगप्रसिद्ध टॉक शो सम्राज्ञी ऑप्रा विन्फे ही अलीकडेच मुंबई भेटीवर आली त्या वेळी तिच्या स्वागतासाठी विमानतळावर चक्क बच्चन कुटुंबीय हजर होते. ऑप्रा तिच्या नवीन टॉक शो ‘नेक्स्ट चॅप्टर’च्या तयारीसाठी भारतात आली होती. या शोसाठी ती जगभर प्रवास करून सेलिब्रेटींच्या मुलाखती घेणार आहे.
जगातली पहिली कृष्णवर्णीय अब्जाधीश महिला म्हणून आज ऑप्राची जगाला ओळख असली तरी तिने जन्मापासून खूप खस्ता खाल्ल्या आहेत आणि शून्यातून आपले विश्व निर्माण केले. जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत अग्रक्रमाने असणारी ऑप्रा ही दानशूरपणाबाबतही जगाला परिचित आहे. मिसिसिपीच्या ग्रामीण भागात अत्यंत गरिबीत जन्मलेल्या ऑप्राच्या घरी दारिद्र्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. तिची आई बाल वयातच गरोदर राहिली होती. ऑप्राच्या आयुष्यातदेखील हेच दिवस आले. वयाच्या नवव्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला आणि वयाच्या 14व्या वर्षी तिला आईपणाची कल्पना नसतानाच ती आई झाली. दारिद्र्यामुळे तिच्या मुलाचा मृत्यू झाला. शाळेत शिकत असतानाच तिला रेडिओवर नोकरीची संधी मिळाली. वयाच्या 19व्या वर्षी रेडिओवर स्थानिक बातम्या देत असे. पुढे हेच आपले करिअर ठरणार आहे याची तिला त्या वेळी काडीचीही कल्पना नव्हती.
नैराश्याने पछाडलेल्या तिच्या आईने ऑप्राचा सांभाळ करण्यासाठी व्हेनॉर्न या ओळखीतल्या एका गृहस्थाकडे सोपविले. तिथे ऑप्राच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले. शाळेत केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमातच नव्हे तर वक्तृत्व स्पर्धेपासून अनेक स्पर्धांमध्ये तिने पहिला क्रमांक पटकाविण्यास सुरुवात केली. तिच्या आयुष्याला संपूर्णपणे कलाटणीच मिळाली. वयाच्या 17व्या वर्षी तिने मिस ब्लॅक ही सौंदर्यवती स्पर्धा जिंकली. त्या वेळी तिला तिनस्सी स्टेट विद्यापीठातून कम्युनिकेशन्स शिकण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. त्याकाळी स्थानिक चॅनेलवर ती कृष्णवर्षीय पहिली महिला अँकर होती. 1983 मध्ये ऑप्रा शिकागोला गेली आणि तेथे तिला चॅनेल्सचे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. तिचे टॉक शो अल्पावधीत लोकप्रिय झाले. तिच्या बिनधास्त स्वभावामुळे ती लोकप्रिय झाली आणि या क्षेत्रातली एक अनभिषिक्त सम्राट म्हणून ऑप्राने नावलौकिक कमावला. ‘द ऑप्रा विन्फे शो’ हा तिचा कार्यक्रम सर्वात जास्त महसूल गोळा करणारा ठरला. ऑप्रावर टाइम मासिकाने खास लेख लिहून तिच्या लोकप्रियतेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. 1993 मध्ये तिने घेतलेली मायकल जॅक्सनची मुलाखत तब्बल 36 दशलक्ष लोकांनी एकाच वेळी पाहिली होती. हा एक विक्रमच होता. मागच्या वेळच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिने बराक ओबामा यांना जाहीर पाठिंबा दिला होता.
prasadkerkar73@gmail.com