आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हर द काउंटर मेडिसिन : पॅरासिटॅमॉल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ओव्हर द काउंटर मेडिसिन’ अर्थात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळू शकणा-या औषधांमध्ये समावेश पॅरासिटॅमॉलचा उल्लेख सर्वाधिक खप असणा-या औषधांमध्ये करावा लागेल. क्रोसिन, मेटॅसिन, पॅरासिन, कॅल्पॉल, पायरिजेसिक, अल्ट्राजिन निओमॉल अशा विविध कंपनी विशिष्ट नावांनी उपलब्ध असलेले हे औषध गोळी वा सायरपच्या स्वरूपात तसेच इंजेक्शनच्या स्वरूपातही उपलब्ध आहे.


रासायनिकदृष्ट्या पॅरा अमिनो फेनॉल वर्गातील संयुग असलेल्या फेनॅसिटिनचा वापर 1887 पासून सुरू झाला. भारतासह अनेक देशांत त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली. कारण वेदनाशामक असल्याने लोक व्यसनाच्या पातळीवर जाऊन हे औषध घेत व त्याची परिणती त्यांची मूत्रपिंडे निकामी होण्यात होई. पॅरोसिटॅमॉल किंवा अ‍ॅसिटामिनोफेन हे फेनॅसिटिनचे ‘डिइथायलेटेड’ संयुग होय. पॅरासिटॅमॉलमुळे वेदना पातळी वाढते. त्याच्यामुळे ताप कमी होतो, परंतु सूज कमी करण्याची त्याची क्षमता कमी असते. रक्तातील त्याचे जैविक अर्ध आयुष्य (biological half life) 2 ते 3 तास इतके असते. तोंडाने औषध घेतल्यावर त्याचा परिणाम 3 ते 5 तास राहतो. सामान्यत: पॅरासिटॅमॉलची एखादी गोळी घेतल्यास कोणतेच दुष्परिणाम होत नाहीत. काही वेळा रुग्णाला मळमळ होणे, अंगावर पुरळ येणे असा त्रास होऊ शकतो. क्वचित रक्तातील पांढ-या रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकते. एक कि.ग्रॅ. वजनाला 10 मि. ग्रॅ. इतका पॅरासिटॅमॉलचा एक डोस असतो. म्हणजे 50 कि.ग्रॅ.च्या व्यक्तीला 500 मि.ग्रॅ.ची गोळी देता येते. दिवसातून 4 ते 6 तासांच्या अंतराने ही गोळी देता येते. जास्तीत जास्त 8 गोळया 50 कि.ग्रॅ.च्या व्यक्तीला देता येतात.

सामान्यत: दिवसातून 4 गोळ्या पुरेशा असतात. पॅरासिटॅमॉल जास्त प्रमाणात घेतल्यास त्याची विषबाधा होते. विषबाधेची शक्यता लहान मुलांच्या बाबतीत जास्त असते. प्रौढ व्यक्तीने 10 ग्रॅमहून जास्त प्रमाणात पॅरासिटॅमॉल घेतल्यास त्यांच्यात विषबाधेची लक्षणे दिसून येतात. 12.5 ग्रॅमहून जास्त प्रमाणात घेतल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. विषबाधेच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, पोटात दुखणे तसेच शुद्ध हरपणे यांचा समावेश होतो. 12 ते 15 तासांनी यकृत तसेच मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊन व्यक्ती कोमात जाऊ शकते. दोन दिवसांनी व्यक्तीला कावीळ होते. यकृताचे कार्य पूर्णपणे निकामी होऊन मृत्यूही ओढवू शकतो. विषबाधेची लक्षणे दिसल्यास व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात न्यावे.


डोकेदुखी, ताप, पाळीपूर्वी दुखणारे पोट यासाठी मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पॅरासिटॅमॉल साधारणत: सुरक्षित असले तरी आधी सांगितल्यानुसार त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. स्वस्त आणि मस्त असे औषध गरजेनुसार जरूर घ्यावे. पण एक लक्षात घ्यायला हवे. कोणतीही दुखी वा ताप म्हणजे एखाद्या रोगाचे लक्षण असते. लक्षणांवर उपचार करून तात्पुरते बरे वाटले तरी हा प्रकार म्हणजे झाडाच्या फांद्या तोडण्यासारखाच असतो. जोवर झाडाचे मूळ म्हणजे मूळ रोग शिल्लक आहे तोपर्यंत लक्षणे वारंवार उद्भवणारच. त्यामुळे ह्या औषधाचा उपयोग लक्षणांचे शमन करण्यासाठी 1 ते 2 दिवसच करावा. त्यानंतर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप कमी करण्यासाठी ओल्या फडक्याने शरीर पुसणे हा एक उत्तम उपाय आहे. लहान मुलांना ताप जास्त चढल्यास झटके येऊ शकतात. ओल्या फडक्याने त्वचा वारंवार पुसल्याने तापमान कमी होते. तापमान कमी करण्याचा हा उपाय थोडा वेळखाऊ असला तरी स्वस्त आणि निर्धोक आहे.