आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुस्तीपटूंच्या सेक्युलर तालमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ती आहे कुस्तीचे प्रशिक्षण मिळण्याची जागा. त्या वास्तूच्या प्रवेशद्वारावरील फलकावर लिहिलेले असते, ‘तालीम’ (शिक्षणाला उर्दूतील प्रतिशब्द) आणि कुस्तीगिरांचे आराध्यदैवत असलेल्या हनुमानाची प्रतिमाही दिसते. यातून घडते, संस्कृतीच्या बहुढंगी पैलंूचे दर्शन. जिथे कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते, त्या स्थानाला पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ‘आखाडा’ नव्हे तर ‘तालीम’ म्हणतात. त्यातून थेट नाळ जुळते, ती फाळणीपूर्व पंजाब प्रांतातील शंभर वर्षांपूर्वीच्या तालमींशी. या नात्याची वीण विशेष घट्ट झाली ती, कोल्हापूर संस्थानचे महाराज व अग्रणी समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीत. फाळणीपूर्व भारतामधील विविध भागांतून विशेषत: पंजाब प्रांतातील कुस्तीगिरांना शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सन्मानाने बोलावले होते व त्यांना आश्रय दिला होता.

तेव्हापासून आजपावेतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार्‍या कुस्ती स्पर्धांमध्ये पाकिस्तान, इराण, तुर्कस्थान तसेच आफ्रिका खंडातल्या काही देशांमधील कुस्तीगीरही सहभागी होतात. या कुस्ती स्पर्धा बघायला येणार्‍या पुरुष प्रेक्षकांमधील अनेक जण पाकिस्तान व इराणमधील कुस्तीगिरांचेही चाहते आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील आमदार विनय कोरे म्हणाले, ‘विदेशांतील कुस्तीगिरांना आमच्या भागात मोठी पसंती आहे.’ वारणानगर येथे देशातील सर्वात मोठे कुस्तीचे मैदान आहे. येथे दरवर्षी 13 डिसेंबरला कुस्तीची जंगी स्पर्धा होते. मॅटवर खेळली जाणारी कुस्ती दोन मिनिटांतही निकाली निघू शकते, पण मातीत खेळली जाणारी कुस्ती तब्बल 25 मिनिटांपर्यंत सलग चालू शकते.

महाराष्ट्रातील तालमींमधल्या गुरूंना वस्ताद म्हणतात. कुस्तीच्या प्रशिक्षणाबरोबरच आपल्या शिष्यांना ते देत असलेली नैतिक शिकवण ही आध्यात्मिक व सेक्युलर स्वरूपाची असते. अनेक वस्ताद आपल्या शिष्यांना गामा या कुस्तीगिराचा (आयुष्यात एकाही कुस्ती स्पर्धेत न हरल्याने गामा हा जगातला सर्वश्रेष्ठ कुस्तीगीर ठरला.) आदर्श डोळ्यासमोर ठेवायला सांगत असतात. पंजाब प्रांतातील रहिवासी असलेला गामा फाळणीनंतर पाकिस्तानातच राहिला. फाळणीच्या वेळी दंगे उसळलेले असताना, गामा आपल्या शेजारील हिंदू कुटुंबांच्या रक्षणासाठी एखाद्या पहाडासारखा दंगेखोरांसमोर उभा ठाकला होता. कोणताही कुस्तीगीर गामासारखाच निधड्या छातीचा असला पाहिजे, ही भावना कुस्तीप्रेमींमध्ये खोलवर रुजली ती तेव्हापासून.

कोल्हापूर शहरातल्या एका तालमीतले प्रख्यात वस्ताद आप्पासाहेब कदम यांनी सांगितले की, ‘कुस्तीगिरांना देण्यात येणारे नैतिकतेचे धडे त्यांच्या प्रशिक्षणाचे आवश्यक अंग आहे. नीतिमूल्यांचे धडे न मिळालेला कुस्तीगीर बिघडण्याची शक्यता अधिक असते.’ त्यामुळे महाराष्ट्रातील कुस्तीगिरांची प्रतिमा इतर राज्यांतील कुस्तीगिरांपेक्षा नक्कीच चांगली आहे. खेळांबद्दल असलेले प्रेम व आदरातिथ्याचे संस्कार महाराष्ट्राच्या मातीत रुजले आहेत. मग ते कुंडल असो वा वारणानगर येथे होणार्‍या कुस्तीच्या महास्पर्धा. लोकांच्या वागण्यातून आपल्याला त्यांचे क्रीडाप्रेम जाणवत राहते. तालमींमधील वस्ताद, कुस्तीगीर हे सारे ग्रामीण भागातील शेतकरी किंवा मजूर कुटुंबातून आलेले असतात. निदान पश्चिम महाराष्ट्रापुरते तरी हे खरे आहे, असे माजी ऑलिम्पिक कुस्तीगीर व कुस्ती क्षेत्रातील गुरुवर्य गणपतराव आंधळकर यांनी सांगितले. एशियाड, कॉमनवेल्थ, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये कुस्तीत पदके जिंकलेले काका पवार म्हणाले की, कुस्ती, उसाचे मळे व तमाशा यांचे अतूट असे नाते आहे. काका पवार यांची पुण्यामध्ये तालीम आहे.

तमाशा आणि कुस्तीसाठी शिस्तबद्ध अदाकारी व लोकाश्रय आवश्यक असतो. कुस्ती पाहायला येणारे बहुसंख्य प्रेक्षक हिंदूधर्मीय असतात. पूर्वीपेक्षा कुस्तीमध्ये आता अधिक वैविध्य आले आहे. पूर्वी कुस्तीमध्ये मराठा समाजातील कुस्तीगीरांचे वर्चस्व होते. मात्र, आता धनगर समाजातील कुस्तीगीरही आपला ठसा उमटवत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सध्या मुस्लिम समाजातील कुस्तीगिरांनाही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये कुस्तीला सध्या कमी महत्त्व देण्यात येत असल्याबद्दल बहुतांश वस्ताद चिंता व्यक्त करतात. आम्ही ज्या ज्या तालमींना भेटी दिल्या, तिथे या चिंतेचे सावट दिसले. ‘मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेल्या महाराष्ट्रापेक्षा पंजाब, हरयाणामध्ये कुस्तीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते. पंजाब व हरियाणामध्ये कुस्तीगिरांना पोलिस व सुरक्षा दलांमध्ये मोठ्या पदांवर नियुक्त केले जाते. महाराष्ट्रात मात्र कुस्ती खेळातून बाहेर पडल्यानंतर कुस्तीगिरांना मजुरी करणे नशिबी येते. महाराष्ट्रात काही नामवंत कुस्तीगिरांना पोटापाण्याकरिता सरतेशेवटी साखर कारखान्यांमध्ये रखवालदाराची नोकरी पत्करावी लागली होती.’ अशी करुण कहाणीही कुस्ती क्षेत्रातील वस्तादांनी ऐकविली. राजकीय नेते हे संधीसाधू असतात. ‘कुस्ती पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. तो जनाश्रय पाहून राजकारण्यांचे पायही कुस्तीच्या मैदानाकडे वळतात. काही राजकीय नेते कुस्ती संघटनांचे प्रमुख आहेत. तरीही या खेळाला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राज्यातील कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. पण आपण त्या पदावर आहोत, हे त्यांना आठवत तरी असेल का?’ असे उपहासाने विचारून एका वस्तादाने सांगितले की, कुस्तीचे मैदान पूर्वी गाजविलेले दोन कुस्तीगीर आता विद्यमान आमदार आहेत. पण त्यांचेही कुस्ती व कुस्तीगीरांकडे लक्ष नाही.

समाजामध्ये झालेले बदल, संस्कृतीचे बदललेले रुपडे, पाण्याची तीव्र टंचाई, तसेच राज्यपातळीवर होत असलेला कानाडोळा यामुळे कुस्ती खेळाची सध्या परवड सुरू आहे. गणपतराव आंधळकर म्हणतात, ‘कुस्तीगिरांचे आयुष्य हे अदृश्य तपश्चर्येप्रमाणेच असते. क्रिकेटपटूला छोटीशी जरी जखम झाली, तरी प्रसारमाध्यमे त्याचा प्रचंड गवगवा करतात. पण एखादा कुस्तीगीर निधन पावला, तर त्या घटनेची साधी दखलही घेतली जात नाही.’ कुस्ती व कुस्तीगिरांचे आयुष्य सध्या महाराष्ट्रात खडतर आहे ते असे...
psainath@gmail.com
(अनुवाद - समीर परांजपे)