आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Padma Shinde Shares Her Experiences About Periods

उंबरठ्यावर अडखळतोच आपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाळीच्या दिवसात स्वच्छतेबाबत बरीच जागृती झाली आहे. मात्र या शरीरप्रक्रियेबाबतीतले गैरसमज अजूनही तसेच आहेत.
उच्चशिक्षित महिलाही पाळी सुरु असताना मंदिराच्या उंबरठ्यावर सर्रास अडखळतात. इतक्या या गैर समजुती आपल्यात रुतून बसल्यात.
मंदिरातल्या प्रवेशावरून महिलांची पाळी हा विषय नव्याने चर्चेत आला. चांगली बाब म्हणजे या निमित्ताने अनेकजणी याबद्दल मोकळेपणाने बोलताहेत. मी आठवीची परीक्षा दिली आणि शेवटच्या पेपरच्या दिवशी मला पहिल्यांदा मासिक पाळी आली. मी गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत होते. माझ्या शाळेत सातवीपासून सर्व मुलींसाठी मासिक पाळी आणि त्या अनुषंगाने मुलींना पडणाऱे प्रश्न याविषयी एक दिवस माहिती दिली जायची. मुलींच्या प्रश्नांना उत्तरं दिली जायची. त्यामुळे मला याबद्दल माहिती होती. शिवाय घरात एक मोठी बहीण असल्यामुळे तिच्याकडून आणि आईकडूनही मला याविषयी आधीच कल्पना दिली होती.
पूर्वी आमच्या घरी चार दिवस बायकांनी बाजूला बसणं वगैरे पाळलं जायचं म्हणे. नंतर नंतर हा प्रकार बंद झाला. पाळी अाली असतानाही आम्ही घरामध्ये हवं तिथे फिरू शकतो, वावरू शकतो. आजी सांगायची की पूर्वी चार दिवस बाजूला बसवलं जायचं पण ते तिलासुद्धा पटत नव्हतं. त्यामुळे नंतर तिनेसुद्धा हे पाळलं नाही आणि त्यामुळे मग सुनांनी किंवा नातींनी हे पाळण्याचा प्रश्नच नव्हता. घरामध्ये देवपूजाही केली जाते, फक्त जिची पाळी आलीये ती पूजा करत नाही एवढं पाळलं जातं.
पण एकदा दोनदा कामानिमित्त पाळी असताना देवळात जावं लागलं तेव्हाही मी देवळात गेले आणि देवासमोर हातही जोडला. मला शिवाशिव प्रकार पटत नाही, त्यामुळे मी पाळतसुद्धा नाही. जिच्यासमोर हात जोडतो ती देवीसुद्धा स्त्रीच आहे मग तिच्या दारात एका स्त्रीला केवळ तिला पाळी आहे म्हणून बंदी कशी असू शकेल. अशा अंधश्रद्धांचा विरोध केला गेला पाहिजे.
आणखी एक प्रसंग नक्की सांगावा वाटतो. याविषयी जेव्हा मीडियामधून चर्चा सुरू होती, तेव्हा आम्ही दोनतीन जणी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसून याविषयी बोलत होतो आणि तिथे आमचे पुरुष सहकारीही होते. माझी सहकारी मनश्रीने याविषय़ी एक उत्तम रिपोर्ट बनवला होता, ज्यावरून या चर्चेला सुरुवात झाली. मुलांसमोर याबद्दल बोलताना आम्हाला कसलाही संकोच वाटला नाही. या काळात मुलींना काय त्रास होतो, त्यांचे मूड स्विंग होत असतात अशी बरीच चर्चा झाली. या चर्चेनंतर आमच्या एका पुरुष सहकाऱ्याने आवर्जून सांगितलं की, थँक यू ही चर्चा झाली. अनेकदा मुली अशा का वागतात. त्यांना काय त्रास होत असतो याची आम्हाला कल्पना नसते. आम्ही उगाच तुम्हाला नावं ठेवतो. यापुढे मी काळजी घेईन, असं तो म्हणाला. मला वाटतं, हा सकारात्मक बदल आहे.
महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. सगळे उंबरठे त्यांनी ओलांडले आहेत. मग मंदिराच्या उंबरठ्यासमोर येताना आपला पाय का अडखळावा...मैत्रिणींनो, जुनाट विचारांना टाकून नवा बदल घडवायची हीच वेळ आहे. मी हा उंबरठा ओलांडलाय आता तुमची वेळ आहे.
shindepadma@gmail.com
लेखिका या झी मराठी मध्ये असोसिएट प्रोड्युसर आहेत.