आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या आयुष्यातला क्रांतिदिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा मी अटलजींच्या कवितांचे वाचन त्यांच्याच समोर केले, तेव्हा त्यांना ते खूप आवडले. त्यांनी नुसतेच शब्दांनी माझे कौतुक केले नाही, तर कविता ऐकल्यावर ते उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवून मला शाबासकी दिली. त्यावर ते म्हणाले, ‘ये तालियाँ मेरे कविता के लिये नहीं तो आपके सूरके लिये हैं।’ ते ऐकून मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या विभूतीकडून माझ्या सुरांना मिळालेले प्रशस्तीपत्रच होते ते.

त्यानंतर त्यांना भेटण्याचा खूपदा प्रसंग आला. एवढ्या मोठ्या नेत्याशी, ज्यांच्याकडे सर्व भारतीयच नव्हे, तर परकीयही मोठ्या आदराने पाहतात, त्यांच्याशी साहित्य, संगीतावर चर्चा करताना, गप्पा मारताना खूप अभिमान वाटत असे. त्यांचे प्रेम, त्यांचा आशीर्वाद मला भरपूर मिळाला. मला वाजपेयींच्या कवितांना चाल लावायला मिळणे आिण त्या त्यांनी ऐकून शाबासकी देणे, ही माझ्या आयुष्यातली खूप मोलाची गोष्ट आहे.

शांतताप्रिय, निसर्गप्रेमी आणि संवेदनशील मनाचे कवी अटलजी. त्यांच्या कविता पुढच्या पिढीला प्रेरणा आणि स्फूर्ती देणार्‍या आहेत, हे त्यांच्या कवितांचा आस्वाद घेताना लक्षात येते. त्यामुळेच मी अटलजींच्या मुक्तछंदातल्या कवितांना चाल लावली आणि गाण्यांत रूपांतर करण्याचे ठरवले. अटलजी हे शांतताप्रिय आहेत. जरी त्यांनी अणुचाचणी केली तरी युद्धविहिन विश्वाचे स्वप्न त्यांनी पाहिले. युद्ध नको आहे हे जगाला दाखवून देण्याचा मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्या कवितेतून दिसून येतो. कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. भारताला कोणी गृहीत धरू नये, याचा संदेशही त्यांनी आपल्या कवितेतून दिला आहे.

विवेक साप्ताहिकाचे अशोक मुडे यांनी वाजपेयींच्या काही मुक्तछंदातल्या कविता आणून दिल्या आणि त्यांनी त्यास चाल लावण्याची विनंती केली. त्यांच्या कविता वाचून मी खूपच प्रभावित झाले. पुढच्या पिढीला प्रभावित करणार्‍या त्यांच्या कविता वाचल्यावर मी त्यांना चाल लावण्याचे ठरवले. १९९७मध्ये आम्ही या कवितांचे ध्वनिमुद्रण करायला सुरुवात केली. त्या वेळी अटलजी खासदार होते. त्यानंतर ते लगेच पंतप्रधान बनले. हा अतिशय सुंदर योग या वर्षात जुळून आला.

कवितांचे ध्वनिमुद्रण झाल्यानंतर काही दिवसांमध्येच अटलजींना भेटण्याची संधी मिळाली. त्यांना त्या कविता ऐकवल्या. तो दिवस होता ९ ऑगस्ट १९९७. माझ्या आयुष्यातला हा क्रांतिदिन मी कधीही विसरू शकत नाही. मला लहानपणापासून अटलजींबद्दल आदर होता. टीव्हीवर त्यांना पाहिले होते. त्यांच्याविषयीचे वाचनही खूप केले होते. मात्र, त्यांना भेटण्याचा हा योग पहिल्यांदाच आला. ती अतिशय सुंदर अशी भेट होती.
एका कवितेतून अटलजी म्हणतात,
मेरे प्रभू,
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना,
गैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना।
नुकतेच म्हणजे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी आम्ही दिल्लीला गेलो होतो, तेव्हा वाजपेयींची आम्ही भेट घेतली. त्यांची प्रकृती साधारण असल्यामुळे त्यांच्या घरीच आम्ही भेटलो. त्यांच्या इच्छेनुसार मी त्यांच्यासमोर परत कविता गायल्या. तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे तेज दिसत होते, त्यांच्या चेहर्‍यावर जो आनंद दिसत होता, तो माझ्यासाठी सोनेरी असा क्षण होता. त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या आप्तेष्टांनी मला सांगितले की, आमचे साहेब खूप खुश झालेत. त्यांना खूप आनंद झाला आहे.

शब्दांकन - माधवी कुलकर्णी, सोलापूर