आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटकेचं घड्याळ मोलाचं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळेचं बंधन न पाळणे हा एक सामाजिक रोग आहे. आपण कधी असा विचार करतो का की, वेळेचं बंधन पाळलं नाही तर आपला किती वेळ वाया जातो. आपला, दुसऱ्यांचा, समाजाचा आणि देशाचासुद्धा!
का ही लोकांना वाटतं की, कार्यक्रमामध्ये जर आपण वेळेवर पोहोचलो तर आपलं महत्त्व कमी होतं. लोक आपल्याला वेडं समजतात. कुठेही एक-दोन तास उशिरा पोहोचलं म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइमवर आल्यासारखं वाटतं. तसं पाहिलं तर ही लज्जित होण्यासारखी गोष्ट आहे.
आपण काही उदाहरणं पाहू.

- एका महत्त्वाच्या बैठकीला जायचे आहे. रस्त्यामध्ये सिग्नल, वाहतुकीचा खोळंबा असणार, हे आपल्याला माहीत असते. ऑफिस उघडायच्या व बंद व्हायच्या वेळेस रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. आपण हे लक्षात ठेवत नाही की, थोडा वेळ आधी निघायला पाहिजे, म्हणजेच आपण वेळेवर पोहोचू, आपल्यामुळे तेथील लोकांचा वेळ वाया जाणार नाही. आपण हे छानपैकी विसरतो की, याच जागेवर इंटरव्ह्यू देण्याकरिता वेळेवर पोहोचलो होतो.

- तुम्ही मित्राला भेटण्याची चार वाजताची वेळ दिली, घरून वेळेवर निघालात. जाताना मार्केटमध्ये काही काम आठवलं. तुम्हाला वाटतं की, दहा मिनिटांत काम आटोपून घेऊ, पण दहा मिनिटं तर कार पार्क करायलाच लागली. तुम्ही तुमचा वेळ वाचवला, पण मित्राचा एक तास घालवला.

- डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. सकाळी नऊला जायचं होतं, पण निघायला साडेनऊ वाजले. त्यामुळे तुमचा नंबर येऊन गेला. नऊनंतर डॉक्टरांना व्हिजिटला बाहेर जायचे आहे. जर तुम्ही वेळेवर आला असता, तर तुमचं चेकअप आजच झालं असतं.

- बाहेर जाण्यासाठी पती तयार होऊन उभे आहेत. आठ वाजता निघायचं ठरलं होतं. आता नऊ वाजायला आले आहे, आत पत्नी तयारी करत आहे. कधी मॅचिंग ब्लाउज, तर कधी कानातले, हेअर पिन्स शोधत आहे. तिला जर वेळेची काळजी असती तर एक तास आधीच तयारी सुरू केली असती.

- रात्रीच्या जेवणाचं चार कुटुंबांना आमंत्रण दिलं. आठची वेळ दिली. सर्व तयारी करून, कपडे बदलून वाट बघत होते. दोन कुटुंब वेळेवर आलेत, तिसरे नऊला तर चौथे साडेनऊला आले. थंड पेय गरम व गरम जेवण थंड व्हायला लागलं. जे सुरुवातीला आले त्यांना असं वाटायला लागलं की, आम्ही घरी रिकामेच असतो. परंतु उशिरानं येणाऱ्या लोकांना त्याचं काहीच वाटत नाही, कारण विचारलं तर सहज वेळ झाला म्हणून सांगतात.

- लग्नाची वरात तर नेहमीच उशिरा पोहोचते. त्यांना वधुपक्षाकडील लोकांचं भानच राहात नाही. वरात रस्त्यावरून वाजत-गाजत, नाचत, थांबत येत असते. त्यामध्ये कुणालाच वेळेचं बंधन नसतं.

- काही लोक आपलं महत्त्व दाखविण्याकरिता विनाकारण वेळानं येतात. मेव्हण्याचा साखरपुडा आहे व जावई वेळेवर न आल्यामुळे विधी अडले आहेत. मुहूर्ताची वेळ टळली आहे. पाहुणे जेवणाची वाट पाहात आहेत. एक-दीड तासाने जावई येतात. विचारलं तर सांगतात, अरे यार, एक रविवारच तर मिळतो सकाळी जास्त वेळ झोपायला. अतिशय साधारण कारण असतं. परंतु असं केल्यानं आपलं महत्त्व वाढत नाही.

- बरेच पती जाताना सांगून जातात, मी अर्ध्या तासात येतो, तू तयारी करून ठेव, आपण बाजारात जाऊ. पत्नी तयारी करून वाट पाहात आहे. एक तास झाला तरी पती आलेच नाहीत. तिकडे पतींना बरेच दिवसानंतर एक मित्र भेटला. तो आग्रहाने घरी घेऊन गेला. पती फोन करू शकत होते, त्यामुळे पत्नीचा वेळ वाचला असता.

- मोठमोठ्या हस्तींना तर आपली वाट पाहायला लावणेच आवडते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, काही नेते, अभिनेते यांनी ठरवूनच टाकलेलं असतं की, लोकांना वाट पाहायला लावायची. त्यांना त्यांच्या उंच सिंहासनाखाली हे दिसत नसतं.

- विनाकारण उशीर करणे, लोकांना वाट पाहायला लावणे, दुसऱ्यांची अस्वस्थता, असुविधा याचा विचार न करणे असे लोक फक्त स्वत:पुरताच विचार करतात. नव्हे ते स्वत:ला वेगळं समजतात. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, वेळेचं बंधन न पाळणे
हे केवळ सुसंस्काराच्या विरुद्ध आहे, तर त्यासोबतच ते स्वार्थी आणि बेजबाबदारपणाचंसुद्धा लक्षण आहे.
बातम्या आणखी आहेत...