आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेज थ्री आणि पाब्लो नेरूदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरिता तन्वर ही आता ‘बॉम्बे टाइम्स’ची संपादक आहे. ‘पेज थ्री’वर भर देणा-या सरिताचे व्यक्तिमत्त्व पेपरपेक्षा बरेच वेगळे आहे. अभिजात वाचनात रस घेणारी आणि कवितेत रमणारी सरिता लहानपणापासून पुस्तके जमवते आहे. साधारणपणे तीन हजार पुस्तके तिच्या संग्रहात आहेत. नवरा मराठी असल्याने घरात मराठी पुस्तकेही आहेत. सिल्व्हिया प्लाथ ही तिची आवडती कवयित्री. अलीकडे लोकप्रियता मिळवलेला जपानी लेखक हरुकी मुराकामी हा तिचा आवडता लेखक.
मुराकामीचा विषय निघाल्यावर त्याच्याबद्दल सांगितलेच पाहिजे. मुराकामीच्या कथांचे वर्णन काहींनी सररिअलिस्टिक असे केलेय. त्याच्या कथांमधील जपानी वर्ग हा अमेरिकनाळलेला बिटल्स, रॉक ऐकणारा, अमेरिकन जीवनपद्धती अंगीकारलेला वर्ग आहे. त्याचे स्वत:चे उत्तम चालणारे रेस्टॉरंट होते. त्याने एक कादंबरी लिहिली आणि स्पर्धेत पाठवली. तिला बक्षीस मिळाले आणि त्याने ठरवले पूर्णवेळ लेखक व्हायचे. त्याने चक्क रेस्टॉरंट (तेही चालणारे) बंद केले आणि पूर्णवेळ लेखक झाला. तो पहाटे लवकर उठून लेखन करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने दूरवर धावायला सुरुवात केली. 25 कि. मी.च्या अनेक मॅरेथॉन्स तो धावलाय. आजवर अनेक मॅरेथॉन्स त्याने जिंकल्या आहेत. त्याच्या एका कथेत एका मुलीला एक वरदान मिळते. ते कोणते हे लेखक सांगत नाही. पण ते आपला पिच्छा सोडत नाही. एका कथेत गाण्यापासून प्रेरणा घेऊन एक तरुण गव्हाणी जाळून टाकतो. एका कादंबरीत स्थिर मध्यमवर्गीय आयुष्य जगणारा माणूस तरुणपणातल्या प्रेयसीच्या पुन्हा प्रेमात पडतो आणि स्वत:चा विध्वंस करून घेतो. आता हे कथानक अनेकदा आलेय. पण कादंबरीच्या शेवटात दोघे स्वत:ला एका चमत्कारिक विळख्यात गुंतवून घेतात.
एक एक करत सरिताने मुराकामीची सर्व पुस्तके जमवली. तिने ती वाचली. एनिड ब्लायटन या लेखिकेची मिळतील ती पुस्तके मी तिला दिली. तसेच, ‘हाऊ प्राउस्ट कॅन चेंज युवर लाइफ’सारखे अ‍ॅलन डी बोटेनचे पुस्तकही. प्राउस्टने सहा खंडांत ‘रिमेम्बरन्स ऑफ द थिंग पास्ट’ ही कादंबरी लिहिली. अशा दीर्घ कादंबरीचा जीवनाशी मेळ असतो का? असलाच तर कसा? डी बोटेनचे ‘कन्सोलेशन्स ऑफ फिलॉसॉफी’ हे पुस्तक गाजले. त्यानंतरचे हे पुस्तक आहे. बाकी हॉलीवूड ता-यांवरची पुस्तके तिला दिली आहेत. इंग्रजीत यावर विपुल साहित्य आहे. सिल्व्हिया प्लाथ, पाब्लो नेरूदा हे तिचे आवडते कवी. ‘डॅडी’सारखी वडलांवरची धक्कादायक कविता लिहिणारी सिल्व्हिया प्लाथ प्रेमकविता आणि निसर्गकविताही लिहिते. त्या प्रामुख्याने ‘क्रॉसिंग द वॉटर’ या संग्रहात आढळतात. नेरूदाचा एक संग्रह भारतीय प्रकाशनाने प्रसिद्ध केला ‘रेसिडेन्स ऑन अर्थ’. त्याच्या खूप प्रती होत्या आणि आता एकही नाही अशी स्थिती आहे.
‘पर्सेपोलिस’ ही ग्राफिक कादंबरी तिला अत्यंत आवडलेली आहे. निक हॉर्नबीसारखा नवा कादंबरीकारही तिला आवडतो. सर्वच सिनेता-यांशी देवाणघेवाण, मैत्री असली तरी सैफ अली खानच्या दुर्मिळ पुस्तकांच्या संग्रहाबद्दल ती आस्थेने बोलते. मागच्या भेटीत ती शकिराच्या कार्यक्रमासाठी दुबईला चालली होती. मी म्हटले, ‘तिकिटे गिफ्ट मिळालीयत का?’ तर ती म्हणाली, ‘मी नेहमी माझ्या पैशाने तिकिटे काढते.’ असे करणारे फार थोडे संपादक मला माहीत आहेत. अन्यथा संपादक या व्यक्तीवर मोफत पुस्तके, भेटवस्तू आणि तिकिटे यांचा माराच होत असतो. ‘गॉन विथ द विंड’मधल्या ‘स्कार्लेट ओ हारा’शी आपण रिलेट करतो, असे ती सांगते. आणि ‘टु किल अ मॉकिंग बर्ड’ आणि सांताज पिक्युरीचे ‘लिटल प्रिन्स’ ही दोन पुस्तके आपण पुन्हा पुन्हा वाचतो, असे ती सांगते...