आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंतेखाबात-ए-पाकिस्तान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात 11 मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, याचाच अर्थ त्या आधी 21 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. या 21 दिवसांमध्ये नेमके काय होईल, ते सांगता येणे अवघड आहे. दहशतवाद्यांनी त्यांना नको असलेल्या अनेक उमेदवारांना आणि त्यांच्या प्रचारकांना अक्षरश: टिपायचे ठरवले तर ही निवडणूकही मागल्या निवडणुकीप्रमाणेच रक्तरंजित होऊ शकते. त्याची चुणूक येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल, असे काही राजकीय निरीक्षकांना वाटते आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचे पाकिस्तानात पुनरागमन झाले आहे. त्यांना असलेला तालिबानी अतिरेक्यांचा धोका व पाकिस्तानातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता मुशर्रफ यांच्या ‘ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग’ या पक्षासाठी ही सार्वत्रिक निवडणूक अजिबात सोपी नाही. त्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील आणि किती जणांचा अक्षरश: सफाया होईल, तेही सांगता येत नाही; पण तरीही मुशर्रफ यांच्या देशात परतायच्या धाडसी निर्णयाला दाद द्यायलाच हवी. ते आत आले आणि त्यांची बाहेर जायची दारे बंद करण्यात आली. न्यायालयाने त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही, असे बजावले आहे.
मुशर्रफ का परतले, याची कारणेही अनेक आहेत. अमेरिकेने त्यांना ‘पाकिस्तानात जा, तिथे तुमची गरज आहे’, असे सांगून पाकिस्तानात परतायला भाग पाडले आहे. ते स्वत: चित्रळमधून निवडणूक लढवणार आहेत आणि ते निवडूनही येतील. चित्रळ हा माजी लष्करी अधिकार्‍यांचाच भाग आहे. तिथे सुशिक्षित मतदार आहेत आणि त्यांच्यामध्ये मुशर्रफ यांच्याविषयी अजून आकर्षण आहे. अमेरिकेविषयी पाकिस्तानी जनतेमध्ये असलेली नाराजी अद्याप संपलेली नाही. अशा वेळी अमेरिकेच्या सांगण्यावरून मुशर्रफ पाकिस्तानात परतले, या विरोधी प्रचाराला त्यांच्या पक्षाला सामोरे जावे लागणार आहे. मुशर्रफ यांचे एकूण सहा विरोधक आता तसेही सक्रिय होणार आहेत. त्यापैकी एक हे पाकिस्तानच्या अध्यक्षपदी असलेले आसिफ अली झरदारी आहेत. त्यांच्या पत्नी आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना ठार केल्याच्या कटात खुद्द मुशर्रफ यांचेच नाव गोवले गेले आहे. त्यांच्या विरोधात खटला चालणार आहे. मुशर्रफ यांचा दुसरा विरोधक म्हणजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी. त्या पक्षाच्या बेनझीर या सर्वोच्च नेत्या होत्या. या पक्षाच्या वतीने नॅशनल असेंब्लीमध्ये 20 जानेवारी रोजी ठराव मांडण्यात येऊन बेनझीर हत्या प्रकरणात मुशर्रफ यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती आणि तिला नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने पूर्ण पाठिंबा दिला होता. हा ठराव नॅशनल असेंब्लीत एकमताने संमत झाला आहे. तिसरा विरोधक म्हणजे, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशपदी असलेले इफ्तिकार चौधरी. त्यांना मुशर्रफ यांनी 9 मार्च 2007रोजी पदच्युत करून टाकले होते, पण त्यांनी कराचीपर्यंत ‘लाँग मार्च’ नेऊन आपल्या बाजूने जनमत वळवले होते. त्यांच्या बाजूने आजही असलेले सर्वोच्च व उच्च न्यायालयातले न्यायमूर्ती काय निर्णय करतील, हे सांगता येणे अवघड आहे. 2009मध्ये नवाझ शरीफ यांच्या आग्रहास्तव तेव्हाचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी त्यांची सरन्यायाधीशपदी फेरनियुक्ती केली होती.
मुशर्रफ यांचे चौथे विरोधक नवाब महमद अकबर बुग्ती हे आहेत. त्यांना पाकिस्तानी लष्कराने मुशर्रफ यांच्या सांगण्यावरून ठार केले होते आणि बलुचिस्तानमध्ये या एकाच प्रश्नावर मुशर्रफ यांच्या विरोधात जबरदस्त जनमत आहे. नवाब बुग्ती यांचे चिरंजीव आणि ‘जम्हुरी वतन पार्टी’चे नेते तलाल बुग्ती हे पाकिस्तानात परतले आहेत. त्यांनी आपला पक्ष निवडणुकीच्या रिंगणात काही अटींवर उतरायला तयार असल्याचे म्हटले आहे. त्या अटी म्हणजे, आपल्या बुग्ती जमातीचे जे सदस्य बाहेर डेरा बुग्ती जिल्ह्यात जिवाच्या भीतीने पळून गेले आहेत, त्यांना निवडणुकीत शांततेने भाग घेता आला पाहिजे आणि निवडणुका या शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडल्या पाहिजेत.
आज पाकिस्तानात असलेले हंगामी पंतप्रधान निवृत्त न्यायमूर्ती हज़ारखान खोसो हे बलुचिस्तानचे आहेत. इफ्तिकार चौधरी हेही तिथलेच आहेत. पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त फख्रुद्दीन जी इब्राहिम हे आहेत. हा मुशर्रफ यांच्या विरोधात जाणारा पाचवा ‘ग्रह’आहे. ते अहमदाबादमध्ये शिकलेले आणि ऐन तरुण वयात गांधीजींच्या भाषणांना हजर राहिलेले तसेच अहिंसेवर श्रद्धा असलेले अतिशय प्रामाणिक गृहस्थ आहेत. ते झुल्फिकार अली भुत्तो यांच्या मंत्रिमंडळात होते, ते त्यांचे कायदा सल्लागार होते आणि ते बेनझीर यांच्या मंत्रिमंडळातही काही काळ होते. ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. 1981मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात अस्थायी न्यायमूर्ती असताना, तेव्हाचे लष्करशहा झिया उल हक यांनी त्यांना तसेच इतर न्यायमूर्तींना तेव्हाच्या नव्या तात्पुरत्या घटनेनुसार नव्याने शपथ घ्यायचा ‘आदेश’ दिला होता. त्या वेळी त्यांनी तसेच दोराब पटेल आणि सरन्यायाधीश शेख अन्वरूल हक यांनी त्यास नकार दिला होता. असा आदर्श निवडणूक आयुक्त असताना ते कुणाचीही अरेरावी सहन करतील, असे वाटत नाही. ही सर्व परिस्थिती मुशर्रफ यांना मानवेल अशी नाही.
मुशर्रफ यांचा सहावा आणि सर्वात महत्त्वाचा विरोधक जो आहे, तो अर्थातच तालिबानी वृत्तीचा आहे. ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेपासून ते अल काईदापर्यंत सर्व दहशतवादी संघटना त्यांच्या विरोधात आहेत. ज्या ‘जैश-ए-महंमद’ किंवा ‘लष्कर-ए- तोयबा’ यांसारख्या दहशतवादी संघटना आहेत, त्या मुशर्रफ यांच्या अंगाला हात लावणार नाहीत कदाचित; पण इतर संघटना विशेषत: तालिबान हे त्यांना जुमानतील असे वाटत नाही. लाल मशिदीवरील लष्करी कारवाई अजून ठसठसते आहे. तेव्हा हा हिंसक विरोधक निवडणूक काळात काय करेल, ते सांगता येत नाही. सांगायचा मुद्दा, मुशर्रफ यांना ही निवडणूक सोपी नाही; तरी अमेरिकेने भरीला घालून त्यांना पाकिस्तानात परत पाठवले आहे. कदाचित कयानी हे त्यांच्या मदतील उभे राहतील आणि सर्व निवडणूकच पाण्यात जाईल, अशीही एक शक्यता आहे. त्यामुळे हा धोकादायक जुगार खेळण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तान ‘तेहरिक-ए- इन्साफ’ हा इम्रान खान यांचा पक्ष जोरात दिसत असला, तरी तो अजून मूळ धरतो आहे. गेल्या निवडणुकीवर त्या पक्षाने बहिष्कार टाकला होता. इम्रान खान यांना ऐकणारा तरुण वर्ग आहे; पण केवळ या वर्गावर भिस्त ठेवून निवडणूक जिंकता येईल, असे नाही. पाकिस्तान पीपल्स पार्टीला बेनझीर यांच्या हत्येनंतर निवडणुकीत जो लाभ झाला, तोही निर्विवाद नव्हता. त्यांच्या पक्षाला नॅशनल असेंब्लीत 342 जागांपैकी 121 जागा मिळाल्या होत्या. मुत्तहिदा कौमी मुव्हमेंट आणि पाकिस्तान मुस्लिम लीग यांच्या सहकार्याने तो पक्ष केंद्रात सत्ता मिळवून बसला. या निवडणुकीत नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग बहुमत मिळवू शकेल, अशी शक्यता आहे. तो पक्ष जर विजयी झाला, तर पुन्हा एकदा नवाझ शरीफ हेच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील. त्या वेळी ‘मिस्टर टेन पर्सेंट’ म्हणून ओळखले गेलेले झरदारी काय किंवा आता काही तरी चमत्कार घडवू, या ईर्षेने पाकिस्तानात परतलेले मुशर्रफ काय; त्यांचे काय होणार, हे प्रश्नचिन्हच आहे.
arvindgokhale@gmail.com