डेड मॅन अँड द सी!
पाकिस्तानमध्ये विनोदी प्रहसनात्मक लिखाण कसे केले जाते त्याचा नमुना वाचण्यासारखा आहे. 'डॉन' वृत्तपत्रात नदीम परचा हे आपला स्तंभ चालवतात. त्यांनी ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर 'डॉन'मध्ये लिहिलेल्या 'डेड मॅन अँड द सी' या गमतीदार मजकुराला वाचकांचा भन्नाट प्रतिसाद मिळाला.
-
मृत माणूस आणि सागर!
ते लिहितात, 'आम्ही आमच्या अमानवी शक्तिकेंद्राला (प्लँचेटसदृश) लादेनशी संपर्क साधण्यास सांगितले. लादेनच्या आत्म्याशी आम्ही बोलू लागलो.
'आम्हाला सांगा, की अबोटाबादमध्ये ज्या रात्री तुम्हाला मारण्यात आले तेव्हा नेमके काय घडले?'
'श्रीमान ओसामा, तुम्हाला आम्ही काय म्हणतो आहोत ते ऐकू येते आहे काय?'
बुडबुडे, बुडबुडे, बुडबुडे...
'मला वाटते, आपल्यातून निघून गेलेल्या आत्म्याशी संपर्क साधण्यात आम्हाला यश आले असावे. श्रीमान ओसामा, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो आहे का?'
'होय, पण मी आता कोठे आहे? हा काय स्वर्ग आहे?'
'नाही सर, तुम्ही स्वर्गात नव्हे तर सागराच्या तळाशी आहात.'
'सागर? हं... होय, तसं काही तरी असावं असं दिसतंय. मी खरेच मेलो आहे काय?'
'होय, म्हणजे तसेच काही तरी...'
'हं. मी कसा मेलो?'
'मला वाटले, की तुम्हीच आम्हाला कसे घडले ते सांगाल...'
'मला आठवतंय ते एवढंच, की मी त्या रात्री काकुलची पोरं जेवण घेऊन येतील अशा अपेक्षेने दरवाजाकडे डोळे लावून बसलो होतो. आणि एकदम कॉप्टर्सचा आवाज आला. मला वाटले, की काकुलच्या पोरांनी आपल्यासाठी जंगी पार्टी द्यायचे ठरवले असावे. मी एकदम उल्हसित झालो...'
'काकुलची पोरं तुम्हाला कोणत्या प्रकारची मेजवानी देत असत?''सोमवारी आणि मंगळवारी बिर्याणी, चिकन चाऊमेन बुधवारी, गुरुवारी मांस, शनिवारी संमिश्र भाज्या, रविवारी...'
'अहो हो, पण शुक्रवार राहिला ना, शुक्रवारी काय दिलं जात असे?'
'शुक्रवारी मात्र मीच त्यांना जेवायला पाचारण करत असे. माझी येमेनी पत्नी त्यांच्यासाठी शिजवलेलं मांस तयार करत असे.'
'अच्छा, म्हणजे तुम्ही तिथं लपून राहिलेले आहात हे त्यांना माहीत होतं तर...'
'म्हणजे काय, त्या तर माझ्या बायका आहेत...'
'अहो मी काकुलच्या पोरांबद्दल बोलतोय.'
'ओ, असं होय. गुप्तचरांच्या अहवालानुसार मी उंटांचा अरब व्यापारी आहे आणि मी त्यांची निर्यातही करतो.'
'खरंच? त्यांच्याकडं उलट तपासाची काही यंत्रणा आहे की नाही?'
'आपण फक्त असं म्हणू या, की मी त्यांच्या या रडारवर नव्हतो.'
'हं, म्हणजे अमेरिकन हेलिकॉप्टरांचा ज्यांना पत्ता लागला नाही, तीच का ही रडारं?'
'मी तुम्हाला सांगतो की माझी माणसं हीच माझी उत्तम रडार आहेत. हे हे बुडबुडे, बुडबुडे. आणि तुम्ही आता काय म्हणालात, की मी लपून बसलो होतो?'
'तुम्ही लपून बसला होता नाही तर काय?'
'अजिबात नाही.'
'मग त्या अमेरिकनांना तुम्हाला शोधायला एवढी दहा वर्षे का लागली?'
'त्या मूर्खांना गुहा म्हणजे काय ते कुठं माहीत आहे?'
'अहो पण सर, तुम्ही जिथं होता ती थोडीच गुहा होती?'
'अरे माझ्या मित्रा, तुला हे माहीत असायला हवं की सारा पाकिस्तान हीच मोठी गुहा आहे.'
'मग याचा अर्थ असा घ्यायचा का, की पाकिस्तान्यांना तुम्ही या देशात आहात याची व्यवस्थित माहिती होती?'
'माझ्या मित्रा, जर त्यांना ते माहिती नसते तर ते पाकिस्तानी राहिले नसते. ऽ ऽ..' बुडबुडा, बुडबुडा.
'काय?'
'जाऊ दे.'
'अच्छा, मग तुमचे म्हणणे असे, की त्यांना तुमचा इथला मुक्काम माहीत होता?'
'खरं सांगायचं तर... मला वाटते माझ्या कानात मासा अडकलाय. प्लॉप प्लॉप... बाप रे. हा तर लाल रावस दिसतोय! हं, मग तुम्ही काय म्हणत होता? आणि काय रे, तुझं नाव काय?'
'अब्दुल कादिर अवामी बदामी.'
'अरे, हे तर अगदी चमत्कारिकच नाव आहे!
तू हिंदू तर नव्हेस ना?'
'नाही.'
'हं, पण तरीही मला तुला मारावंच लागेल.'
'पण तुम्ही तर कधीच मेलेले आहात.'
'खरंच मी विसरलो होतो.
आता यापुढला संवाद लिहीत नाही. तो बराच मोठा आहे.
हे सदर दर आठवड्याला प्रसिद्ध होईल