आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक भावनांच पंक्चरीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिल्लीतील बलात्कारानंतर चर्चा खूप होतेय पण या प्रकरणातले मुळातले मुद्दे ज्यावर समाजात सखोल चिंतन व घुसळण होणे आवश्यक आहे त्यांकडे मात्र दुर्लक्ष होते आहे.
या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. आंदोलन हीदेखील एक प्रतिक्रिया होती; पण या सगळ्यात दिसला तो तद्दन भावूक दृष्टिकोन, जो अशा विषयांसाठी घातक ठरतो. त्यामुळे संतापाचा भडका उडतो; पण मुळातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. या प्रकरणातली अमानुषता लक्षात घेतल्यास पहिली तडक प्रतिक्रिया संतापाची, रागाची असणं साहजिक आहे; पण त्यानंतर मात्र प्रकरणाकडे आपण सामाजिक व मानसिक, लैंगिक समस्या म्हणून पाहतो का आणि आपण अंतर्मुख होऊन आपल्याच दैनंदिन जगण्याकडे पाहतो का, असे प्रश्न महत्त्वाचे ठरतात.

असे घृणास्पद कृत्य करणा-या ला कडक शासन होणे मान्य आहे. पण हे शासन ही घटना घडून गेल्यानंतर होणारी क्रिया झाली. ती होऊ नये यासाठी काय करावं लागेल, असा विचार केला जातोय का? अश्लील चाळे करणा-या वरच आजवर बलात्कार झालेले आहेत का, तर तसेही नाही. सहा वर्षांच्या मुलींवरही ते झालेले आहेत. म्हणजे यात प्रश्न मानसिकतेचा आहे. बलात्कार करणे ही एक मानसिक, शारीरिक हिंसा असते. आणखी महत्त्वाचा व खेदजनक पोटमुद्दा असा की, बलात्कारित मुलीचे नाव न सांगणे किंवा ते उघड न करणे. हे म्हणजे अन्याय झालेल्या व्यक्तीचा अपमान आहे. यामागे पुन्हा सामाजिक मानसिकता असल्याचं आढळतं. केवळ लग्नाभोवती फिरणा-या आपल्या समाजात या मुलीची ओळख उघड झाल्यास तिचं लग्न कसं होईल आणि पर्यायाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, असा समज रूढ आहे. एखाद्या अपघातानंतर अपघात झालेल्या व्यक्तीला आपण मदत करतो, दवाखान्यात नेतो; पण या प्रकरणी मात्र पीडित मुलीलाच नाव जाहीर न करण्यासारख्या कृतीतून कोसले जाते. आपण माणसाच्या स्वभाव, आचारविचारापेक्षा, त्याच्या लैंगिक पावित्र्याला महत्त्व देतो. त्यातही स्त्रियांच्या बाबतीत जास्त. परंतु, आपल्याला आत्मसन्मान असतो तसा तो इतरांनाही असतो हे आपण मान्य केलं आहे का? साधारणत: वयाच्या तेरा ते चौदाव्या वर्षी लैंगिक भावना निसर्गत: जागृत होण्यास सुरुवात होते. आणि या वयात त्याला वाट करून देण्यास आपल्या समाजात काही जागा आहे का? की आपल्याला वाटते की, मुता-या मधून लिहिलेले मेसेजेस हीच ती योग्य जागा आहे? हे मेसेज लैंगिक इच्छांचे स्फोट वाटतात. ते वयात येण्याच्या सुरुवातीला होणे नैसर्गिक असले तरी 40व्या वर्षीही ते होत असतात.

ट्रेनमध्ये रिटायरमेंटला आलेल्या प्रौढांच्या आंबट व सूचक गप्पांमधूनही हे छोटे छोटे स्फोट आपल्याला दिसतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. म्हणजे आपण लैंगिकदृष्ट्या प्रगल्भ आहोत का? नसू तर हे आपल्याला कळले आहे का आणि मग त्याही पुढे ते प्रगल्भ होण्यासाठी एक समाज म्हणून आपण काही करतो आहोत का? एकीकडे सेक्सबद्दल बोलू नकोस, विचारू नकोस किंवा तो विषय आला की गप्प बस अशी परिस्थिती असताना दुसरीकडे रोज टीव्हीतून, नेटवरून मात्र तो भरगच्च वाहत असतो. अशा कात्रीत सापडलेल्या आपल्या समाजात अशा लैंगिक इच्छांचे प्रेशर वाढू नये आणि त्यातून असे विकृत स्फोट होऊ नये म्हणून काही पंक्चर सिस्टिम आहे का? काय केल्याने हा विषय समजून घेता येईल, ते आपलेसे वाटतील, त्यातली प्रगल्भता वाढेल, याबद्दल काय प्रयत्न करता येतील यावर विचार केला जातोय का की केवळ मेणबत्त्या पेटवून व फाशी देण्याच्या, जाळून टाका इतक्याच मागणीवरच आपण शांत बसणार आहोत? की व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून पाहता येण्यासाठी लागणारी निकोप, प्रगल्भ दृष्टी तयार करण्यासाठी काही करणार आहोत? याही पुढे आणि अशा विकृती कमी-जास्त प्रमाणात आपल्यातही आहेत याचा अंतर्मुख होऊन विचार करणार आहोत का? त्या आपल्यात आहेत याची आपल्याला जाणीव आहे का? रस्त्यावर अगदी क्षुल्लक कारणासाठी होणा-या हमरातुमरीच्या वेळी आईबहिणीवरून दिलेल्या शिव्या हे काय असते? घरी मुलाला चांगल्या शाळेत घालून मुलीला साध्या किंवा कमी दर्जाच्या शाळेत घालणे हे काय असते? एखादी मुलगी चालत जात असताना मुद्दाम तिला कट मारून जाणे, काही तरी लैंगिक कॉमेंट करणे हे काय असते? घरात लहान भावाला काम न सांगता बहीण म्हणून तिनेच कामं करायची, भावाने फक्त ऑ र्डर्स सोडायच्या ही वृत्ती रुजवणे हे काय असते याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. आता समाजात लैंगिक भावनांचं पंक्चरीकरण करण्यासाठी खुले लैंगिक शिक्षण देणं, व्यक्ती म्हणून पाहता यावं यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं, आवश्यक आहे. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन स्वत:च्या कृतींकडे पाहणं आवश्यक आहे. अन्यथा अत्याचार, संताप, भावनांची विक्री आणि करमणूक याशिवाय हाती काही येणार नाही.

sakhadeopranav@gmail.com