आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandit Lavand Article About Indian Politics Book, Divya Marathi

नेतृत्वाची परिपूर्ण चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राजकारण आणि नेतृत्वाची वाटचाल हे डॉ. प्रकाश पवार यांचे पुस्तक डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे लेखक राजकारणाचे अभ्यासक आहेत. त्यांनी या पुस्तकात नेतृत्वाचा मुद्दा चिकित्सकपणे मांडलेला आहे. सकलजनवादी नेतृत्व राजकारणाचे बळकटीकरण करते, असे लेखकाचे मत आहे. नेतृत्व हा विषय विरोधाभासात्मक स्वरूपाचा असतो. त्या विषयामध्ये दुभंगलेपण असते. अशा प्रकारचा विषय अद्यापपर्यंत मराठी भाषेत नेटकेपणाने हाताळला गेलेला नाही. हे पुस्तक या गोष्टीला अपवाद ठरते. या पुस्तकात नवीन विषय मांडला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेतृत्वाच्या चौकटीमध्ये मांडणी केली आहे. पुस्तक पाच विभागांमध्ये विभागले आहे. ‘नेतृत्वाचा सकलजनवादी आशय’ हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. व्यक्तिगत नेतृत्व, गटलक्ष्यी नेतृत्व, बहुसंख्याकवादी नेतृत्व आणि सकलजनवादी नेतृत्व अशा चार रंगछटा लेखकाने मांडलेल्या आहेत.

पुस्तकातील पाच विभागांचा सांधा एकमेकांशी सकलजनवादाने जोडला आहे. ‘सकलजनवाद’ हा पुस्तकामधील नवीन विषय आहे. तसेच पुस्तकामध्ये नेतृत्वाच्या सामाजिक आणि आर्थिक संघर्षाची लक्षवेधक मांडणी केली आहे. पहिल्या विभागामध्ये नेतृत्वाची उपेक्षा, राजकीय भागीदारी आणि भारतीय नेतृत्वाची उत्क्रांती आणि अंतर्विरोध अशी तीन प्रकरणे आहेत. नेतृत्व सत्तेचा पाठपुरावा करत असते, हा मुद्दा प्रारंभी नोंदविला आहे. भारतीय समाजातील वर्गवारींमधून राजकीय भागीदारीचे वेगवेगळे दावे केले जातात, या मुद्द्याची चर्चा दुसर्‍या प्रकरणामध्ये केली आहे. लोकमान्य टिळक, गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या माध्यमातून ही चर्चा केली आहे. ‘राजकीय नेतृत्व संकल्पनेतील पेचप्रसंग आणि राजकीय व्यवहार’ हा या पुस्तकातील दुसरा भाग आहे. हिंदुत्व विचारावर आधारित नेतृत्वाचा विकास कसा झाला, या मुद्द्याची चर्चा या भागामध्ये केली आहे. गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आशय राजकीय व्यवहारांशी संबंधित मांडला आहे. सध्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत राजकीय नेतृत्वाच्या स्पर्धेची संकल्पना महत्त्वाची मानली जात आहे. या विभागात त्या संदर्भात चर्चा करीत असतानाच नवभांडवलशाहीच्या चौकटीमध्ये लेखकाने राजकीय नेतृत्व आणि राजकीय अर्थकारण यांचे संबंध जोडले आहेत.

‘धुरीणत्व’ हा नेतृत्वाचा मध्यवर्ती आशय असतो, हा मुद्दा अंतोनिओ ग्राम्सी यांनी सांस्कृतिक अंगाने मांडला आहे. या मुद्द्याच्या चौकटीमध्ये लेखकाने तिसर्‍या भागाची मांडणी केली आहे. सकलजनवाद धुरीणत्वाच्या अंगाने विकास पावतो. यामधूनच सांस्कृतिक धुरीणत्व उदयास येते. हा मुद्दा ‘राजकीय धुरीणत्व व वर्चस्वाची निवडक प्रारूपे’ या तिसर्‍या विभागात चार प्रकरणांमध्ये मांडला आहे. यशवंतराव चव्हाण, ज्योती बसू, माणिक सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची उदाहरणे घेऊन येथे लेखकाने नेतृत्वाची मांडणी केली आहे. उद्योग, शेती, उच्च जाती, वर्चस्ववादी जाती, दलित जाती यांच्यातील सामाजिक अंतरायाच्या पुढे जाऊन यशवंतराव चव्हाण यांनी सकल जनांच्या हितसंबंधाचे राजकारण केले. सकल जनांच्या हितसंबंधाचा लघुतम साधारण मध्य यशवंतराव चव्हाणांनी काढला होता. त्यामुळे चव्हाणांचे राजकारण केवळ ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या स्वरूपाचे नव्हते. यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व सकल जनांचे होते, असे विश्लेषण लेखकाने येथे केले आहे. ज्योती बसू यांचे नेतृत्व पक्षामुळे चर्चाविश्वाचा भाग झाले नाही. तथापि ज्योती बसू यांनी लोकशाही चौकटीमध्ये अहिंसक पद्धतीने राजकीय व्यवहार केला. अशा प्रकारचा राजकीय व्यवहार केल्याने त्यांच्या नेतृत्वासंदर्भात पंतप्रधानपदाविषयी चर्चा झाली. त्यांनी पश्चिम बंगालमधील विविध गटांच्या हितसंबंधांचा लघुतम साधारण मध्य साधला होता. म्हणून ज्योती बसू यांच्या नेतृत्वामध्ये धुरीणत्व होते. त्रिपुरामध्ये हिंसा बाजूला करून माणिक सरकार यांच्या नेतृत्वाने लोकशाहीचा साधेपणा ठळकपणे पुढे आणला. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये मार्क्सवादी नेतृत्वाचा -हास होत असतानाच्या संदर्भात लेखकाने ज्योती बसू व माणिक सरकार यांच्या नेतृत्वाची चर्चा केली आहे, हे विशेष महत्त्वाचे आहे. ज्योती बसू व माणिक सरकार यांच्या नेतृत्वामुळे राजकारणाचे राजकीयीकरण घडून आले. आम आदमी पक्षामधून अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाचा उदय झाला आणि मध्यमवर्गाने प्रथमच राजकारण करण्याची भूमिका घेतली. यातून मध्यमवर्गाचा राजकारणविषयक बदललेला दृष्टिकोन दिसून येतो. मध्यमवर्गामध्ये राजकारण करण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली आहे. हा भारतीय राजकारणातील जात आणि हिंदुत्वानंतरचा तिसरा चेहरा आहे. त्याची मांडणी लेखकाने दमदारपणे केली आहे.

भारतात राजकीय समावेशनाचा दावा करणारे नेतृत्व आहे. हे नेतृत्व दलित आणि ओबीसी यांच्या राजकीय समावेशनाची चर्चा करते. हा मुद्दा ‘नेतृत्व आणि प्रतिनिधित्वाचे दावे’ या चौथ्या विभागात मांडला आहे. या विभागात पाच प्रकरणे आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक अशा तीन राज्यांचा संदर्भ घेऊन सौक्ष्मिकपणे ही प्रकरणे लिहिली आहेत. बाबू जगजीवन राम, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, बाळ ठाकरे आणि सिद्धरामय्या या नेतृत्वांच्या भोवती ही मांडणी केली आहे. या विभागात ओबीसी नेतृत्वाचा व्यवहार आणि संघर्ष मांडला आहे. पाचव्या विभागामध्ये प्रादेशिक नेतृत्व व प्रतिनिधित्व यांच्या राजकारणाची चिकित्सा केली आहे. नवीन पटनायक या प्रादेशिक नेतृत्वाचा सखोल आढावा घेतला आहे. शेवटचे प्रकरण राजकीय व प्रशासकीय नेतृत्व यांच्यातील वादाच्या संबंधावर आधारलेले आहे. सकलजनवादी निर्णय प्रक्रिया असते तेव्हा प्रशासकीय नेतृत्व राजकारणात हस्तक्षेप करत नाही. मात्र राजकीय नेतृत्व अपयशी झाल्यामुळे प्रशासकीय नेतृत्वाकडे अधिकार व सत्ता सरकते. या संदर्भातील चर्चा करताना यशवंतराव चव्हाण व शंकरराव चव्हाण यांच्या राजकारणाचा आढावा घेतला आहे. पुस्तकामध्ये न्या. महादेव गोविंद रानडेंपासून अरविंद केजरीवालांपर्यंतचा आढावा घेतला आहे; परंतु संपूर्ण पुस्तकाची मांडणी मुद्द्यांच्या अनुषंगानेच झाली आहे.

भारतीय राजकारण व नेतृत्वाची वाटचाल - राजकीय धुरीणत्व-वर्चस्व
- लेखक - प्रकाश पवार
- प्रकाशक - डायमंड पब्लिकेशन
- पृष्ठसंख्या - 250 ० किंमत - 250 रुपये.