आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसिपी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटी बटाटा
साहित्य-अर्धा ब्रेड, चार मोठे बटाटे, सहा हिरव्या मिरच्या, कढीलिंब, कोथिंबीर, खोबरे, उडदाची डाळ, जिरे, मीठ, हळद, तूप.
कृती- प्रथम बटाट्याची सालं काढून त्याच्या लांबट आकाराच्या फोडी कराव्यात. कापलेल्या फोडी पाण्यात टाकाव्यात. ब्रेडच्या स्लाइसचे उभे पाच तुकडे करावेत. ब्रेडच्या कापलेल्या स्लाइस तुपात तळून घ्याव्यात. ओलं खोबरं, मिरच्या कोथिंबीर, जिरे, हळद, याचं वाटण तयार करावं. तुपामध्ये मोहरी, कढीलिंब आणि उडदाची डाळ घालून फोडणी करावी. त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात. मधून-मधून ही फोडणी हलवत राहून त्यावर झाकण ठेवावे. बटाटे शिजले की त्यात वर केलेले वाटण घालावे. मीठ घालून वरून तळलेला ब्रेड घालावा. ब्रेडच्या स्लाइस घातल्यानंतर थोडेसे हलवल्यानंतर मिश्रण खाली काढावे आणि गरम-गरम वाढावे.

मद्रासी उपमा
साहित्य-दोन वाट्या तांदळाचा रवा, एक चमचा उडीद डाळ, दोन चमचे चणाडाळ, अर्धी वाटी आंबट ताक, चवीनुसार मीठ, लाल किंवा हिरव्या मिरच्या, चमचाभर आल्याचा किस, तेल, काजू, ओले खोबरे, कढीपत्ता, भाजलेले दाणे.
कृती- सर्वप्रथम रवा तेलावर भाजून घ्या. तेलाची फोडणी करून त्यात दोन्ही डाळी खमंग परतून घ्या. त्यानंतर त्यात कढीलिंब, ताक, आल्याचा किस, मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि तीन वाट्या उकळलेले पाणी घालून उकळत ठेवावे. या मिश्रणाला उकळी येण्याच्या बेताला हळू-हळू ढवळत राहून रवा घालावा आणि झाकण ठेवून मंद आचेवर चांगली वाफ आणावी. त्यानंतर काजू किंवा दाणे घालून हलक्या हाताने हलवावे. गरमा-गरम उपमा भरपूर ओले खोबरे घालून खाण्यास द्यावा.

कोबीच्या वड्या

साहित्य-कोबीचा किस दोन वाट्या, बेसन दीड वाट्या, वाटलेलं आलं-लसूण दोन चमचे, 10-12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर अर्धी वाटी, आमचूर पाव चमचा, सोडा पाव चमचा, तेल एक चमचा, मीठ चवीनुसार.
कृती- वरील सर्व मिश्रण, वाटलेली मिरची, आणि थोडेसे तेल एकत्र करा. चांगले मळून हे मिश्रण थाळीला तेल लावून हे मिश्रण त्यावर एकसारखे थापून घ्या. थापलेल्या मिश्रणाची थाळी एका चाळणीवर ठेवून ही चाळणी पाणी घातलेल्या पातेल्यावर ठेवा. हे पातेले मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे गॅसवर ठेवा. पंधरा ते वीस मिनिटांनंतर या मिश्रणाच्या वड्या तयार करून त्याला आवडीप्रमाणे फक्त फोडणी द्या किंवा तळून घ्या. तयार वड्यांवर कोथिंबीर खोबरे टाकून खाल्ल्यास चवही छान लागते.


पंजाबी दाल मखनी
साहित्य-एक वाटी संबंध उडीद, अर्धी वाटी राजमा, पाव वाटी चणाडाळ, आल्याचा मध्यम आकाराचा तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या, चमचाभर वाटलेला लसूण, अर्धा चमचा गरम मसाला, तीन चमचे लोणी, कोथिंबीर मीठ चवीनुसार.
कृती- आदल्या दिवशी रात्री चणाडाळ आणि राजमा भिजत घालावा. दुस-या दिवशी संबंध उडीद कढईत भाजून घ्यावेत. भाजलेले उडीद पूर्णपणे गार झाल्यावर चांगले धुऊन घ्यावेत. उडीद धुतल्यानंतर त्यात दोन वाट्या पाणी घालावे. त्यातच आदल्या दिवशी भिजवलेला राजमा आणि चणाडाळ घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजलेले मिश्रण साधारण घट्टसर राहू द्यावे. या मिश्रणात मीठ, आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण घालून शिजत ठेवावे. तेलात हिंग, मोहरी, हळदीची फोडणी करून ती आमटीवर घालावी. गॅस बंद करून त्यावर थोडा गरम मसाला, लोणी आणि कोथिंबीर घालून लगेच वाढावी.