आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगेतल्या डुबक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियाने माणसाच्या ओंजळीत २४x७ माहिती आणि मनोरंजनाची खाण आणली आहे.माहितीचा एक प्रवाह वाहता ठेवत त्याचं ज्ञानगंगेत रूपातंर करण्याचं, एक मोठं काम सोशल मीडियावरचे प्रवाह करताहेत. त्यात डुबकी न मारणारा आजच्या तारखेला कमनशिबी मानला जातो...

साधारण दीड वर्षे आधीपर्यंत एसेमेस मार्केटिंग आमच्या व्यवसायाचा भाग होता. आज तो जवळजवळ नाहीच. कारण व्हॉट्सअॅपमुळे जग बदललंय. व्हॉट्सअॅपने मेसेजिंग अक्षरशः गिळून टाकलंय. संवादाचे सगळे संदर्भ बदललेत. सकाळी उठल्यावर तळवे बघत 'कराग्रे वसते लक्ष्मी' म्हणणारा मध्यमवर्गीय, आता सकाळी उठल्यावर प्रथम ओंजळीत स्मार्टफोन घेऊन व्हॉट्सअॅपवरचे संदेश बघत बसू लागलाय. व्हॉट्सअॅप जगण्याचा एवढा भाग झालाय की, व्हॉट्सअॅपच्या अॅडिक्शनमधून बाहेर कसं पडायचं, या विवंचनेत लोक लागलेत.
गेल्या दीड वर्षांतस्मार्टफोन पेनट्रेशन विलक्षण वेगाने झालंय. महाराष्ट्रात आजघडीला दोन कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोन आहेत. देशभरात अंदाजे २० ते २५ कोटींच्या घरात स्मार्टफोन आहेत. आणि यात वर्षाला सुमारे ६० टक्क्यांनी भर पडत चाललीय.

त्यामुळे ज्याला ‘सेकंड वेव्ह ऑफ इंटरनेट’ म्हणतात, ती स्मार्टफोनच्या माध्यमातून होतेय. फक्त शहरी भागात नाही तर ग्रामीण भागातही या लाटेचा वेग टिकून आहे. वानगीदाखल सांगतो. साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही एक अॅप बनवलं होतं. आमचा होरा होता की हे अॅप फक्त शहरी भागातच जाईल. मात्र अॅप सादर झालं, तेव्हा एक महिन्यात तीन चतुर्थांश डाऊनलोड्स ग्रामीण भागातून होती. त्यामुळे आम्हाला अॅपची भाषा, लूक सारंच बदलावं लागलं. फेसबुकवर आजघडीला ८५ टक्के कम्युनिकेशन रिजनल लॅन्ग्वेजेसमधून होतंय. युनिकोडचा प्रसारही वाढतोय. त्यामुळे फेसबुक मार्केटिंगवाले आता स्थानिक भाषांमध्ये कॉण्टेंट क्रिएट करणाऱ्यांना शोधू लागलेत.

अर्थातच, विषय कॉण्टेंटचा आहे. स्मार्टफोन किती फोफावलाय यापेक्षाही स्मार्टफोनने बहाल केलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बहरलेल्या क्रिएटिव्हीटीने लोकांना जे विलक्षण वेड लावलंय, त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय. या सोशल मीडियाचे ज्ञात-अज्ञात निर्माते हा सगळ्यांच्याच कुतुहलाचा विषय आहे.

काही वर्षांपूर्वी ‘कोलावरी डी' हे गाणं इंटरनेटवरच्या सोशल मीडियावरून गाजलं होतं, हे अनेकांना आठवत असेल. तसाच प्रकार सध्या संजय लोंढे यांच्या ‘शांताबाई’ या गाण्याबाबत झाला आहे. ‘शांताबाई’ गाणं केवळ गाजलंच नाही, तर शांताबाई गाण्यावर लोकांनी वेगवेगळ्या क्लिपिंग्ज लावून त्याची पॅरोडी केली. अगदी दारुड्या शांतारामचं अगदी तस्संच गाणं आलं. शांताबाई गाण्याचं मीटर वापरून आणि ओळींमध्ये फेरफार करून मोदींच्या फॉरेन टूरवर विडंबन करणारं ‘कमळाबाई’ हे गाणंही आलं. ‘ये शांताबाई कौन है...’ या जोक्सने तर धमाल उडवून दिली. लोंढेंनाही प्रसिद्धी मिळाली. आता त्या प्रसिद्धीचा व्यावसायिक फायदा कसा करून घ्यायचा, हे त्यांचं कौशल्य राहील.

सोशल मीडियाचा व्यावसायिक उपयोग अनेक लोक करून घेतात. ‘होणार सून, मी या घरची' या मालिकेचा टीआरपी खाली घसरत असताना जान्हवीच्या तोंडचं 'काहीही हां श्री!' हे वाक्य आणि त्यावरून आलेले जोक्स यांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्याचा अर्थातच, या मालिकेच्या प्रसिद्धीला प्रचंड फायदा मिळाला. ही स्मार्ट प्रसिद्धी होती.

अर्थात, सगळ्या बाबतीतच व्यावसायिक मूल्य असत नाहीत. बर्‍याचदा रक्तदानाचे मेसेज फिरतात. हरवलेल्या मुलाचा फोटो दिला जातो. काठीवर कागदी झेंडा रोवून झेंडावंदन करणाऱ्या आदिवासी मुलांचा फोटो तर खूपच व्हायरल झाला होता. अगदी अमेरिकेतल्या भारतीय ग्रुप्सवरही हा फोटो फिरला. नऊवारीमध्ये असलेल्या दोन ग्रामीण महिला मोटरबाइक चालवतानाचा फोटोही लोकांना सुखावून गेला, त्यांनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मूल कडेवर घेऊन कष्ट करणाऱ्या भारतीय कामगार महिलेचा फोटोही लोकांनी मोठ्या प्रमाणावर शेअर केला.

सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आहे. आज कुठलीही ‘ब्रेकिंग न्यूज’ सर्वात प्रथम सोशल मीडियावर येते. अफवांचं पेवही इथेच फुटतं. व्हिडियो, गाणी, कविता, स्केचेस, मेमे, फोटोग्राफ, कार्टून, बीभत्स जोक्स, जहरी टीका, तिरकस विनोद, प्रमोशन, प्रौढी, वाढदिवस, सणवार, जयंत्या-मयंत्या असं सारं काही सोशल मीडियावर असतं.

थोडक्यात, लोकांना काहीतरी चांगलं शेअर करायची ऊर्मी आहे. लोकांचा इंटेलिजण्ट कोशंटही खूप चांगल्या असल्याचं व्हॉट्सअॅप मेसेजेसमध्ये दिसून आलं आहे. दसरा-दिवाळी किंवा दिनविशेष सांगणारे मेसेज काहीवेळा इरिटेंटिंग असतात. पण लोकांना त्यातून व्यक्त होण्याची संधी मिळते. ‘व्हॉट्सअॅप’ने अभिव्यक्तीचं व्यासपीठ लोकांसाठी बहाल केलं आहे. महागाईसंदर्भात लोक सेंन्सिटिव असतात. त्यामुळे कांदा, डाळी, साखर याबाबत लोकांच्या क्रिएटिव्हिटीला बहर येतो. विनोदाच्या माध्यमातून हसता हसता आपल्या मागण्यांची धार लोक परजून घेतात.

‘सिटिझन जर्नलिझम’ला सोशल मीडियाने चालना दिली आहे. अनेक जागले या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. पाणीपुरी प्रकरण तर सर्वांना माहीत आहेच. अनेक चुकीची कामं, अतिक्रमणं, सरकारी अधिकार्‍यांची लाच घेण्याची प्रकरणं ही कॅमेर्‍यात बंद करून पसरवली जातात. त्यांना शिक्षा होते की नाही माहीत नाही, पण त्या माणसाची पोलखोल केल्याचं समाधान नक्कीच मिळतं.

अर्थात याची दुसरी बाजूही आहे. एखाद्या युगुलामधले रेकॉर्ड केलेले खासगी क्षण नंतर व्हायरल होतात. ब्लॅकमेलिंग होऊन त्यातून लैंगिक गुन्हे घडतात. व्हॉट्सअॅपवर अफवाही मोठ्या प्रमाणात पसरतात. एखादा सिनेकलावंत गेल्याची अफवा व्हॉट्सअॅपवर पसरली की लोक शहानिशा न करता श्रद्धांजलीही वाहून मोकळे होतात. त्यामुळे या माध्यमाची रिस्क मोठी आहे. दंगली उसळण्याच्या घटनाही त्यामुळे घडलेल्या आहेत.

विधायक काम करणार्‍या अनेकांसाठी सोशल मीडिया हा खूपच मोठा आधार झाला आहे. बर्‍याच छोट्या स्वयंसेवी संस्था किंवा ‘एकला चालो रे’ पद्धतीने काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. मात्र सोशल मीडियावर अशा लोकांच्या कामाची व्याप्ती लोक मोठ्या प्रमाणावर शेअर करतात. वेगळा प्रयोग करणारा एखादा शाळा शिक्षक किंवा सामाजिक कार्यकर्ता त्याच्या नाव-नंबरासकट व्हॉट्सअॅपवर झळकतो आणि त्याला लोक सढळपणे मदतही करतात.

थोडक्यात, स्मार्टफोनने बहाल केलेल्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता लोकांच्या क्रिएटिव्हिटीला असंख्य धुमारे फुटलेत. याची खरी चुणूक मिळाली होती ती २०१४च्या निवडणुकांमध्ये.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय विडंबनांना मोकळं रान मिळालं होतं. त्यावेळच्या युपीए सरकारवर आरोपांची राळ उडवण्यासाठी सोशल मीडियाचा त्यावेळच्या विरोधकांनी चतुराईने उपयोग करून घेतला. युपीएमधल्या प्रमुख नेत्यांवरची विडंबनं, त्यांच्यावरील आरोपांना धार आणण्यासाठी जोक्स, फोटोंवरच्या विनोदी ओळी (मेमे), कार्टुन्स, गाणी, क्रिएटिव्हज या सगळ्यांचा सढळ उपयोग केला गेला. या कामासाठी अर्थातच जाहिरात क्षेत्रातले जाएण्ट उतरवले गेले. सोशल मीडिया एक्सपर्ट ही एक नवी व्यावसायिक जमात तयार झाली. कॉण्टेंट लिहिणारे, चित्रकार, डिझाइनर्स, व्हिजुअलायजर्स, कॅमेरामन, व्हिडियो क्लिपिंग्जवर काम करणारे, व्हिडियो एडिटिंग करणारे अशा अनेकांना काम मिळालं. एक वेगळी इंडस्ट्री त्यामुळे उभी राहिली. ‘व्हायरल मार्केटिंग’ हा शब्द परवलीचा झाला. यातला ‘व्हायरल’ हा शब्द छान आहे. कारण, ज्यावेळी या सोशल मीडियावरचं मार्केटिंग सुरू झालं, तेव्हा या क्षेत्रातल्या लोकांनाही नेमका आवाका नव्हता. प्रिंट आणि टेलिव्हिजनचा अनुभव असणारे लोक होते. पण तोपर्यंत टेलिव्हिजनला कुणी बिट करू शकणार नाही, हा समज या क्षेत्रातील मार्केटिंग तज्ज्ञांचाही होता. मात्र मोबाइल पेनट्रेशनचा झंझावात आणि फेसबुकची व्हायरससारखी व्यापकता पाहिली आणि अनेकांनी भविष्यातील मीडिया म्हणून इकडे मोहरा वळवला. अर्थातच यात मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली. राजकीय पक्षांनी कॉण्टेंट लिहिणारी माणसं पत्रकारिता, जाहिरात क्षेत्र इथून उचलायला सुरुवात केली. त्यानंतर सोशल मीडियावर मार्केटिंग करणारी माणसं जोडली गेली.
आजघडीला अनेक राजकीय पक्षांची अधिकृत वा अनधिकृत बॅकऑफिस कार्यरत असतात. साधारण ४० ते ५० माणसांचा स्टाफ सातत्याने वेगवेगळ्या विडंबनाची, विनोदांची, व्यंगचित्रांची निर्मिती करत असतो. एखादी विसंगत घटना वा विधान घेऊन त्यापासून विनोद निर्मितीची साधनं विकसित केली जातात आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली जातात. मुख्यमंत्र्यांच्या मागे जांभई देणार्‍या पंकजाताई किंवा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांची नाश्ता पार्टी हे विषय आताचे विरोधकही जोरदार गाजवतायत. हे व्हायरल करणारे बहुधा खोटे आयडी घेऊन पसरवत असतात. त्यासाठी व्हॉट्सअॅप या माध्यमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण व्हॉट्सअॅपमधून मोठ्या प्रमाणावर विनोद फॉरवर्ड होतात. मात्र व्हॉट्सअॅप मेसेज मूळ कुणी पाठवलाय हे शोधणं अशक्य नसलं, तरी अवघड असतं. व्हॉट्सअॅप किती व्हायरल झालाय, हे समजणारा डॅशबोर्ड किंवा मॉनिटरिंग टूल नाही. मेसेज वेगवेगळ्या ग्रुपवरून पुन्हा आपल्यापर्यंत येऊ लागला म्हणजे तो व्हायरल झाला, असं समजलं जातं. मात्र व्हॉट्सअॅपवर मार्केटिंग करणं अवघड आहे. त्याला व्हॉट्सअॅप परवानगी देत नाही.

फेसबुकने मात्र सोशल मीडियाचं विलक्षण अल्गोरिदम तयार केलं आहे. त्यात मार्केटिंगचं अर्थशास्त्र वैज्ञानिकदृष्ट्या बसवलं आणि गुगलच्या मार्केटिंगशी स्पर्धा करायला सुरुवात केली. मात्र दोन्ही यंत्र वेगवेगळी असल्याने ते एकमेकांना शह देत नाहीत. उलट एकमेकांना फायदा करून देतात. लोकांना सर्वप्रथम फेसबुकची सवय लावली गेली. फेसबुकवरचे प्रोफाइल युजर्स कोट्यवधींच्या घरात आहेत. मात्र त्यानंतर फेसबुकने पेजेसची ओळख करून दिली. फेसबुक पेज म्हणजे, थोडक्यात स्वतःची समांतर माध्यमव्यवस्था. व्यावसायिक कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटना, ज्ञातिसमाज, सामाजिक आंदोलनं, फोरम अशा कोणत्याही कारणासाठी तुम्ही फेसबुक पेज फुकटात बनवू शकता. या फेसबुकसाठी ‘लाइक्स’ नावाचं एक विलक्षण अल्गोरिदम तयार केलं गेलं. लाइक्सचा अर्थ शब्दशः घेऊ नये. लाइक्स म्हणजे, थोडक्यात वर्गणीदार. कारण ज्याने पेजला लाइक केलंय, त्या व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाइलवर त्या पेजवर लिहिलेला मजकूर आपोआप झळकतो.
थोडक्यात जर तुमच्या फेसबुक पेजला एक लाख लाइक्स असतील तर तुम्ही त्या फेसबुक पेजवर लिहिलेला मजकूर, फोटो, व्हिडियो त्या एक लाख लोकांपर्यंत पोहचणारच. त्यामुळे फेसबुकवर लाइक्स वाढवण्याची एकच स्पर्धा सुरू झाली. फेसुबकने त्यात अर्थकारण विकसित केलं. सिने व टीव्ही क्षेत्रातील तारे-तारका, राजकीय व्यक्तीमत्वं, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, इंग्रजीतील बडे लेखकराव, एनजीओ क्षेत्रातील नामवंत आणि इतर छोट्या-मोठ्या सेलेब्रिटीज यांच्यासाठी हे स्वतःच्या मालकीचं माध्यम इगो सुखावणारं होतं. अनेकांनी फेसबुक तसेच ट्विटरचाही यासाठी वापर केला. प्रसिद्धी माध्यमं आपली वाक्य सोयीनुसार बदलून, वाकवून छापतात किंवा चॅनेलवर दाखवतात, असा या सेलेब्रिटींचा आक्षेप असायचा. आता स्वतःच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्यांनी सोशल मीडियावर स्वतःची स्वतंत्र माध्यमव्यवस्था विकसित केल्यामुळे माध्यमांना त्यांच्या मागे धावणं क्रमप्राप्त होऊ लागलं. पूर्वी या सेलेब्रिटींना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागायची, आता ते आपल्या फेसबुक, मायक्रोब्लॉग वा ट्विटर हॅण्डलवरून जे सांगायचं ते सांगून मोकळे होतात. त्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी मग मीडिया त्यांच्यामागे धावू लागतो. हे नियंत्रण सोशल मीडियाने बहाल केलं आहे. यात अर्थात त्यामुळे या सेलेब्रिटींच्या प्रसिद्धीसाठी, त्यांचे सोशल मीडिया हॅण्डल चालवण्यासाठी एक्सपर्ट लोकांना काम मिळालं आणि कॉण्टेंट रायटिंग, पत्रकारिता, पब्लिक रिलेशन, चित्रकला, दिग्दर्शन, जाहिरात, मार्केटिंग व तंत्रज्ञान यांची गोळाबेरीज करणारी एक वेगळी व्यावसायिक गरज निर्माण झाली. त्यामुळे या क्षेत्रातील अनेकांना ऑनलाइन इंडस्ट्रीने आकर्षून घेतलं. सिनेमा-टीव्ही ही एंटरटेन्मेंट इंडस्ट्री, आयपीएलसारख्या मोठ्या इव्हेण्ट, त्यातल्या टीम्स, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कंपन्या, कोचिंग क्लासेस, रिअल एस्टेट, हॉस्पिटॅलिटी, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या क्षेत्रातले लोक उतरू लागले आणि इंडस्ट्रीची ग्रोथ झाली.

ऑनलाइन मार्केटिंगकडे लोक वळू लागले याचं कारण केवळ स्मार्टफोनची प्रचंड वाढ एवढंच नसून या प्लॅटफॉर्मवरची पारदर्शकताही लोकांना आवडू लागली. तुमचा मजकूर किती लोकांनी वाचलाय, किती लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे, किती लोकांनी हा मजकूर आपल्या मित्रांसह शेअर केलाय, किती लोकांनी अॅप डाऊनलोड केले आहेत अशी सारी कुंडली इनसाइटद्वारे मिळते. ज्याला एन्गेजमेण्ट रेशो म्हटलं जातं, तो पारदर्शीपणे इथे मिळतो. या एन्गेजमेण्टचे पैसे चार्ज केले जातात आणि त्यातून आर्थिक उलाढाल केली जाते.
सोशल मीडियावर जसजशा लोकांच्या अॅक्टिव्हिटीज वाढू लागल्या तसतसा सोशल मीडिया मॉनिटरिंग हा व्यवसाय वृद्धिंगत होऊ लागला. तुमच्याबद्दल ऑनलाइन कोण काय काय बोलतंय, याचा योग्य आढावा देणारी टुल्स विकसित झाली. याक्षणी तुमचं नाव घेऊन कोण काय लिहितंय, हेही समजू लागलं. त्याला उत्तर देणारं रिस्पॉन्स मेकॅनिझम टूलही विकसित झालं. कॉर्पोरेट समूह, राजकीय पक्ष, मनोरंजन व्यावसायिक याचा खूप चांगल्याप्रकारे उपयोग करून घेतात.

सोशल मीडियाने माणसाच्या ओंजळीत ट्वेण्टी फोर बाय सेव्हन माहिती आणि मनोरनंजनाची खाण आणली आहे. हे कम्युनिकेशन एकतर्फी नाही, तर हा एण्ड युजरही त्यात आपली भर टाकून त्याची क्रिएटिव्हिटी जोखू शकतो. त्याला उथळ म्हणून नाकं मुरडणारे अनेक आहेत. सोशल मीडियावर ओरिजिनल काहीच नसतं, असा एक आक्षेप घेतला जातो. खरं तर ‘ओरिजिनल’ हा पाश्चिमात्य कन्सेप्ट आहे. आपल्या संस्कृतीत ओरिजनल काहीच नाही. अनेक प्रवाहांची नदी मोठी झाली, की तिला ‘गंगा’ असं म्हटलं जातं. आपले वेद, पुराणं, रामायण-महाभारतापासून कुणाचाच निर्माता आपल्याला माहीत नसतो. सोशल मीडिया त्याचंच प्रतीक आहे. माहितीचा एक प्रवाह वाहता ठेवत त्याचं ज्ञानगंगेत रूपातंर करण्याचं, एक मोठं काम सोशल मीडियावरचे प्रवाह करतायत. त्यात डुबकी न मारणारा कमनशिबी मानला जातो.

पराग पाटील
मुख्य संपादक, अनोखी पब्लिकेशन्स, मुंबई
(लेखक पत्रकार व सोशल मीडियावरील माहिती व विपणन व्यवस्थापनाचे तज्ज्ञ आहेत.)
paraglpatil@gmail.com