आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्तानीमुळे लक्षात राहिलेली \'राऊ\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही मालिका पौराणिक असल्या तरी त्या आपल्यातल्याच वाटतात. त्यातील पात्रं आपल्या अवतीभवती वावरतात असं वाटतं. त्यांच्या वेशभूषा, भाषा हे जरी वेगळं असलं तरी त्यातील व्यक्तिरेखा सामान्यातल्याच वाटतात. संदर्भ काळ जुना असला तरी असं वाटतं हे सगळं आज आत्ता घडतंय. आताच्या भाषेत म्हणायचं तर अजूनही त्या मालिका फ्रेश वाटतात. आजही पौराणिक मालिका निघतात, अगदी रामायण-महाभारतसुद्धा, पण त्यात भर दिला जातो तो पात्रांच्या पेहेरावावर. त्या काळी न शोभून दिसणारे दागिने, डिझायनर कपडे या सगळ्यात कथा आणि संवाद यांचा पार विचका होतो. पण ही मालिका मात्र
तशी नव्हती.
बाजीराव हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं अजरामर पात्र. पेशवाईच्या काळातली सुबत्ता, मुत्सद्दीपणा, व्यवहारीपणा, शौर्य, रुबाब या सर्वांनी परिपूर्ण असे हे बाजीराव. एकहाती लढाई जिंकून शत्रूला नामोहरम करणं हे त्यांचं कसब. पिळदार शरीरयष्टी, धारदार नाक, हृदयाचा ठाव घेणारे डोळे. आदर्श पंतप्रधान, राज्यकर्ता, मुलगा आणि पतीसुद्धा. शौर्य म्हणजे बाजीराव असं समीकरणच. त्यांच्यावरच आधारित मालिका राऊ.
ना.सं. इनामदार यांच्या ‘राऊ’ कादंबरीवर आधारित ही मालिका होती. राऊ म्हणजेच बाजीराव, त्यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांची प्रेमकथा. आजच्या भाषेत लव्ह ट्रँगल. पण फक्त प्रेम न दाखवता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येक कंगोरा या मालिकेत दिसला. बाजीरावाचं कर्तृत्व असामान्य होतं. काशीबाई त्यांची पत्नी, पतिव्रता. आपल्या ‘स्वारींना’ किती संकटांना तोंड द्यावे लागते याची त्यांना पूर्ण कल्पना असते. अशा परिस्थितीत पत्नीची पूर्ण कर्तव्यं त्या चोख पार पाडतात. त्या काळात लवकर होणारी लग्नं, कमी वयात अंगावर पडणार्‍या जबाबदार्‍या, सासूबाई/जाऊबाई यांचा कडक स्वभाव या वातावरणात वावरणार्‍या काशीबाई. निर्मळ स्वभावाच्या, थोड्याशा घाबरट. राऊंवर जिवापाड प्रेम करणार्‍या.
अशातच बाजीरावांच्या जीवनात येते मस्तानी. आरस्पानी सौंदर्य. अप्रतिम कलाकार. कमनीय बांधा. गौरवर्ण. ओढणीआडून भिरभिरणारे डोळे. प्रथमदर्शनीच राऊंना मस्तानीने आपलेसे केले. हळूहळू हे प्रेम फूलू लागतं. मग मात्र शनिवारवाड्यात कुजबुज सुरू होते. त्या काळी ‘अंगवस्त्र ठेवणे’ ही सर्वमान्य बाब होती. पण बाजीराव-मस्तानीचं नातं कोणालाही पटलं नाही. मस्तानी जशी सुंदर तशी शूरही होती. राऊ आपल्याकडे खेचले जात आहेत हे तिला कळत होतं. पण त्यांचं प्रेम देहापलीकडचं होतं. राऊंनाही मस्तानीबद्दल याच भावना होत्या. शनिवारवाड्यात या सगळ्यांचा विरोध पत्करून ही प्रेमकहाणी फुलत होती.
या सगळ्यात ओढाताण होते ती काशीबार्इंची. आपल्यात काहीतरी कमी आहे म्हणूनच राऊ मस्तानीकडे खेचले गेले या विचारानं ती खचून जाते.
या सगळ्या वळणांवर मालिका पुढे सरकते. काशीबाई, राऊ व मस्तानी यांच्या मनातली वादळं, त्याचा इतरांवर परिणाम हे अतिशय छान चित्रित केलं होतं. राऊंना दोघी प्रिय असतात. वारंवार होणार्‍या लढाया, घरचे भेदी, राजकारण यांना तोंड देता देता राऊ थकतात. आपल्याकडून दोघींवर अन्याय होऊ नये म्हणून झगडतात. ठेवलेली बाई म्हणून मस्तानीच्या प्रेमाला नावं ठेवली जातात. राऊंच्या आपण धर्मपत्नी पण त्यांच्या हृदयात मात्र मस्तानी आहे, यानं काशीबाई बेचैन असतात. अशातच राऊंचं देहावसान होतं. प्रेमाचा त्रिकोण संपतो, पण एक अजरामर प्रेमकथा जन्माला येते.
पौराणिक मालिकेतील पात्रं प्रेक्षकांना खूप परिचयाची असतात. पण या मालिकेत दिग्दर्शकाने याची पुरेपूर काळजी घेतली. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम संवाद आणि चपखल पात्रनिवड. मनोज जोशींनी रंगवलेले राऊ अप्रतिम. त्यांचा बाणेदारपणा, लढवय्यी वृत्ती, काशीबाई आणि मस्तानी यांना जपताना होणारी ओढाताण, घरच्या राजकारणाला तोंड देताना होणारी फरफट त्यांनी खूप छान साकारली. स्मिता तळवलकरांनी रंगवलेली काशीबाई मस्त. पतीवर निस्सीम प्रेम करणारी मस्तानी राऊंच्या आयुष्यात आल्यावर असहाय झालेली काशीबाई त्यांनी खूप कौशल्याने साकारली.
अश्विनी भावेंची मस्तानी तर अवर्णनीय. अश्विनी भावे म्हणजेच मस्तानी हे समीकरणच होऊन गेले होते. इतकी जिवंत भूमिका त्यांनी उभी केली. छायाचित्रण साजेसे. भरपूर दागिने आणि भव्यदिव्य सेट न उभारताही पेशवाई थाट व्यवस्थित दाखवणारं. इतर पात्रांच्या भूमिकाही योग्य.
साधेपणा व चपखल दिग्दर्शन, जिवंत अभिनय आणि सर्वोत्तम कथा यामुळे आठवणींच्या कप्प्यात विराजमान झालेली ही आठवणीतील मालिका ‘राऊ.’

kaugp@rediffmail.com