आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तुत्वाने विशाल,पण संख्येने अल्प...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जो समाज स्त्रियांना समानतेने वागवतो त्या समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असते, असे मानले जाते. अर्थात, ही समानता केवळ व्याख्यानापुरती, व्यासपीठापुरती, साहित्यापुरती असता उपयोगी नाही. प्रत्यक्ष आचरणात ती असली पाहिजे. या निकषावर पारशी समाजात 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 1082 इतकी आहे. भारतामध्ये 1000 पुरुषांमागे 932 स्त्रिया आहेत. केरळमध्येच फक्त 1000 पुरुषांमागे 1042 स्त्रिया आहेत. पारशी समाजात स्त्री-पुरुष समानता आहे, असाच अर्थ यातून निघतो. पारशी समाजाचा भूतकाळ गौरवशाली; परंतु आज पारशांची स्थिती मात्र गंभीर आहे.

लोकसंख्येचा विचार केला आणि पारशी समाजाच्या भविष्याचा विचार केला तर 2040 मध्ये जेव्हा भारताची लोकसंख्या 150 कोटींपेक्षाही जास्त असेल, तेव्हा पारशांची देशातील एकूण संख्या 25000 इतकी असण्याची शक्यता आहे. म्हणजे, त्यांना त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न भेडसावतो आहे.

ज्या समाजाची आर्थिक स्थिती चांगली असते, साक्षरता-जागृतीचे प्रमाण उच्च असते आणि उच्च महत्त्वाकांक्षा असते, त्या समाजाच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण घसरत जाते, हा समाजशास्त्राचा नियम आहे. याचे काहीसे टोकाचे उदाहरण पारशी समाजात आढळते. स्त्रियांचा जननदर कमी होतो. पारशी स्त्रियांमध्ये तर 30% अविवाहित राहतात, 20% स्त्रिया परधर्मीयांशी विवाहबद्ध होतात. उरलेल्या 50% उशिरा लग्न करतात. अर्थातच त्यांच्या संख्येइतकीच मुले त्या जन्माला घालू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे पारशी स्थलांतर करतात. सध्या 15000 ते 20000 पारशी भारत व पाकिस्तानच्या बाहेर राहतात. शिवाय पारशी तरुण-तरुणींमध्ये धर्माविषयी आस्था राहिलेली नाही. ज्या मुलांचा ‘नवज्योत’ हा धार्मिक विधी केला जातो, ती दुस-याच दिवशी सुद्रेह आणि कुस्ती (नवज्योतची निशाणी) दूर टाकून देतात.

तिसरी गोष्ट अशी सांगितली जाते की, पारशी लोक हे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असतात आणि त्यांची धर्मनिरपेक्षता ही पाश्चिमात्य संकल्पनेवर आधारलेली आहे. म्हणजे धर्म आणि राजकारण किंवा धर्म आणि सामाजिक जीवन यांची फारकत मानणे. पारशी धार्मिक आचार, धार्मिक शिक्षण याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजतात. कारण धर्म व राजकारण, धर्म व समाजजीवन यात ते पूर्ण फारकत आणू पाहतात. त्याचा परिणाम पारशी तरुण व तरुणींना समाजाशी बांधून ठेवणारी धर्म ही शक्तीच आज राहिलेली नाही. त्यांच्यासमोर एक पोकळी निर्माण झाली आहे.

चौथे कारण अधिक महत्त्वाचे आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था या सा-या नवीन प्रवाहांचे परिणाम सा-याच समाजघटकांवर होत आहेत. त्याचप्रमाणे हे पारशी समाजावरही होणारच. त्यासाठी कधी या नवीन प्रवाहांशी तडजोड करून तर कधी ज्वलंत प्रश्नांवर संघर्ष करून सर्वांनाच आपला जीवनपट आखावा लागेल. पारशी तरुण-तरुणींनाही त्याच मार्गाचा अवलंब करावा लागेल. कोणताच धर्म या प्रश्नांवर उपाय वा मार्ग दाखवू शकणार नाही. पारशी समाजातील सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आधुनिक मते मानणारे जरी स्वत:ला उदारमतवादी, बुद्धिवादी म्हणवत असले तरी पारशी धर्म आणि समाज बंदिस्त असल्यामुळे त्यांच्यातील सनातनीपणा झाकला जात नाही. आंतरधर्मीय विवाह त्यांना मंजूर नाहीत. म्हणजे स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टच्या अंतर्गत आपला धर्म कायम ठेवून परधर्मीयाशी विवाह करता येतो, परंतु तेही त्या समाजाला पटत नाही. 1990 ची घटना इथे सांगितल्याशिवाय राहवत नाही. रोक्सन दर्शन शहा या पारशी तरुणीचे कार अपघातात निधन झाले. प्रश्न निर्माण झाला ती ‘खरी पारशी’ आहे का? तिने परधर्मीयाशी लग्न केले. तिने धर्म बदलला नाही. आज पारशी समाजात साधारण 16 टक्के विवाह आंतरधर्मीय होतात. परंतु जेव्हा तिच्या पित्याने तिचा मृतदेह शांतीमनो-यात आणला, तेव्हा तिथल्या पारशी पंचायतीने तिला तेथे प्रवेश करू दिला नाही. तिच्या दु:खी पित्याला कन्येचा मृतदेह परत न्यावा लागला. रोक्सनचे वडील प्रख्यात डॉक्टर होते.

पारशी समाजात प्रेमळ, धार्मिक माणूस म्हणून त्यांना मान्यता होती. तरीही ‘पारशी पंचायती’चा हा आदेश. वस्तुत: इथे परधर्मीयाला पारशी धर्मात घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्याच धर्मातील स्त्री धर्मांतर न करता धर्मबाह्य व्यक्तीशी विवाह करते, तर त्यामुळे तिची ‘पारशी’ ही ओळखच नाहीशी होते? या घटनेवर वर्तमानपत्रात अनुकूल-प्रतिकूल बरीच चर्चा झाली. अशा विवाहामुळे व त्यातून निर्माण होणा-या संततीमुळे पारशी धर्माची, पारशी समाजाची शुद्धताच नाहीशी होते आणि या अशुद्धत्वामुळे पारशी समाज दुबळा होत जातो, असा समज या समाजात दृढ आहे. त्याहीपूर्वी 1903 मध्ये रतनजी दादाभाई टाटा या प्रसिद्ध सन्मानप्राप्त पारशाने एका फ्रेंच युवतीशी विवाह केला आणि तो पारशी विवाहविधीप्रमाणे. तेव्हा रतन टाटांनी दावा केला होता की त्यांच्या पत्नीने पारशी धर्माचा स्वीकार केला आहे, त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिला शांतीमनो-यात नेण्याचा हक्क आहे. त्या वेळीही पुरोगामी उदारमतवादी आणि सनातनी यांच्यात फूट पडली. धर्मांतर करून आलेल्यांना पारशी कुटुंबात जन्मलेल्या पारशांइतकेच हक्क असावेत काय, यावर चर्चा सुरू झाली. प्रकरण कोर्टात गेले. तेव्हा कोर्टाने संदिग्ध निकाल दिला, की झोरोअ‍ॅस्ट्रियन धर्म धर्मांतरित व्यक्तीचा स्वीकार करतो हे खरे असले तरी जन्मजात पारशालाच पारशी फंड व पारशी संस्था यांचा उपयोग करण्याचा हक्क आहे. कोर्टाने पुढे असेही सांगितले की, टाटांच्या पत्नीला तो हक्क नसला तरी तिच्या मुलांना आहे. अर्थात, पितृप्रधानता हा तर सर्वच धर्मांचा स्थायीभाव आहे.
परंतु टाटांसारख्या प्रभावशाली धनिक माणसालाही हा अनुभव यावा, ही गोष्ट पारशी समाजाच्या बंदिस्तपणाचीच निशाणी आहे. त्याचा एक परिणाम असा झाला की पारशांची संख्या कमी कमी होत गेली.

1941 पर्यंत त्यांच्या संख्येत वाढ दिसते; परंतु 1961 मध्ये ती एक लाख, 1971 मध्ये 90000, 1991 मध्ये फक्त 76000 राहिले. त्यातील 58000 मुंबईत आहेत. स्थलांतर किंवा पारशी धर्माबाहेर विवाह ही कारणे अंशत: आहेत. परंतु 1947 मध्ये स्वतंत्र भारतात त्यांना त्यांची ओळख (आयडेंटिटी) टिकवणे कठीण वाटू लागले. कारण त्यांच्या मनाने, त्यांनी आतापर्यंत पाश्चिमात्य जीवनराहणी आदर्श मानली होती. ब्रिटिश सत्ता नाहीशी झाल्यानंतर त्यांच्या आदर्शामागील भक्कम आधार गेल्यासारखी त्यांची भावना झाली. आपले राहणीमान टिकवून ठेवणे हीच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट बनली. पारशी समाजातील विवाहाचे सरासरी वय आहे 27. जगात हे सर्वोच्च विवाह वय होय. अविवाहित राहणा-या पारशी स्त्रियांची संख्याही जास्त. 1982 च्या अहवालाप्रमाणे 21 टक्के पारशी स्त्रिया अविवाहित राहत, भारतात अविवाहित स्त्रियांची संख्या होती 0.58 टक्के. पारशी स्त्रियांनी विवाह केला तरी त्यातल्या 20 टक्के नि:संतान आढळत; 26.5 टक्के स्त्रियांना एकच अपत्य होते. इराणमधल्या स्त्रियांची ही मन:स्थिती नाही. त्यांच्याकडे विवाह वय सरासरी आहे 20 वर्षे. 8 टक्के स्त्रिया अविवाहित आढळल्या. भारतातील पारशी समाजाची स्थिती भिन्न का?

पाश्चिमात्य जीवनशैली आदर्श मानल्यामुळे चांगल्या वस्तीत चांगले घर मिळवता येण्याइतकी सांपत्तिक स्थिती प्राप्त होईपर्यंत पारशी युवक-युवती लग्नाचा विचार करत नाहीत. जागाही त्यांना पारशी वस्तीतच हवी. उपनगरात जाऊन राहायची तयारी नाही. एकत्र कुटुंबपद्धती मान्य नाही. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात. त्यामुळे विवाहासाठी, अपत्यनिर्मितीसाठी तडजोडी करण्याची तयारी नसते. जीवनसहचर पारशी जमातीतीलच हवा; परधर्मीय चालत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून पारशांची संख्या कमी कमी होत गेली आहे. या सगळ्यांत आपली ओळख टिकवून धरण्याचीच ओढ त्यांच्यात कायम प्रभावी राहिली आहे आणि पारशी समाजाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
(पारशी समाजावरील लेखमाला समाप्त. पुढील आठवड्यापासून बेने-इस्रायली समाजासंदर्भातील विवेचन.)