आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेले पैसे वाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या शनिवारी संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार गाडीतून येत होतो. सहज मधल्या आरशात लक्ष गेले तर चकाकणारे दिवे दिसले आणि पाठोपाठ मामांच्या गाडीचे मंजुळ स्वर कानावर पडले. 
‘नानाची टांग,’ म्हणत शांतपणे गाडी बाजूला घेतली. मामा आले, माझी सविस्तर विचारपूस केली. लायसन्स घेऊन पुढची माहिती काढायला त्यांच्या गाडीत परत गेले. सर्व माहिती तपासून मामा परत येईपर्यंत मान पाडून, गरीब ससुल्या चेहऱ्याने अखंड बडबडीची खालील वाक्ये ऐकून घेतली.

- तुला नीट गाडी चालवता येत नाही का?
- कित्ती वेळा सांगितलं, हळू गाडी चालव, पण तू का ऐकत नाहीस आमचं?
- किती पैसे वाया जाणार आपले आता? इ.
मामांनी पावती दिली, गुन्हा समजावून सांगितला आणि पैसे कुठे-कसे-किती दिवसांत भरायचे ते सांगितले. पैशांचा आकडा ऐकून कुटुंबातून मोठा wow ऐकू आला. मामा गेल्यावर वर उल्लेखलेल्या वाक्यांची उजळणी झाली आणि त्यासोबतच दातओठ खात, न आवरता येणाऱ्या आवाजात,
- तुझ्याकडे माझ्यासाठी अज्जिबात पैसे नसतात आणि अशी मिस्टेक करून पैसे वाया घालवतोस?
कोण बरं हे सगळं बोललं असेल? अगदी बर्रोबर ओळखलंत! राग थोडा शांत झाल्यावर, काळजीच्या आवाजात प्रश्न आला,
‘तुझ्याकडे इतके पैसे आहेत का?’ मी नकारार्थी मुंडी हलवली. 
‘मग तुला ऑफिसात खूप काम करावं लागणार आता.’ मी हो बोलून विषय संपवला आणि वाटले विषय कायमचा संपला. पण...
सोमवारी सकाळी ऑफिसला जाताना,  ‘बाबा, लक्षात आहे ना? तुला रात्री दहा वाजता ऑफिसमधून यायचं आहे.’ 
संध्याकाळी कधी नव्हे तो लवकर आलो तो,
 ‘बाबा, लवकर का आलास? भरपूर काम करायचं आहे ना? आज किती पैसे मिळाले?’
मी लवकर आल्याची चूक कबूल करून, गरीब ससुल्या चेहऱ्याने ‘फक्त दहा डॉलर मिळाले’ सांगितले.
त्यावर लगेच हिश्शेब करून, (कसं व्हायचं याचं आता) असमाधानाने, ‘तुला अजून इतके पैसे पाहिजेत, उद्या भरपूर काम कर,’ याची आठवण करून दिली.
हा सिलसिला गेले पाच दिवस चालू आहे, एकही दिवस खंड नाही हो. रोजची अशी बोलणी खाऊन जीव आंबून गेला आहे!

- प्रवीण क्षीरसागर, न्यूयाॅर्क
postboxpravin@gmail.com
बातम्या आणखी आहेत...