आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगेच यमुने चैव (रसिक, परीणिता दांडेकर)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडूनहून दिल्लीला जाताना गंगा नदी बराच काळ आपल्या सोबत असते. हरिद्वारजवळ भिमगौडा बराज(धरण) गंगेला अप्पर गंगा कॅनलमध्ये वळविते... पण बरेच महिने, बराजखालची नदी ठक्क कोरडी असते. आम्ही जेव्हा कोरडी नदी पार केली, तेव्हा उजव्या हाताला अनेक भाविक पाण्यात बुड्या मारत होते, भक्तिभावाने गंगा आरती म्हणत होते... हे सगळे होत होते, तो ‘हर की पौडी’ घाट हा गंगेवर नसून, अप्पर गंगा कालव्यावर वसलेला आहे. लागूनच कोरड्या गंगेचे पात्र आहे. मूळ गंगेचा वापर आता पार्किंग लॉट म्हणून होतो. त्याच्याच शेजारी ‘गंगा जल’च्या बाटल्या विकत मिळतात...

थोडक्यात, आपण कालव्यात पुण्य मिळवू शकता किंवा ते बॉटलबंद विकतही घेऊ शकता. नदीशी आपले काय देणे-घेणे आहे? कालव्यात गंगेची एक रंगीत सिमेंटची मूर्ती आहे, ज्यात केविलवाणी देवी आपल्या वाहनावर अंग चोरून बसली आहे.
गोदावरी म्हणजे, दक्षिण वाहिनी गंगाच. तेलंगण्यात आणि आंध्र प्रदेशात जुलैमध्ये गोदावरीकाठी पुष्करम किंवा पुष्करुलू मेळा भरतो. गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळानंतर तेलंगण्यात गोदावरीचे पात्र पार कोरडे पडले होते. शेतांना पाणी नाही, गुरांना नाही. अशात पवित्र स्नानांचे कसे होणार? यावर तोडगा म्हणून प्रशासनाने गोदावरी काठी बोअरवेल खोदून चक्क शॉवर बसवले! भाविकांनीदेखील कोरड्या गोदावरी शेजारीच मंत्र म्हणत, शॉवर बाथ घेत घेत भरपूर पुण्य कमावले.

या वर्षी उज्जैनमध्ये क्षिप्रेच्या तीरी सिंहस्थ कुंभमेळा भरला होता. पण समस्या नेहमीचीच. क्षिप्रेत पाणी नाही. ते नसेना का, पण नर्मदेत तर आहे ना? मग नर्मदेतले ८०० दशलक्ष लिटर पाणी ‘क्षिप्रा-नर्मदा लिंक’द्वारे क्षिप्रेत सोडण्यात आले. खरे तर नर्मदेत या वर्षी पाणी पातळी इतकी कमी होती, आणि धरणांनी तिला इतक्या ठिकाणी अडवले आहे की, जूनमध्ये समुद्राचे पाणी तब्बल ५० किलोमीटर आत येणार, अशी स्थिती निर्माण झाली होती.

पण मग क्षिप्रेला नर्मदेचे पाणी कशासाठी? क्षिप्रेत पाणी आणणाऱ्या तिच्या उपनद्या नाहीत का? आहेत. जसे इंदोरमधून वाहणारी खान नदी ही क्षिप्रेची महत्त्वाची उपनदी आहे. पण खान नदी आधीच प्रदूषित झालेली. शाही स्नानासाठी तिचे घाणेरडे पाणी कसे चालणार? मग त्यावर तोडगा म्हणून खान नदीच वळविण्यात आली, जेणेकरून ती क्षिप्रेला स्नानघाटाच्या खाली जाऊन मिळेल, तिचे दूषित पाणी भाविकांच्या डोळ्यांना खुपणार नाही. यासाठी खर्च किती झाला, तर फक्त २७०० कोटी! पण जर आपण क्षिप्रा आणि खान नद्या मुळातूनच स्वच्छ केल्या असत्या तर?

बरं, कुंभ संपल्यावर क्षिप्रेत ना नर्मदेचे पाणी येते, ना मैलापाणी कृत्रिमरीत्या अडते. या अत्याचारामुळे क्षिप्रा परत तीच ‘पवित्र क्षिप्रा’ होते - बकाल आणि बेहाल! किनाऱ्यावरचे शेतकरी म्हणतात, “ही खरी क्षिप्रा, भक्तांनी यात अंघोळ करावी आणि खरे पुण्य संपादित करावे!!”
हे सगळे आपले थोर प्रताप आठवण्याचे कारण काही दिवसांपूर्वी रामकुंडावर गेले होते. हे नाशिकमधले गोदावरीवरचे रामकुंड, ज्यात अमृताचे थेंब पडले आणि जिथे मागल्या वर्षी कुंभमेळ्यात शाही स्नाने झालेली.

या वर्षी मे महिन्यात हे रामकुंड कोरडे ठाक पडले. तशी नदीदेखील या वर्षी कोरडीच राहिली. नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वर जवळील उगमानंतर गोदावरी अशी कधी आटत नाही. असे म्हणतात की, हे अघटित १३० वर्षांनंतर घडले. हे अनपेक्षितही नाही. गेली पाच वर्षे नाशिक आणि महाराष्ट्र दुष्काळाशी झुंजतो आहे. २०१५मध्ये नाशिकमध्ये सरासरीच्या तब्बल ५९% कमी पाऊस झाला होता. पण गोदा घाटालगतची गोदावरी आणि रामकुंड कोरडे पडण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण आहे.

१२ जूनला मी गोदावरीच्या पात्रात चालत होते. त्या कोरड्या, कडक पठाराला पात्र म्हणणे धाडसाचे होते. हा आहे, गांधी तलाव, रामकुंडाच्या काही मीटरवरचा. गांधी तलाव कडक आणि गुळगुळीत होता. २००३ कुंभमेळ्याआधी त्यात अनेक दिवस काँक्रिट ओतून ओतून त्याची खोली कमी करण्यात आली होती. तसेच रामकुंडाचे झाले होते. गोदावरीत १६ कुंडे होती, त्यातील १३ कुंडे काँक्रिटीकरणाने बुजवण्यात आली. आज ती कुणाला शोधूनही सापडणार नाहीत.

पण इथे तर भाविक रामकुंडात पवित्र डुबक्या घेत होते. आनंदाने एकमेकांवर पाणी उडवत होते, पूजेअर्चेनंतर निरुपयोगी झालेले निर्माल्य टाकत होते. हे टाकलेले निर्माल्य एक लहान मुलगा निर्विकारपणे गोळा करत होता...
या रामकुंडात गेले अनेक दिवस टँकरने पाणी ओतण्यात येत आहे. कुंड भरायला जवळजवळ ५ लाख लिटर पाणी लागते. ते कुठून येते, तर इंद्रकुंडातून किंवा बोअरवेलमधून. या दयनीय अवस्थेला जसा दुष्काळ जबाबदार आहे, तसेच कोणताही अभ्यास न करता करण्यात आलेले काँक्रिटीकरणदेखील जबाबदार आहे.

नदीमध्ये दोन प्रकारचे प्रवाह असतात, एक surface flow, तर दुसरा आणि महत्त्वाचा baseflow. हा baseflow म्हणजे भूगर्भातले पाणी, जे नदीला अनेक ठिकाणी जिवंत झऱ्यांच्या रूपात येऊन मिळते व भूगर्भाचे पाणी पृष्ठभागावर येते. Baseflow उन्हाळ्यात पाणी पातळी राखण्यात महत्त्वाचे काम करतो. पण काँक्रिटच्या थराने हे झरे पुरते बुजतात. Surface आणि baseflowची नैसर्गिक शंृंखला भंग पावते. ज्येष्ठ भूगर्भ आणि भूजल अभ्यासक डॉ. हिमांशु कुलकर्णी म्हणतात, “भारतातली सगळी कुंडे, मग ती सिक्कीममधली असोत, उत्तराखंडातली असोत, की गोदावरी-कावेरीमधली असोत; हे जिवंत झरे आहेत, ते भूगर्भातले पाणी पृष्ठभागावर आणतात. त्यांचे काँक्रिटीकरण म्हणजे, त्यांना राजरोसपणे नष्ट करणे आहे.”

प्रशासनाने कुंभमेळ्याआधी असे का केले, याला अनेक कारणे दिली जातात. त्यातली काही म्हणजे, खोल कुंडांना उथळ करणे, जेणेकरून भाविक त्यात सुरक्षितपणे स्नान करू शकतील, त्यांच्या पायाला नदीचे पात्र खुपणार नाही. आणखी एक कारण म्हणजे, कुंभमेळ्यासाठी निर्धारित झालेला निधी सढळ हस्ते वापरून टाकणे! म्हणूनच १.५ किमीचा गोक्षघाट आज पूर्णपणे काँक्रिटमय झाला आहे. पुरातन असे दशाश्मेघ कुंड तर या थराखाली अदृश्य झाले आहे.

विशेष म्हणजे, हे काँक्रिट हटवा, अशी जनयाचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ती केली आहे, गोदाकाठच्या कपालेश्वर महादेव मंदिराचे पुजारी देवांग जानी यांनी. देवांगजी म्हणतात, “अहो, कसले स्थान माहात्म्य आणि कसले तीर्थ माहात्म्य, जर तीर्थ राम कुंडाचे नाही, तर याला काय अर्थ उरतो? पण भाविकांना या प्रकारामुळे काहीही फरक पडताना दिसत नाही. त्यांना कुंडात पाणी असण्याशी कारण. ते कुठून येते, या सगळ्या उपद्व्यापामुळे नदीचे काय हाल होतात, याच्याशी त्यांना कर्तव्य आहे, असे वाटत नाही. रामकुंडात जे गोमुख आहे, त्यातही आता महानगरपालिकेचे, नळाचे पाणी येऊ लागले आहे.”

देवांग जानींचा १५० वर्षे जुना वाडा रामकुंडापासून थोड्याच अंतरावर आहे. त्यांच्या वाड्यात उमा कुंड नावाचे पुरातन कुंड आहे, ज्यात या दुष्काळातही थंड पाणी उपलब्ध आहे. देवांगजी म्हणतात, “मी २००२मध्ये अनेक कुंडे, विहिरी बुजताना बघितल्या. इथेच एकमुखी दत्त मंदिराजवळ एक अति प्राचीन खोल अशी विहीर होती. ती बुजवायला ५०० ट्रक गाळ त्यात ओतावा लागला. हे अत्यंत निर्दयीपणे जलस्रोतांना नष्ट करणे आहे.”

या सगळ्या प्रकारात प्रशासन मात्र काँक्रिट काढण्यास उत्सुक नाही. त्यांच्या मते, अतिउपशामुळे भूजल पातळी खालावली आहे, त्यामुळे काँक्रिट काढूनही झरे फुटतीलच आणि रामकुंडात पाणी येईलच, अशी काही शाश्वती नाही. आता निदान त्यात पाणी भरून तरी ठेवता येते. (अर्थातच टँकरचे!)

या उपाययोजनेत अनेक त्रुटी आहेत. एक तर अनन्वित भूजल उपसा होऊ नये, हे नियंत्रित करण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे. तसे कायदे आहेत आणि प्रशासनाला तसे अधिकारही आहेत. त्यांचा योग्य वापर करणे, सगळ्याच अर्थी गरजेचे आहे. दुसरे म्हणजे जरी जिवंत झरे सापडतील, अशी खात्री १००% देता येत नसेल, तरी काँक्रिटीकरणामुळे झरे आणि कुंड नष्ट होतील, हे मात्र १००% सत्य आहे. मग आपण त्यांना पुनर्जीवित करण्याचे प्रयत्नदेखील करायचे नाहीत का?

या सगळ्यात साधू महंतांचे, आखाडा परिषदेचे काय म्हणणे आहे? गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाचे राजेश पंडित म्हणतात की, काही दिवस महंत म्हणाले की, रामकुंडातले झरे मोकळे करा नाहीतर ते शाही स्नानावर बहिष्कार टाकतील; पण खरे असे काहीही झाले नाही. काँक्रिटच्या कुंडात वाजतगाजत बिनबोभाटपणे शाहीस्नान संपन्न झाले.

यातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात. पण प्रश्न उपस्थित केला की, भारतातील नद्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हा मुद्दा ठासून सांगण्यात येतो. आपण जगात वेगळे ठरतो ते यामुळे. पण हे धार्मिक माहात्म्य जपून आपण आजवर काय साधले? एक मार्ग बंद झाला, भाविकांनी पुण्य मिळवायचे अनेक मार्ग शोधून काढले. त्यात नदीचे एक सोयीस्कर प्रतीक तेवढे शिल्लक राहिले आणि कोणत्याही प्रतीकाची कालानुरूप जशी विटंबना होते, तशी नद्यांची होत राहिली. नदीशी असलेली बांधिलकी अंघोळीचा पहिला तांब्या अंगावर ओतताना म्हणावयाच्या मंत्रोच्चारापुतीच राहिली. एकीकडे नदीचे गुणगान करत आपण नदीत मैला टाकत राहिलो. अविरत.

प्रशासन आणि समाज नदी वाचविण्यात कमी पडले, हे वादातीत सत्य आहे. या दोन्ही घटकांची ती प्राथमिक जबाबदारी आहे, हेदेखील खरेच. पण हेसुद्धा मान्य करावे लागेल, की नदीला माता म्हणत धर्मानेदेखील नद्यांचा ऱ्हासच केला. या ऐवजी आपल्याला व इतर जीवसृष्टीला बांधून ठेवणारी एक महत्त्वाची परिसंस्था, अशी नदीची ठसठशीत ओळख समाजमनावर बिंबली तरच कदाचित या पुढच्या काळात नदी आणि पर्यायाने माणूस म्हणून आपलं अस्तित्व टिकून राहील. कधी काळी गगनचुंबी इमारतींच्या शहरांमध्ये नाही, नदीच्या काठाकाठाने मानवी संस्कृती वसली आणि बहरली, हे त्रिकालाबाधित सत्य उगाच नाही कोरलं गेलंय, काळाच्या पटलावर...

परीणिता दांडेकर
parineeta.dandekar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...