आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नद्यांना जगवू, मग पाणी येईलच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या जागतिक जलदिनी महाराष्ट्राचा धरण साठा होता अवघा २१%. मराठवाड्याचा होता ०.५%. अख्खा उन्हाळा समोर आ वासून उभा. गेल्या ५ वर्षांतील 3 वर्षं महाराष्ट्राने भीषण संकटे बघितली : दुष्काळ, अवकाळी, भूगर्भातील पाणी पातळी आत्यंतिक कोसळणे, धरण घोटाळे, शहरांची वाढती तहान, त्यासमोर हतबल होणारा शेतकरी, डाळींना हमीभाव देखील न मिळणे. या सगळ्यांतून एकत्रित संताप निर्माण झाला नसता तर नवल. अनेक पद्धतीने तो विखार मांडला गेला. हातघाईला आलेल्या सरकारने देखील अनेक योजना दामटवल्या. रखडलेल्या १३ मोठ्या सिंचन प्रकल्पांना केंद्रातून हजारो कोटींचे अनुदान खेचून आणणे हे त्यातलेच एक. जे मुख्यमंत्री शपथविधी नंतर म्हणाले की, महाराष्ट्रात आपण धरणे बांधली, सिंचन दिले नाही, तेच सरकार स्थापन झाल्यावर मोठ्या धरणांची कढ घेऊ लागले. तसे असणे स्वाभाविक होते. मोठ्या धरणात अनेकांचे मोठे हितसंबंध गुंफलेले असतात. 
 
धरणांबरोबरच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक नद्यांचे “पुनरुजीवन”, खरे तर खोलीकरण-रुंदीकरण झाले. असे करताना कोणतेही पर्यावरणीय निकष पाळले गेले नाहीत आणि अनेक ठिकाणी नद्यांचे नुकसान झाले. याबद्दल उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी होत आहे, ज्यात न्यायालयाने अशा कामांवर देखरेख करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यात कोणतेही सरकारी अधिकारी नसतील, अगदी माजीदेखील नाही! अजून ही समिती गठित झाली नाही. तसंही सरकारी समित्यांच्या सूचनांची अंमलबावणी आपल्याकडे कशी होते ती एक वेगळी गोष्ट आहे.
 
अनेक समित्यांचे अहवाल वर्षानुवर्षं धूळ खात पडले आहेत, जसे चितळे समिती, मेंढेगिरी समिती, कुलकर्णी समिती, पांढरेंचे अनेक अहवाल, इ. भर दुष्काळात अनेक पावले घाईत उचलली गेली, हे काही अंशी समजण्यासारखे आहे.

पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. दुष्काळाच्या झळा जरी काही गावांना बोचायला लागल्या आहेत, तरी धरणसाठा आणि भूजल पातळी मागील वर्षाच्या तुलनेत बरीच बरी आहे. मग या वर्षी आपण काही दूरदृष्टीचे निर्णय घ्यायला धजू शकतो का? 
 
सुरुवात नद्यांपासून करू या. या सरकारने स्थापन झाल्यावर लागलीच जवळजवळ २० वर्षं चालत आलेली River Zoning Policy अत्यंत फुटकळ कारणं देऊन मोडीत काढली. या धोरणानुसार प्रदूषणकारी उद्योग नदीला बिलगून स्थापणे वर्ज्य होते.
 
आता मात्र उल्हासनगरचा कचराडेपोदेखील उल्हासनदीला लागून होण्यास कोणतीही आडकाठी नाही! तेच रासायनिक कारखान्यांचं. हे धोरण नुसतं पूर्ववत नाही तर अधिक सक्षम करणं गरजेचं आहे.
 
महाराष्ट्रातील नद्यांचा श्वास म्हणजे भूजल. दुष्काळात नद्यांमध्ये पाणी राहतं ते झिरपणाऱ्या भूजलामुळे. भूजलामुळे नदी प्रवाही राहते, वाळू पुढे ढकलली जाते, काठची राई तरते, पशुपक्ष्यांचे नदीलगतचे अधिवास जिवंत राहतात, मासे जगतात, कोळी-कातकरी जगतात, स्थानिक तापमान शीतल राहते, जिथे भूजल अगदीच संपुष्टात आले आहे तिथे ते वाढते, “नदी” म्हणून नदीची ओळख टिकून राहते. आता नद्याच कशाला हव्यात असे म्हटले तर हा विषयच मिटतो, पण जर आपल्याला आपल्या नद्या मारायच्या नसतील, तर भूजलाचे योग्य नियोजन गरजेचे आहे. 
 
आपल्याकडे भूजल अधिनियमन कायदा २००९मध्ये येऊनही तो पडूनच आहे कारण त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आपण महाराष्ट्र जल नियामक प्राधिकरण मंडळाकडे (मजनिप्र) दिली होती. (हे मुळातच चुकलं) आणि आता जवळजवळ दोन वर्षं होत आली, हे प्राधिकरणच अस्तित्वात नाही! सगळाच सावळा गोंधळ.
 
भूजलाच्या अनियंत्री उपशामुळे नद्यांचेच नाही, तर गावातल्या पिण्याच्या पाण्याचे, शेतीच्या स्रोतांचेही शोषण सुरूच आहे.  यावर तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे. आणि शेवटी गोष्ट प्रवाहाची. नदी या शब्दाचा अर्थ आहे नाद करणारी. नदीचा नाद असतो तिच्या प्रवाहात. आपण महाराष्ट्रात नदीच्या येव्याच्या अनेकपट मोठी धरणे बांधून तिचा प्रवाह पूर्णपणे गिळून टाकला. भीमा, सीना, कृष्णा, गोदावरी अनेक ठिकाणी धरणाखाली कोरड्या ठक्क असतात. हे नदीसाठी आणि तिच्यावर धरणाखाली अवलंबून असणाऱ्या सगळ्यांसाठी अस्वीकारार्ह. 
 
जर गंगा निर्मलबरोबर ‘अविरल’ करण्याचे प्रयत्न आपण करतो, तर महाराष्ट्रातल्या नद्या का नाही? जगभर नद्यांमध्ये धरणातून ‘पर्यावरणीय प्रवाह’ सोडण्यासाठी अनेक अभ्यास आणि प्रयत्न होत आहेत. अगदी दुष्काळी आणि कोरड्या दक्षिण आफ्रिकेतही पिण्याच्या आणि पर्यावरणासाठीच्या पाण्याचे नियोजन आधी होते आणि मग शिल्लक पाणी इतर गरजांसाठी वाटले जाते. यात आधारभूत विचार हा की, मानव त्याच्या पर्यावरणापेक्षा वेगळा नाहीच.
नदीत पाणी असणे ही चैन नाही तर आपली गरज आहे. यात मागास राहणे आपल्याला परवडणारे नाही.
 
अगदीच अशक्य आहे का हे? आपली Irrigation Efficiency सरकारी आकड्यानुसार ५०% पेक्षा कमी आहे, कोणतेही शहर आपले मैलापाणी साफ करत नाही, rainwater harvesting मध्ये एकाही शहराने उल्लेखनीय काम केलेलं नाही, उद्योगधंदे राजरोसपणे पाणी प्रदूषित करतात. हे सगळं जरा ठीक केलं तर अनेक पर्याय आहेत आपल्याला नद्यांमध्ये पाणी परत  खेळवायचे. गरज आहे सुप्रशासनाची आणि लोकांचा रेट्याची.
 
मी मजनिप्रमधल्या पर्यावरणीय प्रवाह समितीची वर्षभर सदस्य होते. यातील सदस्य अनेक पाण्याशी निगडीत विभागांचे प्रमुख होते. त्यात पर्यावरण विभागही होता. खरं तर हा विषय त्यांचाच पण  वर्षभर चाललेल्या बैठकांमध्ये पर्यावरण विभागाच्या एकही अधिकारी फिरकला नाही. 
 
समितीने कोणतीही सूचना केली की, सिंचन विभाग हे करणं कसं अशक्य आहे हे सांगण्यात मशगुल होता. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आपल्या नद्यांची स्थिती खरं तर कशी सुधारतेय ते आम्हाला कागदावर रंगवून सांगत होते. नंतर मजनिप्र सदस्यांचीच मुदत संपली आणि या समितीचे कामही बंद झाले. यावर देखील त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. शेवटचा मुद्दा नदी पुनरुजीवनाचा. अनेकांनी अंतःप्रेरणेने आणि लोकसहभागाने एकत्र येऊन नदी खोलीकरण-रुंदीकरण हाती घेतले आणि सरकारने जलयुक्त शिवार अंतर्गत याला नदी पुनरुज्जीवन असे नाव दिले. 
 
अभ्यासाशिवाय आणि नियोजनाशिवाय झालेल्या या कामात अनेक ठिकाणी खालचा भूजल साठा मोकळा झाला, नदीचे काठ ढासळले, एका पावसानंतर शेजारी रचून ठेवलेले मातीचे ढीग पाण्यात परत आले आणि पुढे धरणात बसले. नदी पुनरुज्जीवन म्हणजे पाणी लागणे नाही. ती एक मोठी प्रक्रिया आहे आणि त्याला नियोजन गरजेचे आहे. लोकभावना निर्व्याजच होती, पण सरकार आपली regulatorची भूमिका विसरलं. अजूनही नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्याची अतोनात गरज आहे.
 
यातले महत्त्वाचे घटक म्हणजे पाण्याचे न्याय्य आणि योग्य नियोजन, धरणांचे पारदर्शी नियोजन, माथा ते पायथा संवेदशीलपणे केलेले जल संधारण, नदीची वळणं आणि तिच्या काठच्या राईचे संवर्धन, गवताची लागवड, वाळू उपशावर बंदी, इत्यादी. याने हळूहळू पाणी पातळी वाढेल, पण कोणतंही नैसर्गिक पुनरुज्जीवन जादूची काडी नाही. त्याला वेळ आणि अभ्यास हा गरजेचाच आहे. 
 
आपल्या जनतेमध्ये ते बीज आहे. राज्यभर होणारी, मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, येथील नदीची कामे याचेच द्योतक आहेत. गरज दिशेची आणि सुप्रशासनाची आहे. हे सरकार सिंचन आणि पाणी याच विषयावर तरून राज्यावर आले. लोकसहभागाने महाराष्ट्रातल्या नद्यांचे चित्र बदलणे हे शक्य आहे. आणि ते गरजेचं आहे.


सर्व छायाचित्रे  : परिणीता दांडेकर.
बातम्या आणखी आहेत...