आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण हे असतात दीर्घकाळासाठी अ‍ॅनिमिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकाच्या लाल रक्तपेशी असतात दूषित :
थॉलेसेमिया हा एक असा आजार आहे,जो पालकांकडून होणा-या मुलाकडे गुणसूत्राद्वारे पोहोचवला जातो. आज भारतात दरवर्षी 10 हजार बालके थॅलेसेमिया घेऊन जन्माला येतात. या आजाराचे स्वरूप थोडक्यात सांगायचे झाले तर थॅलेसेमिया मेजर या आजाराने जन्मलेल्या बालकाच्या लाल रक्तपेशी दूषित असतात. योग्य त्या हिमोग्लोबिनच्या बनलेल्या नसतात. शरीराच्या सर्व पेशींना ऑक्सिजन पुरवण्याचे काम हिमोग्लोबिन करतो. अयोग्य हिमोग्लोबिन असलेल्या लाल रक्तपेशी हे काम करू शकत नाहीत. त्यामुळे थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण हे दीर्घकाळासाठी अ‍ॅनिमिक असतात आणि त्यांना वारंवार रक्त संक्रमण, ब्लड ट्रान्स्फ्यूजन द्यावे लागते.


थॅलेसेमिया हा पूर्ण रोखता येणारा आजार :
पण आपणास हे माहीत आहे का की, थॅलेसेमिया हा पूर्ण रोखता येणारा आजार आहे. जगाच्या पाठीवर असलेल्या नॉर्थ सायप्रस या छोटया देशाचे उदाहरण फार आशादायक आहे. सायप्रस या छोट्या देशात 1970 मध्ये थॅलेसेमिया कॅरिअर्सचे प्रमाण 1-7 असे होते. याचाच अर्थ थॅलेसेमिया मेजरचा दर त्या देशात 1-158 असा होता. बालकांना द्याव्या लागणा-या रक्त संक्रमणामुळे देशाचे सर्व आर्थिक संतुलन बिघडू लागले होते. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने 1974 मध्ये विवाहपूर्व थॅलेसेमिया स्क्रीनिंग करणे बंधनकारक केले आणि जनजागृतीच्या साहाय्याने दोन कॅरिअर्समध्ये विवाहाचे प्रमाण घटवण्यात आले. तीस वर्षांत त्या देशाने थॅलेसेमियावर मात केली. 1991 ते 2001 या काळात फक्त पाच बालके थॅलेसेमिया मेजर जन्मली. गेल्या पाच वर्षांत तशी एकही नोंद नाही. त्यामुळे बाधित बालकांना चांगली मेडिकल ट्रीटमेंट मिळू लागली. त्यांचे आयुष्य वाढले व सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगण्याचा हक्क त्यांना मिळाला.


भारतात दरवर्षी 10 हजार बालके थॅलेसेमिया घेऊन जन्मतात
भारताचा विचार करता दरवर्षी दहा हजार बालके थॅलेसेमिया मेजर घेऊन जन्मतात. याचा अर्थ हा जननदर 1-2700 एवढा आहे. याउलट सायप्रससारख्या छोट्या देशामध्ये हा दर 1-158 असा होता. आपल्याला थॅलेसेमिया मेजरवर मात करणे सहज शक्य आहे. गरज आहे ती जनजागृती, समाजशिक्षण लग्नापूर्वी व प्रसूतपूर्व काळात थॅलेसेमिया स्क्रीनिंगची.


थॅलेसेमिया मायनर आणि कॅरिअर व्यक्ती :
हिमोग्लोबिन हा असा रक्तातील घटक आहे, जो अल्फा आणि बीटा या ग्लोबिन साखळ्यांचा बनलेला असतो. यापैकी कोणत्या प्रकारच्या ग्लोबिन साखळ्या सदोष आहेत, त्यावर या आजाराचे स्वरूप आणि गांभीर्य अवलंबून असते. बीटा साखळ्यांच्या गुणसूत्रांवर प्रत्येकी एक, असे दोन ठिकाणी त्याचा कोड असतो. यापैकी एका जरी गुणसूत्रामध्ये बदल झाला तरी त्या व्यक्तीमध्ये काही नॉर्मल बीटा ग्लोबिन तयार होत राहतात. अशा व्यक्तींना थॅलेसेमिया मायनर आणि कॅरिअर म्हणतात. या व्यक्तींना अगदी कमी प्रमाणातील अ‍ॅनिमियाव्यतिरिक्त कोणताही त्रास होत नाही. पण याच थॅलेसेमिया मायनर किंवा कॅरिअर्सकडून थॅलेसेमिया मेजर म्हणजे रक्त संक्रमणावर अवलंबून राहणा-या आजारी बालकांचा जन्म होतो. तो कसा, ते पाहूया.


दोन कॅरिअर पालकांकडून थॅलेसेमियाग्रस्तांचा जन्म :
थॅलेसेमिया कॅरिअर व्यक्तींचे लग्न जर दुस-या नॉर्मल व्यक्तीशी झाले तर त्यांना होणा-या अपत्यांमध्ये पन्नास टक्के प्रमाण हे अगदी नॉर्मल हिमाग्लोबिन तयार होणारे अपत्य असतात आणि पन्नास टक्के अपत्ये ही थॅलेसेमिया कॅरिअर असतात, जी संपूर्णपणे निरोगी जीवन जगू शकतात. परंतु थॅलेसेमिया कॅरिअर व्यक्तीचे लग्न जर दुस-या थॅलेसेमिया कॅरिअर व्यक्तीशी झाले तर त्यांना होणा-या अपत्यांमध्ये 25 टक्के बालके थॅलेसेमिया मेजरने ग्रस्त असतात. ती सर्व बालके आयुष्यभर रक्त संक्रमणावर अवलंबून राहतात. 25 टक्के बालके नॉर्मल, तर 50 टक्के बालके कॅरिअर म्हणून जन्माला येतात. म्हणजे दोन कॅरिअर पालकांकडून थॅलेसेमियाग्रस्तांचा जन्म होतो.


विवाहपूर्व आणि गरोदरपणात थॅलेसेमिया तपासणी हवी मस्ट :
एखाद्या गर्भवती स्त्रीचे जर हिमोग्लोबिन इलक्ट्रो फोरेसिस केले आणि ती जर नॉर्मल असल्याचे आढळले तर तिला थॅलेसेमिया मेजर अपत्य होण्याची शक्यता नसते. मात्र गर्भवती महिला जर थॅलेसेमिया कॅरिअर असेल तर पित्याचेही रक्त तपासणे महत्त्वाचे आहे. पिता जर थॅलेसेमिया कॅरिअर असेल तर बालकांच्या गर्भातच तपासण्या करून घेणे महत्त्वाचे असते. तपासण्या या विवाहापूर्वी अथवा गरोदरपणाच्या प्राथमिक अवस्थेत झाल्या तरच पुढचा अनर्थ टळतो. आज विज्ञान बरेच पुढे गेले आहे. आपले अपत्य सदृढ आहे का, हे जाणून घेण्याचा हक्क प्रत्येक पालकास आहे. याद्वारे आपण भावी पिढी निरोगी बनवू शकतो.