आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशिष्ट्यपूर्ण संमेलनांच्या गावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवसाहित्यिकांच्या निर्मितीला व्यासपीठ देण्याचे कामही साहित्य संमेलनांतून होते. अलीकडे ग्रामीण साहित्य संमेलने जिल्ह्याजिल्ह्यात भरवली जातात; मात्र सांगली जिल्ह्यात ही परंपरा 70 हून अधिक वर्षांची आहेच, शिवाय अलीकडे काही संमेलनांनी आपल्या वेगळेपणातून ठसा उमटवला आहे. सध्या विविध संमेलनाचा मोसम सुरू आहे, त्यानिमित्त...

1) अ.भा.संमेलनाला अध्यक्ष देणारे औदुंबरचे सदानंद संमेलन - कवी सुधांशू आणि म.भा.भोसले यांनी सदानंद सामंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 70 वर्षांपूर्वी जिल्ह्यात साहित्य संमेलनांची परंपरा सुरू केली. कृष्णेकाठी श्री दत्ताचं तीर्थश्रेत्र असलेल्या औदुंबर इथं मकर संक्रांतीला भरणा-या या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे गेली सत्तर वर्षे हे संमेलन चिंचेच्या झाडाखाली भरते. या संमेलनाचे अनेक अध्यक्ष पुढे जाऊन अ.भा.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. दत्तो वामन पोतदार, सेतुमाधव पगडी, कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर, विंदा करंदीकर, पु.ल.देशपांडे, ना.ग.गोरे यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभले.

2) विट्याचे ग्रामीण साहित्य संमेलन- विट्याचे ग्रामीण साहित्य संमेलन गेली 31 वर्षे अविरत सुरू आहे. भारतमाता ज्ञानपीठ व मुक्तांगण वाचनालयाने या संमेलनाला उंचीवर नेऊन ठेवले आहे. पु.ल.देशपांडे, शिवाजी सावंत, ना.धों.महानोर, वसंत कानेटकर, नारायण सुर्वे यांच्यासारखे दिग्गज या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभले.

3) महिलांनी पुरुषांसाठी चालवलेले संमेलन - कडेगाव तालुक्यातील रामापूर येथे गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेले अक्षरयात्री साहित्य संमेलन. कवयित्री स्वाती शिंदे-पवार यांनी यांनी सुरू केलेल्या संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष व प्रमुख पाहुणे ही पदे महिलांसाठी राखीव आहेत. मात्र संमेलनात पुरुषांनाही सहभागी होता येते. पलूसला स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ आणि पलूस तालुका ग्रामीण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 24 वर्षांपासून ग्रामीण साहित्य संमेलन भरवले जाते.

4) बलवडीचे ‘डावे’ संमेलन- खानापूर तालुक्यातील बलवडी येथे 1986 पासून ग्रामीण साहित्य संमेलन भरवले जाते. बळीराजा धरणाच्या उभारणीच्या निमित्ताने बलवडी येथे अनेक नामवंत लोक भेट द्यायचे. धरण पूर्ण झाल्यानंतर एका कृतिशील विचारातून साकार झालेल्या या धरणाच्या उभारणीप्रीत्यर्थ साहित्य संमेलन सुरू करण्यात आले. या संमेलनावरही डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे. या संमेलनात होणारे परिसंवाद वैशिष्ट्यपूर्ण असतात. किंबहुना या परिसंवादांनी अनेक कळीच्या विषयांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. मार्चमध्ये होणा-या या संमेलनात ‘दुष्काळ टाळण्यासाठीचे पर्याय’ यावर परिसंवाद होणार आहे.

5) शिराळ्याचे डोंगरी साहित्य संमेलन - शिराळा तालुक्यात डोंगरी साहित्य परिषदेच्या वतीने कवी वसंत पाटील यांनी 20 वर्षांपूर्वी डोंगरी साहित्य संमेलनाची सुरुवात केली. चांदोली धरणामुळे विस्थापित झालेल्यांच्या व्यथा महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचाव्यात या हेतूने कवी वसंत पाटील यांनी संमेलनाची सुरुवात केली.
या संमेलनांशिवाय देशिंगचे कवी गो.स.चरणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरवले जाणारे ग्रामीण संमेलन, रेणावीचे शहाबाई यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, शेटफळे येथे गदिमांच्या स्मृतिदिनी भरणारा कवी कट्टा, चारुतासागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या वर्षी सुरू झालेले मळणगाव येथील संमेलन, कामेरी, इस्लामपूर, गुंडेवाडी येथील संमेलने जिल्ह्याची साहित्य चळवळ समृद्ध करत आहेत.