आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक अपूर्ण विराम (पीयूष नाशिककर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही माणसं मनस्वी असतात म्हणूनच ती अापल्याच काही ठाम विचारांवर जगत असतात. पण हे िवचार ते इतरांवर लादत नाहीत. त्या वेळी त्यांचा भिडस्तपणा खटकताे. नंतर कधीतरी ताे भिडस्तपणा किती याेग्य हाेता, याचीही जाणीव हाेऊन जाते. ज्येेष्ठ पत्रकार, रंगकर्मी, लेखक, वाचक, इतिहास अभ्यासक, वक्ता, मार्गदर्शक अाणि मनातलं भरभरून रिता हाेणारा सखा अाणि अाताच्या काळात साेशल मीडियावरील अनेकांचा एक तरुण मित्र अशी ओळख असलेले मुरलीधर खैरनार असेच होते, मनस्वी तरीही भिडस्त.

खरं तर त्यांची अनेकांना भीतीही वाटत असे. ती कधी अादरयुक्त हाेती, तर कधी वादांमुळे हाेती. त्यांचं दिसणं अगदीच सामान्य; पण बाेलणं सुरू केलं की, एखादा विद्वानही प्रभावित हाेईल असेच. अापला अभ्यास, चिकाटी अाणि निर्भीड व्यक्तिमत्त्वाने कधीही कुणापुढेही न झुकणाऱ्या मुरलीधर खैरनारसरांच्या ‘शाेध’क व्यक्तिमत्त्वाला नियतीने हळूहळू झुकायला लावले. पण तरीही त्यात खंत नव्हती. जाे माणूस एखाद्या कादंबरीचा अभ्यास करताना क्षण अन‌् क्षण त्यातच जगला, तोच मरण जवळ अाल्याची चाहूल लागल्यावर मरणालाही बराेबर घेऊनच फिरत हाेता. एका शाेधाला खैरनारांनी पूर्णविराम दिला; पण अनेक अपूर्णविराम मागे साेडून बहुरूपी माणूस निघून गेला.
मुरलीधर खैरनार तसे नाशिककरांनाच काय महाराष्ट्राला नवीन नाहीत. ‘साे सिंपल’ या कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्रभर दाैरे केले अाणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. त्यांची नव्याने अाेळख झाली, ती ‘शाेध’ कादंबरीमुळे. अाधी ते कुठल्या तरी नाटकाच्या निमित्ताने भेटायचे..., कधी वाचनालयात तर कधी काेणाची तरी मुलाखत घेताना दिसायचे. समूहात भेटले की, हसतमुखाने एक तर अभ्यासपूर्ण टीका करायची किंवा मग लाॅजिकली मुद्दे मांडत मार्गदर्शन करायचं, हा त्यांचा स्वभाव.
‘शाेध’ कादंबरीच्या निमित्ताने अामचं बाेलणं झालं. खरं तर ते प्रकाशनापूर्वी व्हायला हवं हाेतं; पण मुद्दामच प्रकाशनानंतर अाम्ही त्याविषयी खूप बाेललाे. त्यांनी मला त्यांच्या घरीच बाेलावलं हाेतं. मी त्यांना म्हटलं हाेतं की, सर तुम्ही नाट्य परिषदेत िकंवा वाचनालयात येताच तर मग अाॅफिसलाच या, सगळ्यांशी भेट हाेईल. तर त्यांनी हसतच सांगितलं, ‘अरे बाबा, डाॅक्टरने बाहेर जायला परवानगी दिलेली नाही.’ मग क्षणात त्यांच्या अाजाराची जाणीव झाली. त्यांच्या घरीही गेल्यावर त्यांनी मला क्षणभरही अापण बऱ्यापैकी अाजारी अाहाेत, याची जाणीव हाेऊ दिली नाही. किंबहुना कादंबरीविषयी जे बाेलायचे हाेतं, ते नाॅनस्टाॅप बाेलत हाेते... बाेलत हाेते... अाणि बाेलतच हाेते... मीच त्यांना मध्येमध्ये थांबवत हाेताे.
१८ जुलै २०१५ ‘शाेध’ या कादंबरीच्या प्रकाशनाचे ते क्षण... प्रकाशन समारंभाला नाटकासारखा सेट असावा, हे डाेकंही त्यांचंच. अाणि एखाद्या सुवर्णपेटीतून वा रांजणातून खजिना पडावा असेच सेट त्यांनी उभेही करून घेतले हाेते. त्यांच्या प्रेमानेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधील विशाखा सभागृहाचा कानाकाेपरा माणसांनी गच्च भरला हाेता. ते बाेलायला उठले, तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ते प्रचंड अानंदात हाेते. अापण एक काम तरी पूर्ण केलं, याचं समाधान त्या दिवशी त्यांच्या एकूणच वागण्यातून स्पष्ट दिसत हाेतं. नेहमीप्रमाणेच भरभर बाेलताना त्यांनी या वेळी मात्र अनेक मुद्द्यांना मुद्दामच बगल दिली. ते कादंबरीविषयी फारच थाेडे बाेलले; पण कादंबरीच्या निमित्ताने भेटलेल्या माणसांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्वभावाप्रमाणे दाेन-चार चिमटे त्यांनी काढलेच. पण त्यालाही टाळ्या देत उपस्थितांनी त्यांचे हे वेगळेच रूप त्या दिवशी बघितले. ताे दिवस त्यांच्या जगण्यातील अत्यंत महत्त्वाचा अाहे, हे लपून राहिलं नव्हतं. त्यानंतर तर साेशल मीडियावर खजिना कुठे अाहे, असे मेसेज फिरत राहिले... त्याविषयी त्यांना अनेकांनी कसे जावे, जागा बघायला मिळेल का, तुम्हाला कसे कळले... अशा अनेक प्रश्नांनी भंडावून साेडले हाेते; पण ते सगळ्यांच्या प्रश्नाचं निरसन करत हाेते.

नाट्यगृहाच्या दुरवस्थेविषयी मी लिहीत असताना नाट्य परिषदेत गेलाे हाेताे. सहजच मुरलीसर तिथे अाले हाेते. मी बाेलत असताना त्यांनी ते सगळं अाधी शांतपणे एेकून घेतलं अाणि नंतर म्हणाले, ‘मित्रा, तुझे प्रयत्न खूप उत्तम अाणि प्रामाणिक अाहेत; पण या निर्ढावलेल्या शासनाला जागवणार काेण? अधिकाऱ्यांचे कान पिळणार काेण? अरे, त्यांना जर वाचता येत असतं तर अापल्याला एकच बातमी या ना त्या अँगलने फिरवून फिरवून परत छापावी लागली नसती. असं काही कर की, ते खडबडून जागे झालेच पाहिजेत.’ अाता त्यांच्यातील पत्रकार जागा झाला हाेता.
हे शब्द मी लक्षात ठेवले. पुढे ते जेव्हाही भेटायचे तेव्हा विचारायचे, काय झाले नाट्यगृहाचे...? मी अापला सांगायचाे, तुमचं म्हणणं बराेबर अाहे सर. ‘हे असे अाहे तरी पण हे असे असणार नाही... दिवस अापुलाही येईल ताे घरी बसणार नाही...’ या अाेळी टाकून त्यांनी उभारी दिली अाणि काही दिवसांतच नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांना बडतर्फ केले गेले. एवढे त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. खरं तर पत्रकाराचे फार लाेकांशी चांगले नसते. त्यातही मुरलीसर निर्भीड, स्पष्टवक्ते हाेते. पण त्यांच्या पत्रकारितेत कधीही ईर्षा नव्हती. जे काही हाेते ते अभ्यासपूर्ण अाणि सत्य हाेते. त्याचाच अनेकांना फायदाही झाला.
पानिपतकार विश्वास पाटील हे नाशिकमध्ये अाले असता अाजारी असतानाही मुरलीधर सर राजहंस प्रकाशनाच्या कार्यालयात अर्धा-पाऊण तास अाधीच येऊन बसले हाेते. इतिहास हा त्यांचा अावडीचा विषय. त्यामुळे पाटील यांची ‘पानिपत’ म्हणा की, येणारी ‘लस्ट फाॅर लालबाग’ म्हणा, याविषयी मुरलीसरांना कुतूहल हाेतं. त्यांना त्याविषयी विश्वास पाटलांशी बाेलायचं हाेतं. पण विश्वास पाटीलच त्यांच्या ‘शाेध’ कादंबरीविषयी बाेलत राहिले. त्या वेळच्या गप्पांमध्ये सह्याद्रीतले सर्वात उंच शिखर कळसुबाई हे सर करायचे ठरले. काेणीतरी मुरलीसरांनी म्हणाले की, तुम्ही नाही येणार... तेव्हा ते अामच्याकडे बघून फक्त हसले... ते हास्य अाजही डाेळ्यांपुढे तसेच दिसते अाहे.
याच भेटीमध्ये असेही ठरले हाेते की, अापणही शाेधमध्ये अालेल्या सगळ्या किल्ल्यांवर जाऊन यायचे. ‘लेखकासह शाेध खजिन्याचा’ असं त्या उपक्रमाचं नावही ठरलं. अाम्ही सगळ्यांनी कळसुबाई शिखर सर केल्यावर, त्यांनी अाढावाही घेतला अाणि अापण काय करायचं, हेदेखील बाेलले. खरं तर त्यांना माहीत हाेतं, हे अाता शक्य नाही. पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जाेरावर त्यांची ऊर्जा टिकून हाेती. त्यांना ‘शाेध’ कादंबरीचा पुढचा भागही येत्या काही दिवसांत पूर्ण करायचा हाेता. ‘शाेध’च्या निमित्ताने गाैळ या संकल्पनेचे संशाेधन करायचे हाेते. जमलंच तर ‘शाेध’चा चित्रपट करायचा हाेता. अनेकांना नाशिक जिल्ह्यातील ५६ किल्ले हिंडवायचे हाेते. खूप खूप करायचं होतं, पण एक अपूर्ण पूर्णविराम ठेवून तो तुम्ही पूर्ण करा, असं सांगत त्यांनी मात्र हसत निरोप घेतला.
- पीयूष नाशिककर
piyushnashikkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...