आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युगपुरुषाचे चरित्रशिल्‍प!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले विचार आणि कार्य या बळावर सबंध विसाव्या शतकावर मोहोर उमटवलेले युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटचालीचे समग्र दर्शन घडवणारा लोकवाङ्मय गृह प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा फोटो-बायोग्राफी ग्रंथ हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे आणि साहित्याचे एक अभ्यासक विजय सुरवाडे यांनी संग्रहित केलेली डॉ. बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे व कागदपत्रे यांचा हा संग्रह आहे. रमेश शिंदे यांनी त्यांना संशोधनात साहाय्य केले आहे. संकल्पना, प्रकल्प-संपादन व निर्मिती प्रकाश विश्वासराव यांची असून ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे. नितीन रिंढे व जयप्रकाश सावंत यांचे संपादन साहाय्य आहे.

भारतीय समाजातील दलित, पीडित, निराधार माणसांमध्ये आपण माणूस असल्याची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि त्यांना माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजीवन संघर्ष केला. मूलभूत अधिकारांपासून वंचित असलेल्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकार मिळावेत म्हणून चळवळी केल्या, संघटना उभारल्या. ते करत असताना लढाऊ नेतृत्वापासून भारतीय राज्यघटनेच्या रचनेपर्यंतचे त्यांचे कार्य; पत्रकार, विद्वान संशोधक, धर्मविवेचक, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय मुत्सद्दी, नेता, समासुधारक, धर्मप्रवर्तक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या ग्रंथाद्वारे उलगडण्यात आले आहेत.

पुस्तकाच्या प्रारंभी ‘प्रवर्तन’ हा डॉ. आंबेडकरांच्या विचारविश्वाचा परिचय करून देणारा वसंत आबाजी डहाके यांचा दीर्घ निबंध आहे. यात डहाके यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा कालक्रमाने विस्तृतपणे आढावा घेतला आहे. त्यानंतर ‘जातक’ या भागात डॉ. आंबेडकरांची छायाचित्रे आणि दुर्मिळ कागदपत्रांची छायाचित्रे आहेत. छायाचित्रांप्रमाणेच बाबासाहेबांच्या चरित्रातील महत्त्वाच्या घटनांचा निर्देश करणारा कालपट दिलेला आहे. प्रवर्तन, जातक, चरितकाल अशा तीन भागांत ग्रंथाची मांडणी करण्यात आली आहे. शिवाय डॉ. बाबासाहेबांच्या सहका-यांच्या व्यक्तिचित्रांचा, परिचयाचा एक विभागही आहे.

ग्रंथातील छायाचित्रे, कागदपत्रे ही अतिशय जुनी असली, तरी त्यांचे उत्तम प्रकारे स्कॅनिंग करून ती जास्तीत जास्त सुस्पष्टपणे छापलेली आहेत. ग्रंथासाठी उत्तम प्रतीचा आर्ट पेपर वापरलेला आहे. त्यामुळे छपाईची गुणवत्ता राखली गेली आहे. संपूर्णपणे कृष्णधवल छपाई असलेले हे पुस्तक हाताळताना आपण घरातील एखादा जुना अल्बम चाळताना जसे आठवणीत रमतो, तसे काहीसे वाटून जाते. प्रत्येक फोटोच्या खाली त्या फोटोसंबंधी तळटिपा दिलेल्या आहेत. फोटोच्या आजूबाजूला भरपूर अवकाश असल्याने फोटो आणखीच उठावदार दिसतात. पुस्तकातील छायाचित्रे व दस्तऐवजांमध्ये भर घालणाºया संस्था व व्यक्ती यांच्याविषयी कृतज्ञता, तसेच व्यक्तिनामसूची पुस्तकाच्या शेवटी देण्यात आली आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘जातिसंस्थेचे उच्चाटन’ या ग्रंथातील उतारा छापलेला आहे. 2007 ते 2011 या काळात ग्रंथाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
प्रस्तुत ग्रंथ सहज सोबत बाळगणे शक्य नसले तरी आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, कार्यकर्ते, तसेच सामान्य वाचकांसाठी हा ग्रंथ संग्राह्य असाच आहे.
mayekarpr@gmail.com