आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Piyush Nashikkar Writes About Kadian Village In Punjab

सीमेवरचा सावध, नि:शब्‍द गाव (पीयूष नाशिककर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक गाव... शांत, सुंदर अाणि नीटनेटकं... त्यातला हा माेहल्ला... सगळीकडे स्वच्छता... इमारती अत्यंत रेखीव... जणू मुस्लिम संस्कृतीची छाप असलेली वास्तूशिल्पेच. शाळा-महाविद्यालये, जमातींची कार्यालये यासाठी असलेल्या भव्य इमारतींचा रंगही एकच, तोही गेरुमय. मात्र, पाहुण्यांसाठी असलेली जागा, कबरस्तान, मशिद या वास्तूंना पांढरा स्वच्छ रंग दिलेला. माेहल्ल्यातील एकाच्याही दारापुढे अस्ताव्यस्त पसारा नाही, की उभं-आडवं वाहन लावलेलं नाही. प्रत्येक वाहनाला जागा थेट घरातच दिलेली. असं सुंदर गाव म्हणजे, पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेजवळील कादियाँ किंवा कादियान... या कादियान गावात इतर जाती-धर्माचे लाेकही राहतात, पण येथे कादियानी लाेकांची संख्या अधिक असल्याचे तत्काळ जाणवते. या कादियानमधील अहमदिया माेहल्ल्यात प्रचंड शांतता असते. हीच शांतता शहरी कल्लोळातून या भागात गेलेल्यांना प्रचंड बाेचते... खटकतेही.
खरं तर १९व्या शतकाच्या शेवटी अहमदिया हे एक धार्मिक अांदाेलन हाेते. याची सुरुवात मिर्जा गुलाम अहमद यांच्या जीवन अाणि त्यांनी दिलेल्या शिक्षणातून झाल्याचे बाेलले जाते. अहमदिया समूहाचे अनुयायी गुलाम अहमद यांना हजरत मुहम्मदनंतरचे अाणखी एक पैगंबर मानतात. जे रूढीवादी मुसलमानांना मान्य नाही. त्यामुळेच इतर मुसलमान अहमदिया मुस्लिमांना ‘काफिर’ (दगाबाज-नास्तिक, उपरे अशा अर्थाने) मानतात. कादियान या गावातच या गटाचे देशातील मुख्यालय अाहे. म्हणून खरं तर यांना कादियानी म्हणतात. पण यांची वैश्विक अाेळख ही मिर्जा गुलाम अहमद यांच्या नावावरून अालेली अहमदियाँ मुसलमान अशीच अाहे. हा गट स्वत:ला मुसलमान मानताे, अाणि गर्वाने अापण मुसलमानच अाहाेत, असे सांगताे; पण मुस्लिम समुदायातील इतर गट त्यांना अापल्यातील अजिबातच मानत नाहीत. याचं महत्त्वाचं दुसरं कारण असं अाहे की, अहमदिया समुदाय जरी अल्लाह, कुराण, शरीफ, नमाज, दाढी, टाेपी किंवा त्यांचे बाेलणे अाणि इतर वर्तन हे सगळे जरी मुसलमानांसारखे असले तरीही हा समुदाय त्यांच्या जमातीचा इतिहास, परंपरा अाणि परंपरागत चालत अालेल्या काही रूढी, त्यानुसार अालेलं शिक्षण अाणि माहिती त्यानुसार हजरत माेहम्मद यांना अापले शेवटचे पैगंबर म्हणून स्वीकारत नाही. पण इतर परंपरांचा हे लाेक काही अंशी स्वीकार करताना दिसतात. अहमदिया समुदाय वर्तमानातील सर्वाेच्च धर्मगुरुलाच पैगंबराच्या रूपात मानतात.
अशी माहिती मिळाल्यावर या भागातील लाेकांच्या मनात असलेली भीती का अाहे, याचे कारण थाेडे-थाेडे स्पष्ट हाेते. एक तर हे गाव पाकिस्तानपासून अवघ्या ५०-६० किलाेमीटर अंतरावर अाहे. देशाची फाळणी झाली त्या वेळी या गावातील लाेकांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. त्यामुळे अखेरीस ३१३ अहमदिया मुस्लिम या भागात राहिले. त्यांनाच ‘दरवेश’ असेही म्हणतात, अशी माहिती येथे खास अापल्या जमातीचा प्रचार करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून अालेले प्रचारक अादिल, शाहरुख हे थाेड्या दबक्या अावाजातच देतात. अशीही माहिती मिळते की, जर या जमातीतील काेणाचे कुठेही निधन झाले, तर त्यांचा दफनविधी याच कादियानमध्ये केला जाताे. त्यासाठी येथे जमातीने प्रचंड माेठी जागा घेऊन ठेवलेली अाहे. अाजही या जागेवर अडीच-तीन हजार कबरी दिसतात. हे कबरस्तान म्हणजे एखादे गार्डनच अाहे. हे लाेक याला ‘पार्क’ म्हणतात. येथे संध्याकाळी शहरातील लाेक फिरायलाही येतात. पण येथे काेणालाही असाच प्रवेश दिला जात नाही. प्रथम त्यांच्या कार्यालयात त्याची नाेंद केली जाते अाणि मगच अात प्रवेश दिला जाताे. कबरस्तानमध्ये अत्यंत सुंदर अाणि अाखीव-रेखीव अशी बाग तयार करण्यात अालेली अाहे. या बागेत महिला अाणि पुरुषांना एकाच वेळी साेडण्यात येत नाही. त्याच्याही वेळा ठरलेल्या अाहेत. या कबरस्तानमध्येही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही अापल्यावर नजर ठेवून असताे.
कादियानींचे हे मुख्यालय असल्याने अर्थातच जमातीचा सर्व कारभार याच गावातून चालताे. त्यासाठी सुंदर इमारतींच्या अात दिवसभर जमातीचे लाेक काम करत असतात. या इमारती बघूनच एवढा पैसा कुठून जमा हाेताे, असा प्रश्न मनात निर्माण हाेताे. तर हा पैसा म्हणजे जमातीतील जे लाेक कमावते अाहेत, त्यांच्या दरमहा वेतनाच्या १६ टक्के रक्कम दरमहा जमातीत जमा करावी लागते. तर एका कुटुंबाच्या एकूण मालमत्तेतील १० टक्के रक्कम दरवर्षाला जमातीकडे द्यावी लागते. त्यामुळे या जमातीत माेठ्या प्रमाणात पैसा जमा हाेताे. जमातीतील अनेक तरुण मुलं बाहेरच्या देशांमध्ये नाेकरीनिमित्त अाहेत. तर काही कुटुंबं शेतकरी अाणि व्यावसायिक असल्याने अर्थअाेघ चांगला सुरू असताे. अाता या पैशाचा विनयाेग कसा करायचा, तर त्यासाठी अहमदियांचे जगभरातील मुख्यालय इंग्लंड येथे अाहे. तेथून हा सर्व कारभार चालताे, असे त्यांचे प्रचारक सांगतात. काेणत्याही कुटुंबात वा दाेन जणांत काही वादविवाद झाला, तर पाेलिस वा न्यायालयात जाण्याअाधी त्या लाेकांनी अापल्या जमातीत न्यायनिवाड्यासाठी यायचे असते. शक्यताे याच ठिकाणी न्यायनिवाडा हाेताे. जर तसे झाले नाही, तर मग हे लाेक न्यायालयाचे दरवाजेे ठोठावू शकतात. पण शक्यताे ती वेळ येऊ नये, असाच जमातीतील ज्येष्ठांचा प्रयत्न असताे. या माेहल्ल्यात एक प्रशासकीय इमारत, एक मशीदवजा प्रशासकीय इमारत, कबरस्तान पार्क, त्याच्या बाजूला एक इमारत, उच्च दर्जाचे विश्रामगृह तर अाहेच, पण काही अंतर चालून गेले की, जमातीचे एक विद्यापीठ अाहे. ७२ भाषांमध्ये भाषांतरित केलेल्या कुराणांच्या प्रतींचे एक छाेटे प्रदर्शन कायमस्वरूपी ठेवण्यात अालेले अाहे. त्याच्याच वरच्या मजल्यावर अहमदिया मुसलमान जमातीचा इतिहास सांगणारे सचित्र प्रदर्शन बघायला मिळते. शाळा-महाविद्यालयाच्या इमारती तर लक्ष वेधून घेतात. अशा माेठमाेठ्या भव्य दिव्य इमारती असूनही हे सगळं सीसीटीव्हीच्या नजरेत अाणि प्रत्येक गेटवर किंबहुना गल्लाेगल्लीही दिसतात, ते सिक्युरिटी गार्ड.
मुळातच, या जमातीची लाेकसंख्या फार नाही. म्हणूनच मग इतर मुस्लिम गटांचा विराेध, वा कधी पािकस्तानातून अापल्या माेहल्ल्यावर हल्ला हाेऊ नये, तसेच काेणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून, हे लाेक सदासर्वकाळ सावध राहतात. बाहेरून हे तांत्रिक रक्षण फार उत्तम प्रकारे केलेले दिसते. अाजपर्यंत तरी या भागात असा काेणताही हल्ला वगैरे झाला नाही. पण या लाेकांच्या विशेषत: तरुणांच्या मनात कायम एक भीती असल्याचे जाणवते. त्यांचं दबक्या अावाजात बाेलणं, संथ जगणं, फारसं रस्त्यावर न दिसणं, माेहल्ल्यात काेणताही अावाज न करणं, याची काळजी हे तरुण घेत असतात. या सगळ्यांत अापल्याला वेगळे काढले अाहे, ही सल त्यांच्या मनात डाचत असते. मनाला डाचणारी हीच सल त्यांच्या डाेळ्यांत दाटलेल्या भीतीतून प्रतिबिंबीत हाेत राहते...
piyushnashikkar@gmail.com