आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीतला आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात जाणे आता फार कठीण राहिलेले नाही. शिक्षण, उद्योगधंदे, पर्यटन, क्रीडा, मनोरंजन, राजकारण, अर्थकारण, या सर्वच गोष्टींमुळे आज रोजच किती तरी लोक परदेशात जातात. आपण पर्यटनास जातो तेव्हा तेथील काही विशेष वस्तू आठवण म्हणून सोबत घेऊन येतो. म्हणजे खरेदी आलीच. पर्यटक दिसले की आपल्याकडील स्थानिक दुकानदार आणि त्यांचे दलाल लोकांना आपल्या दुकानात येण्याकरिता गळ घालताना दिसतात. मात्र, परदेशात असे चित्र दिसत नाही. युरोप वा अमेरिकेतील मॉल म्हणजे अनेक नवनव्या वस्तूंची माहिती जाणून घेण्याचे ठिकाण आहे. विस्तीर्ण जागेत 150 ते 200 दुकाने एकाच ठिकाणी असतात. आता असे मॉल आपल्याकडेही आहेत. परंतु काही मूलभूत फरक जाणवतातच.


आपण अशा मॉलमध्ये फिरतो तेव्हा खूप नवीन गोष्टी, वस्तू, सजावटीचे साहित्य, दागिने, कपडे, सौंदर्यप्रसाधने आपल्याला आकर्षित करतात. लगेच घ्यावे वाटतात. कधी कधी हा मोह अनावर होतो आणि आपण काही वस्तू खरेदी करतो. आनंदात घरी येतो, मात्र घरी आल्यावर ती वस्तू अनावश्यक आहे, याची जाणीव होते. भारतात अशा वेळी मनस्ताप करणेच आपल्या हाती असते. पण परदेशात काही अनावश्यक गोष्टींची खरेदी केली गेली असे वाटले तर आपण त्या मॉलमध्ये परत करू शकतो. याकरता प्रत्येक दुकानात स्वतंत्र विभाग असतो. साध्या टाचणीपासून किमती इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, कपडे, पर्स काहीही तेथे परत करता येते. फक्त पावती पाहिजे असते. त्या बदल्यात त्या किमतीची दुसरी वस्तू घ्या, बदलून मिळणार नाही, परत करता येणार नाही वगैरे प्रकार तेथे नाही. आपल्याकडे एखादी साडी आपण घेतली आणि त्याचा रंग किंवा डिझाइन घरी आल्यावर तितकेसे आवडले नाही तर ती साडी बदलून आणण्यास्तव दुकानदाराकडे किती मिनतवा-या कराव्या लागतात, हे त्या वेळी हमखास आठवतेच. मॉलसमोर र्पाकिंगसाठी भरपूर जागा असते. प्रत्येक दुकानात आणि मॉलच्या दर्शनी भागात 3/4 ठिकाणी सरकते जिने, लिफ्ट आणि रेस्टरूम असतात. मुलांकरिता खास खेळणी असलेली सुशोभित जागा असते.


आयकिया हा तेथील फर्निचरचा अतिशय मोठा आणि प्रत्येक राज्य, गाव, शहरात असलेला मॉल आहे. येथील फर्निचर उच्च श्रेणीचे, वजनाने अतिशय हलके, सुबक, देखणे असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे फर्निचर लहान खोक्यात सुटे भाग करून ठेवता येते. घरी आणल्यावर आपणच ते भाग जोडून सोफा, दिवाण, जे काय असेल ते फर्निचर बनवायचे. त्या सोबत एक इंग्रजी झेड आकाराची अलाइन की फक्त असते. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आपण हे स्वत: तयार केले याचा वेगळाच आनंद उपभोगता येतो. हे फर्निचरही तुम्हाला घरी आल्यावर बदलावे, परत करावे वाटले तर ती सुविधा आहेच.


लहान मुलेही कोणतीही वस्तू हाताळतात, सेल्समन त्यांनाही त्याची माहिती त्याच आत्मीयतेने देतात, जितकी ते मोठ्यांना देतात. आणि आपण विचारत नाहीत तोवर सेल्समन/सेल्सगर्ल आपल्या मागेमागे फिरत नाहीत किंवा काही सूचनाही करत नाहीत. जर तुम्ही न्यूयॉर्कच्या मॉलमध्ये काही खरेदी केली आणि लगेच दुस-या स्टेटमध्ये तुम्हाला जावे लागले, तेथे गेल्यावर तुम्हाला ती वस्तू बदलायची किंवा परत करायची गरज वाटली तर तुम्ही त्या स्टेटमधल्या मॉलमध्ये जाऊन त्या दुकानात ती वस्तू पावती दाखवून परत करू शकता. जेसी पेनी, सिअर्स, मेसीज, एरोपोस्टल, ओल्ड नेव्ही, अमेरिकन ईगल, अरमानी एक्स्चेंज, अशा शॉपची शृंखला सगळ्या अमेरिकेत आहे.
तेथे कारखरेदीच्या अभिनव पद्धती आहेत. रोख रक्कम, हप्ता स्वरूपात रक्कम, बँकेचे कर्ज आहेच, याशिवाय तुम्ही नवी कार भाडेतत्त्वावरसुद्धा घेऊ शकता. याकरता 2/3 वर्षांचा करार असतो. तुम्ही नियमित ठरलेली रक्कम दरमहा भरायची आणि कार वापरायची, करार संपताच परत करायची. स्वप्नवत वाटतं ना? पण हे सत्य आहे.