मूल झोपलं आहे....
मूल झोपलं आहे
घामेजल्या तळहातात
चॉकलेटचा कागद पकडून
मूल झोपलं आहे
उद्या शाळेत जाण्याची काळजी सोडून
उघडचं दप्तर टाकून
मूल झोपलं आहे
खेळण्याची फौज एकवटून
मूल झोपलं आहे
झोपली आहे छोट्याशा अंथरुणावर
आभाळाएवढी खुशी
हा अंधार आहे तोपर्यंतच
जोपर्यंत झोपलेलं आहे मूल....
(हिंदी कवी - यश मालवीय
मराठी अनुवाद - पृथ्वीराज तौर, नांदेड)
छोट्या मुलासारखी ही अगदी छोटीशीचं कविता... मुलासारखीच अगदी साधी सरळ आणि निरागसता रचनेतही व्यक्त करणारी...म्हटलं तर अगदी नकारार्थी वास्तवावर तुटून पडणारी आहे ही कविता. पण त्या नकारावर भर न देता अगदी मुलाच्या सहज साध्या जगण्याच्या भावविश्वाचे अगदी सोप्या सरळ मोजक्या शब्दात वर्णन करून कवी शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करतो.
दप्तराचे ओझे वगैरे यावर इतक्यांदा चर्चा झाली की त्याचे गांभीर्यच हरवले. त्या रूक्ष चर्चा केवळ पुस्तके किती कमी करायची याचाच हिशेब मांडत राहिल्या. मुलाच्या निरागस भावविश्वावर आक्रमण करणारी आमची शिक्षणपद्धती शाळेत आणि मुलाला महत्त्वाकांक्षेच्या चाबकाने सर्कशीसारखे घरात नाचविणारे पालक यात कुचंबणा होणा-या मुलाचे भावविश्व कवीने अचूक रेखाटले आहे.
पूर्वी पालकांना शिक्षण कळत नव्हते तेच बरे होते, असे म्हणायची वेळ आली आहे. पु.ल. म्हणायचे तसे आमच्या लहानपणी पालक नावाची फक्त भाजी होती. पण आता पालक ही दहशतवाद्यांनंतर सर्वात मोठी हिंसक जमात आहे. मुलांवर पालकांचे खरेच प्रेम असते का इतके थेटपणे विचारण्याची वेळ आली आहे. आपल्या अतृप्त महत्त्वाकांक्षेचे साधन म्हणून मुलांना वापरणारे पालक मुलांना मुले जोपर्यंत त्यांच्या कलाने वागतात तोपर्यंत गोडीत वागतात म्हणजेच एकप्रकारे स्वत:वरच पालकांचे प्रेम असते. ज्याक्षणी मूल त्या अर्धवट स्वप्नांचे गुलाम होणे नाकारते त्याच क्षणी पालकातील हिंसा बाहेर येते. त्यामुळेच नापाशीमुळे जितक्या आत्महत्या होतात त्या आत्महत्यांमध्ये पालकांच्या भीतीने झालेल्या आत्महत्यांची संख्या सर्वात जास्त आहे. पालकांनी मुलांचे त्यामुळेच 24 तास शिक्षण करायचे आहे. मुलांना एकाचवेळी सर्व कलागुणांमध्ये तरबेज करायचे आहे.
आपला मुलगा एकाच वेळी विजय तेंडुलकर व सचिन तेंडुलकर झाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. यामुळे मूल सतत त्या तणावाखाली असते. पालकांना त्यासाठी मुलांना सतत कार्यमग्न ठेवायचे आहे. त्यासाठी त्याला जास्तीत जास्त वेळ शाळेत डांबायचे आहे. शाळा सुटल्यावर पुन्हा क्लासला पाठवायचे आहे. क्लास संपल्यावर त्याला छंदवर्गाला पाठवायचे आहे. छंदवर्ग संपल्यावर त्याला घरचा अभ्यास करायला लावायचे आहे. रात्री उशिरापर्यंत जागवून पुन्हा पहाटे चरकाला जुंपायचे आहे. रात्रीच्या झोपेचे तास वाया जातात ही खंत सतत पालकांना कुरतडत राहते. ही झोप नसती तर पालकांनी रात्रीच्या क्लासची मागणी केली असती. जपानमध्ये बालशाळेत प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी 2 ते अडीच वर्षे वयाच्या मुलांना क्लास लावलेत आणि त्यासाठी रात्रीच्या बॅचला मुलांना बसवून पालक क्लासबाहेर उभे आहेत. हे सारे बघितले की ‘आगीतून फुफाट्यात’ ही म्हण शाळा आणि घर यांच्याकडे बघूनच पडली की काय, असा प्रश्न पडतो...पालकांचा हा क्रूर चेहरा बघितला की ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या वाक्याचे हसू येते. पालकांचा त्रास नाही म्हणूनच देव राहतो त्या जागेला स्वर्ग म्हणतात की काय... असा प्रश्न पडतो. जर खरंच देवाला आई-वडील असते तर त्याने नंतर ही खंत व्यक्त केली असती का...
कवीने मुलांचे शाळा व पालकांकडून होणारे शोषण अचूकपणे पकडले आहे. मुलाच्या भावविश्वात शेवटी चॉकलेटचा कागद, खेळणी हेच सर्वच असते... चेकबुकापेक्षा पुस्तकात जपून ठेवलेले मोरपीस त्याला ठेवा वाटते. त्याचे हे हळुवार जगणे हे शिक्षण, पालक कुठेच विचारत घेत नाही. त्याला झोपेत पडणारी स्वप्ने यावरच फक्त त्याचा आता अधिकार उरला आहे. झोपेपूर्वी आणि झोपेनंतर तो गुलाम आहे. त्याचं स्वतंत्र बालपण शाबूत राहण्याचा कालखंड फक्त रात्रीच्या अंधाराचा आहे. प्रकाशात गुलामीचा अंधकार आणि झोपेच्या अंधारात स्वातंत्र्य अशी ही वेगळीच विसंगती कवी मांडतो.
संकलन
हेरंब कुलकर्णी
herambrk@rediffmail.com1