आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपराजित दाभोलकर......

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येस एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. अर्ज, आर्जव, आवाहन, विनंती, निदर्शने असे सगळे होऊनही मारेकरी सापडलेले नाहीत. 20 ऑगस्ट 2013 रोजी जणू काही घडलेच नाही, असे समजून सगळे पूर्ववत झाले असताना आशा जागवणारी ही कविता...

20 ऑगस्ट 2013,
रक्ताच्या थारोळ्यात पडलाय,
फुटपाथच्या कडेला,
पण, अंधाराच्या सनातनी दूतांनो,
मी तुरुंगातून बघतोय
तुमच्या पराभवाची नांदी
दाभोलकरांच्या प्रतिमेवर फुली मारून, तुम्हाला करायची होती
दाभोलकरांची इतकी जीवघेणी घृणा
तर खुशाल करायची होती
मूठ मारून भानामती,
आणि टाकायची होती मुरगाळून
एखादी कोंबडी,
दाभोलकरांच्या नावानं,
108 भटजींचा कळप घेऊन,
रचायचा होता एखादा महायज्ञ
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दारात
दाभोलकरांच्या वैज्ञानिक दृष्टीला
भस्मसात करण्यासाठी
करायची होती करणी अंनिसवर, मांत्रिकाकडून घ्यायचा होता अंगारा, धुपारा
आणि जादूटोण्यानं करायचा होता आळाबांधा
दाभोलकरांच्या विवेकवादी विचारांचा...
एखाद्या चमत्कारी बुवाकडून, एखाद्या अवतारी मातेकडून,
एखाद्या गुरुमहाराजाकडून,
द्यायचा होता कठोर शाप,
दाभोलकरांच्या सत्यानाशासाठी...
धारेचे लिंबू अर्धवट कापून,
टाकायचा होता बिबव्याचा उतारा,
दाभोलकरांच्या वाटेवर,
त्यांच्या नेत्रात फूल पाडण्यासाठी,
त्यांची वाचा बंद करण्यासाठी...
श्रद्धेने लटकवायची होती काळी बाहुली, तुमच्या शाखेच्या बाहेर
आणि आरपार खुपसायच्या होत्या सुया, बाहुलीच्या अंगभर, दाभोलकर समजून...
हात जोडून, डोळे झाकून
करायचा होता नवस,
एखाद्या कोट्यधीश देवस्थानाला
पावलापावलावर उभे करायचे होते मठाश्रम,
गावागावात, वस्तीवस्तीत
भरवायचे होते सत्संग,
आणि खुशाल करायचे होते दाभोलकरांना
पाखंडी सैतान म्हणून घोषित...
आमची ना नव्हतीच कधी
आज मात्र तुमचं कावरंबावरं थोबाड, ओरडून ओरडून सांगतंय
तुम्ही हे सारं करून थकला,
मणक्याचं टिचं भरल्यागत वाकला
पण यातली कोणतीच मात्रा
दाभोलकरांवर लागू होईना
काही केल्या दाभोलकरांचं बंड
तुम्हाला रोखता येईना.......
दाभोलकर ऊन, पाऊस, वारा पीत,
ओठी घेऊन समतेचं गीत,
प्रत्येकाच्या डोक्यातला अंधार झाडत, मस्तकातले धर्मांध किडे काढत,
अंधश्रद्धेची भुते गाडत..
अहोरात्र चालत राहिले,
काळोखाच्या साम्राज्यात उजेड पेरत
मसणवट्यापासून भोंदूच्या मठापर्यंत,
एक गाव एक पाणवठ्यापासून
जात पंचायतीच्या उच्चाटनापर्यंत,
दाभोलकर अखंड लढत राहिले,
......पण....अंधारातल्या सनातनी दूतांनो,
तुमच्या बुवाबाजीला, तुमच्या कावेबाजीला,
तुमच्या मांत्रिकाला, तुमच्या तांत्रिकाला, तुमच्या सुईला, तुमच्या बिब्याला,
तुमच्या ज्योतिषाला, तुमच्या पंचांगाला, तुमच्या अंगार्‍याला, तुमच्या धुपार्‍याला,
तुमच्या अधर्माला, तुमच्या कुकर्माला
क्षणभरही विचलित करता आलं नाही, दाभोलकरांच्या विजिगीषू ध्येयवादाला,
तुमच्या तथाकथित आध्यात्मिक शक्तीने कणभरही मारता आलं नाही
नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला, अंतिमत: पराभूत होऊन
तुम्हाला टेकावे लागले गुडघे... दाभोलकरांसमोर...
म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं
चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं,
जे आज तुम्ही भिजवलंय पुन्हा दाभोलकरांच्या रक्तात,
हा तुमच्या कुकर्माचा लेटेस्ट अध्याय, आणखी एक कलंकित कडी...
रक्ताच्या थारोळ्यात पडलाय,
20 ऑगस्ट 2013,
फुटपाथच्या कडेला...
पण...अंधाराच्या सनातनी दूतांनो,
मी तुरुंगातून बघतोय
तुमच्या पराभवाची नांदी....आणि
अपराजित दाभोलकर......

- सचिन माळी
(ऑर्थर रोड जेलमधून)
(कबीर कला मंचच्या सौजन्याने)