आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यानंदी ‘कविता-रती’...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


30 नोव्हेंबर 1985 रोजी कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या 75व्या अमृतमहोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून या शुभमुहूर्तावरच ‘कविता-रती’ या नियतकालिकाची स्थापना झाली. काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा व कविविमर्श यांनाच केवळ वाहिलेले हे द्वैमासिक धुळे येथून प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या चोखंदळ संपादनाखाली आजतागायत प्रकाशित होत आहे. 30 नोव्हेंबर कविता-रतीने बत्तिशीची उमर गाठली आहे.

‘कविता-रती’ हे केवळ काव्य विषयालाच वाहिलेले एक आगळेवेगळे वाङ्मयीन नियतकालिक आहे. आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासात नियतकालिकांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. ज्ञानप्रसार, लोकसुधारणा, मतप्रकटन, विचारजागृती याबरोबरच वाङ्मयीन दृष्टी देण्याचेही काम नियतकालिकांनी केले. कविता-रतीनेही वाचकांना कवितेची गोडी लावली. काव्यसमीक्षेमुळे वाचकांना काव्याची आशयघनता कळू लागली. नवकवींना कविता-रतीने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. काव्यस्पर्धा, काव्य समीक्षालेखन, दर्जेदार संदर्भग्रंथ असे विशेषांक, कविसंमेलने, कवितेचे अध्यापन, आलोचना आकलन, आस्वाद यावरील प्रदीर्घ लेख, मुखपृष्ठांची विविधता, व्यक्तिवेध, संदर्भसूची, संपादकीय विशेषदृष्टी अशा अनेक वैविध्यपूर्णतेने नटलेले कविता-रतीचे अंक दर्जेदार आहेत. या नियतकालिकामध्ये नव्या-जुन्या पिढीतील कवींच्या कविता आहेत. भारतीय व भारतीयेतर भाषांमधील अग्रगण्य कवींच्या कवितांचेही अनुवाद प्रकाशित झाले आहेत. काव्यविषयक सैद्धांतिक टिपणे, लेख, नामवंत कवींच्या काव्याचा परिचय, रसग्रहणे, मर्मग्रहणे, काव्यविवेचन, काव्यसंग्रहाची परीक्षणे कवींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध, अशा अनेक घटकातून कविता-रती काव्यरसिकांची सेवा करत आहेत. गेल्या 27 वर्षांपासून कविता-रती आपले कार्य नेटाने करते आहे. या वाटचालीत कविता-रतीवर अनेक संकटे आली. पण या संकटातूनही नव्याने उभे राहण्याची हिंमत कविता-रतीला मिळाली ती केवळ संपादक प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या कविता-रतीवरील प्रेमामुळे-निष्ठेमुळेच! विशेषीकरणाच्या युगात कविता-रतीची विशेषीकरणाच्या दिशेने चाललेली वाटचाल स्तुत्य आहे. केवळ काव्यप्रांताला वाहिलेले हे नियतकालिक चालवण्याचे आव्हान प्रा. पाटील यांनी लीलया पेलले आहे.

‘कविता-रतीचा हात हातातून सोडू नका.’ असे बजावणा-या कुसुमाग्रजांच्या शब्दाला जागत आजही एकनिष्ठेने सेवा करताना प्रा. पाटील दिसतात. ‘कवितापण’ या एकाच निकषावर नानाविध आशयाच्या व अभिव्यक्तीच्या कवितांसाठी कविता-रतीचा दृष्टिकोन व्यापक आहे. कविता-रतीचे आजपर्यंत जवळपास 144 अंक प्रकाशित झाले असून या अंकांमधून 600 कवी-कवयित्रींच्या मिळून 3000 पर्यंत कविता प्रकाशित झाल्या आहेत. या नियतकालिकाने कुसुमाग्रज, वा. रा. कांत, इंदिरा संत, संजीवनी, बालकवी, ज्ञानेश्वरी, विंदा करंदीकर, म. सु. पाटील, बा. सी. मर्ढेकर, प्रा. रा. ग. जाधव, बा. भ. बोरकर असे विशेषांकही त्या त्या कवींच्या व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्याच्या उदात्त हेतूने प्रकाशित केले आहेत. 2012चा दिवाळी अंक ‘कविता मर्मग्रहण विशेषांक’ म्हणून प्रकाशित झाला आहे. या अंकातून प्रकाशित होणा-या अनेक कवींच्या परिचित अपरिचित कवितांच्या मर्मग्रहणातून कवितेच्या वाचकाला कवितेचे मर्म जाणून तिचे आकलन करून घेण्याची दिशा प्राप्त होईल. या उद्देशाने डॉ. सुधीर रसाळ, डॉ. द. ता. भोसले, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. निशिकांत मिरजकर, डॉ. प्रभाकर बांगले, डॉ. एकनाथ पगार अशा नव्या जुन्या समीक्षकांनी कवितांची मर्मग्रहणे लिहिलेली आहे. तसेच सकस व समृद्ध कवितांचा सुमारे पाऊणशे कवितांचा नजराणाही आहेत. 27 वर्षांच्या काळात ‘कविता-रती’मधून आलेल्या कवितांच्या आशयाभिव्यक्तीचे अनेक कंगोरे दिसतात. या सर्व काव्यातून पारंपरिकतेबरोबरच नवतेचाही प्रत्यय येतो. कवितेचे ‘कवितापण’ महत्त्वाचे मानून काव्यविषयक खुली व्यापक भूमिका स्वीकारून कविता-रतीने हा आधुनिक मराठी काव्याचा ऐतिहासिक दस्तऐवज आपणासाठी खुला करून दिला आहे.