आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेचाच झरा उपसत आलोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेली चोवीस वर्षे कविता लिहितोय. लिहिण्याचा धर्म इमानेइतबारे निभावत आलोय. एखादं व्रत घ्यावं तसं. पण मला एवढ्या दिवसांत कधीच प्रश्न पडले नाहीत, की मी कविता का लिहितो? कवितेनं मला काय दिलं? कविता अन् माझ्या जगण्याचे संदर्भ काय?माझ्या कवितेची प्रेरणा कोण? कवितेचं प्रयोजन काय?कवितेचं आशयकेंद्र कोणतं?मात्र हे सारे प्रश्न माझ्या अंगावर धावून आले; माझ्या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर. मग स्वत:ला उकरत नेणं भाग पाडलं.
एवढ्या दिवसांत मी कवितेचाच झरा उपसत आलोय. तिच्यापेक्षा वेगळं जगलो नाही. स्वत:च्या कातडीइतकी ती मला जवळची. मान्य आहे, या दरम्यान जगामध्ये खूप बदल घडत होते आणि मी फक्त कविता लिहीत होतो. कारण कविता ही एकच अशी गोष्ट आहे, जी मी हट्टाने अन् हक्काने करू शकतो. माहितंय मी खूप काही कमावलं तेवढंच काही गमावलंही. कमावल्या-गमावल्याची मला बेरीज-वजाबाकी मांडायची नाही. मला फक्त खोदत न्यायची आहे कवितेची विहीर. एवढीच एक गोष्ट माझ्या मालकीहक्काची आहे. म्हणूनच आता तरी तिच्याविषयी बोललं पाहिजे. तिच्या विस्तवाच्या शेकोटीशी अस्वस्थ ठणकणारं अंग शेकवून घेतलं पाहिजे. मेंदूत खोल रुतून बसलेली अनुभवांच्या गांधीलमाश्यांची पोळी नव्यानं डिवचली पाहिजेत.
ठणक भिडली बेंबीच्या देठाला
मशागतीतून एकुलतं मागं राहिलेलं धसकट
खसकन खुपसलं पायात
हाच तो बाप, ज्यानं मोडला आईचा खोपा
तो रात्रंदिनी सोलवटून काढायचा माझी आतडी
मी भ्यायचो पाहून त्याची
निगरगट्ट गेंड्याची कातडी
त्यातलाच एक जळता अनुभव कवितेतून उचलून ठेवला. असे कितीतरी अनुभव एकापास एक उभे केले अन् होत गेली एक एक कविता.
कृषिजन संस्कृतीच्या परिक्षेत्रात वाढलो; म्हणून याच पर्यावरणातील प्रतिमा प्रतीकांचं ‘वारूळ’ अंगावर घेऊन उठलो. वास्तवाच्या...विस्तवाच्या...
जहाराच्या...हजारो मुंग्याच मुंग्यांनी पोखरून टाकलं माझं शरीर. म्हणून ते फेडून नवंच धारण केलं कवितेचं शरीर. चिंतनाचा मेंदू परिस्थितीच्या संस्कारातून तयार झाला होता. शिवाय मनाच्या वावराची चांगली मशागत केली गेली. त्यामुळेच प्रतिमांचे पीक जीवनानुभवातून घेण्याचे कसबही माझ्यात सहजी आले. आणखी पिकाला इजा होऊ न देता, त्यात वाढलेलं तणकट अचूक निंदता आलं. पुन्हा हेच कसब सृजनप्रक्रियेत आपोआप उतरले. काटेकुटे वेचून गव्हाळीच्या रानासारखी कविता निर्मळ केली. कवितेच्या आत्म्याची बोली सहज सोपी झाली.
चेहर्‍याआड दडलेल्या कुरूप चेहर्‍याचं ठळक चित्र कविता रेखाटते. परिस्थितीचं वाचन कविता करते. तिच्या मापट्यात सगळे सारखेच. जिणं जगता जगता काट्याबोराट्यांचा... विळ्याखुरप्यांचा... धसकट-रुमण्यांचा... घारीगिधाडांचा... हिंस्र जित्राबांचा... इत्यादी इत्यादी अवघडांचा अर्थ कळत गेला. तोच कवितेत आपापली जागा घेऊन बसला. त्यांच्या पायात आशयाच्या दोर्‍या मी घट्ट बांधल्या. जगात अनेक गोष्टींची खरेदी-विक्री करता येते. पण संवेदनशीलता माणूस विकू शकत नाही किंवा खरेदीही करू शकत नाही. तरीही मी गव्हाची ओंबी, हरभर्‍याची घाटी, बाजरीचे दाणे, तुरीच्या शेंगा, जवारीचे ताटे, भुईमुगी शेंगा, गवताचा भारा, चार्‍याची पेंढी, अंबाडीचे बोंड असा कृषिजन संस्कृतीतील ऐवज आणलाय, संवेदनशीलतेत कालवून वाङ्मयाच्या बाजारपेठेत. त्यावर मी कुठलंच लेबल चिकटवलेलं नाही. त्यास नागरीचे लेबल लावायचे की ग्रामीणचे? हे मात्र ज्याला त्याला सुचू शकते, ज्याच्या त्याच्या वकुबानुसार. अर्थात कुठलेही जगणे, कुठलीही समस्या, कुठलीही दु:खे ही लेबलांपलीकडचीच असतात. माझ्या समकालीन साहित्यव्यवहारात घेऊन आलोय, थोड्याशा साळुंक्या, थोड्याशा चिमण्या, थोडेसे सरडे, थोड्याशा पाली, थोडेसे मोर, थोड्याशा म्हशी, थोड्याशा मुंग्या, थोडेसे घोडे, भलतेच जहरी काटे, चिंचालिंबाचा पाला. धसकटही; फक्त त्यांना जराशा नांग्या आहेत. इतर पशुपक्षीही आहेत; ते काहीसे भयंकर असले तरी त्यांनी माणसांचे मुखवटे पांघरले आहेत.
शेतकरी दिंडी पंढरीत नेऊ
विठोबाला देऊ हात त्यांचे
शेतकरी दिंडी जेजुरीत नेऊ
खंडोबाला देऊ पाय त्यांचे
शेतकरी दिंडी दर्‍या-खोर्‍या नेऊ
तिथे डोळे घेऊ उपसून
शेतकरी दिंडी आतली रांडोळी
केली रे खांडोळी घातोपाती...
तसेच आणखीही काही सामूहिक दुर्दशेची चित्रे रेखाटून काढलीयत.
इतक्या खासगी की स्वत:च्या कातडीएवढ्या जवळच्या गोष्टीही मी घेऊन आलोय. खरं तर त्यांचा बभ्रा किंवा बाजार मांडू नये, असे म्हणतात. मला त्याशिवाय गत्यंतर नव्हतं; त्या गोष्टी काळजातल्या आहेत. काळजाच्या जवळच्या आहेत. काळीज हिंदळून सोडणार्‍या आहेत. काळजाला जवळचा शब्द हुरदं. त्या हुरद्यात साठवून ठेवलेल्या आहेत. म्हणून हुर्दुकटीपा; याच शीर्षकाची एकत्रित पेंढी बांधली. गवताची पेंढी बांधावी त्या पद्धतीनेच. मात्र संत नामदेव म्हणतात तसे बांधल्या पेंढीचा आळा सुटून तृण रानोमाळ होते. तरी तो आळा मी इथे सोडतो आहे. यामध्ये पिकाच्या रूपानं जमिनीतून उगवून आलेला आईचा हिरवा हात आहे. पायात खसकन खुपसणार्‍या धसकटाच्या रूपातला बाप आहे. दोन आडदांड धसमुसळी ताटं होऊन आलेले चुलतेकाके आहेत. शिंगाड्या काट्यांनी बोचकारून काढणारी बाभूळ म्हणजे आजी आहे. अंगावर व्हसकन येणारे दाढेत हाडूक चघळणारे काळ्याबेंद्र्या कुत्र्याच्या रूपातले गाव आहे. आईच्या जात्यापाळच्या लोकगीतातल्या चार गावच्या बारवा, म्हणजे बहिणी आहेत. आईच्या तर अनेक गोष्टी आहेत. त्या न संपणार्‍या आहेत. मात्र काहींचा उल्लेख करावाच लागेल. उदा. आईचा जाळ लटकवला गेलेला पदर आहे. उन्हाच्या फांदीला टांगलेले आईचे भिंगुळवाणे घरटे आहे! आईच्या धसकटाच्या रानामध्ये रक्ताळलेल्या पायांच्या टाचा आहेत. आईचे वरून फुले ढाळणारे मात्र आतून जळणारे चंदनाचे खोड आहे. याशिवाय आणखी काही गोष्टी आहेतच. रानभर चरणारी चंद्री गाय आहे. माझी स्वत:ची धरून आणल्या मेंढरागत शाळेच्या पहिल्या दिवसाची अवस्था आहे. नात्यागोत्याचे जंजाळ आहे. अंगावर रेलून आलेली घराची भिंत आहे. इत्यादी एक ना दोन अनेक गोष्टी; त्यांची मोजदाद ठेवता येत नाही. जेवढे जमेल तेवढेच कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे.
असो. जगरहाटीत या सर्व गोष्टी अनघड. त्या सुघड करून सांगायच्या आहेत. त्यांचा उमेज करून द्यायचा आहे. आपल्यापुरतं ज्ञात झालेलं एक ‘सलग दुखणं’ लोकांना ज्ञात व्हावं, एवढीच अपेक्षा यापाठी आहे. गेल्या दिवसांचा हिशोब मांडला तर आज लक्षात येतंय की, माझ्या आसपासचे कोण कोण काय काय झाले; मी मात्र कवी झालो. वयाची अडतीस पावले चालून आलो तरी कवितेचाच झरा उपसत आहे अन् उपसतच राहीन...
oviaishpate@gmail.com