आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pooja Takalkar Writes About How To Learn After Marriage, Madhurima, Divya Marathi

लग्नानंतर शिकायचंय का नाही?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न हा अनेक मुलींच्या शिक्षणातला, नोकरीतला मोठा अडथळा असतो. मात्र स्वत:वर विश्वास आणि कुटुंबीयांची साथ मिळाल्यास लग्न हे आयुष्याला आकार देणारे महत्त्वाचे वळण ठरते.
त्यामुळे प्रत्येक सासू-सासऱ्यांनी आपल्या घरात येणाऱ्या सुनेच्या आयुष्याचा विचार नक्की करावा.

माझं चार वर्षांपूर्वी लग्न ठरलं. माहेरी एकत्र कुटुंब आहे. मी बीई केमिकलच्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा. स्थळ चांगले होते, म्हणून आम्ही सर्वांनीच लग्नाला ‘हो’ म्हटलं.

माझं वय लहान असल्यामुळे फार प्रश्न विचारण्याची हिंमत नव्हती. मनात भयंकर विचार येत. माझे बीई शेवटचे वर्ष पूर्ण होणार का? मला पुढे शिक्षण घेता येईल का? असे अनेक प्रश्न मनात ठेवून मी बोहल्यावर चढले, २०१२मध्ये. फोटोग्राफर अंकुश टाकळकर (एमबीए) हे माझे पती. त्यांचा १५ वर्षांपासून १५ जणांचे युनिट असलेला स्टुडिओ होता. त्यांची आर्थिक बाजू भक्कम होती. घरात सासू, सासरे, मी व पती असे आमचे चौकोनी कुटुंब आहे. कुटुंब सुशिक्षित असल्यामुळे मला पुढे शिक्षणाची परवानगी मिळाली. मी एक वर्ष माहेरी राहून बीई पूर्ण केले. बीईला मला ९० टक्के मार्क मिळाले. गुजरात विद्यापीठातून मी पहिली आले. सासू, सासरे खूप खूश झाले. त्यानंतर पतीशी सल्लामसलत करून मी एमईसाठी पुण्यात सिंहगड काॅलेजला प्रवेश घेतला. दोन वर्षे मी पुण्यात होते. घरून मला खूप प्रोत्साहन मिळाले. सासूबाईंनी माझ्यावर घरातील जबाबदारी जास्त टाकली नाही. त्यांची खूपच साथ मिळाली. पतीने आर्थिक बाजू सांभाळली. मीही त्या विश्वासाला जागून खूप मेहनत केली. रात्र-दिवस अभ्यास केला. या श्रमाचे फळ मला मिळाले. मी पुणे विद्यापीठात पहिली आले. एमईनंतर मी औरंगाबादमध्ये स्थायिक झाले व नोकरी करण्याचे ठरवले. महिनाभरात मला जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ची नोकरी मिळाली. परंतु मी नोकरी न करता पुढे शिक्षण घ्यावे, असे माझ्या कुटुंबाच्या मनात होते. पुढे आयुष्यभर नोकरी करायची आहे. शिक्षण होत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.

मलाही शिक्षणाची आवड असल्यामुळे मी परदेशात जाऊन पीएचडी करण्याचं ठरवलं. तेही शिष्यवृत्ती घेऊनच. नोकरी चालू असताना माझे प्रयत्न सुरू केले.

मी तीन देशांत माझे प्रबंध पाठवले. त्यातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील एका विद्यापीठाने माझी निवड केली. सहा महिन्यांच्या परिश्रमानंतर मला दीड कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यात चार वर्षांची फी आणि राहण्याचा व जाण्यायेण्याचा खर्च समाविष्ट आहे. घरात सर्व आनंदी होते. पतीही माझ्यासोबत ऑस्ट्रेलियात येऊन फोटोग्राफीचे अॅडव्हान्स शिक्षण घेत आहेत. तिथे मी ‘नॅनो टेक्नोलॉजी’ या विषयावर संशोधन करणार आहे. नंतर भारतात येऊन एखादा छोटा उद्योग टाकण्याचे माझे स्वप्न आहे.

मला एवढंच सांगावंसं वाटतं की, प्रत्येक मुलीने ठरवलं तर ती लग्नानंतरही जबाबदारी सांभाळून शिकू शकते. अर्थात मला घरून साथ मिळाली, त्यामुळे मी मोठी यशस्वी झेप घेऊ शकले. त्यामुळे लग्न हा आपल्या शिक्षणातला अडसर मानू नका. तसंच, मुलाच्या आईवडिलांनीही सुनेला शिकायचं असेल, ती हुशार असेल तर तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या, मदत करा.
बातम्या आणखी आहेत...