Home | Magazine | Pratima | poor people education

गरिबांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा पेटवणारी ‘सुधर्मा’

सुनील बडगुजर | Update - Nov 11, 2011, 10:19 PM IST

झोपडीत राहणा-यांच्या नशिबी दारिद्र्य हे पाचवीलाच पुजलेले असते. तेथे राहणा-या प्रत्येकाला दोन वेळचे अन्न पोटात टाकायलाही फार कष्ट पडतात.

 • poor people education

  झोपडीत राहणा-यांच्या नशिबी दारिद्र्य हे पाचवीलाच पुजलेले असते. तेथे राहणा-या प्रत्येकाला दोन वेळचे अन्न पोटात टाकायलाही फार कष्ट पडतात. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण देण्याचा प्रश्नच उरत नसल्याने झोपडीत कधीही 100 टक्के साक्षरतेचा दिवा पेटत नाही; पण हा साक्षरतेचा दिवा पेटवण्याचे महान कार्य नशिराबाद (ता.जळगाव) येथे राहणारे हेमंत बेलसरे, आपल्या ‘सुधर्मा’ ज्ञानसभा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत. कुठलाही लालसेचा हेतू मनात न ठेवता स्थापन केलेल्या हेमंतरावांच्या संस्थेने आज उत्तुंग भरारी घेतली आहे. निव्वळ कागदी घोडे नाचवून शासकीय अनुदान लाटणा-या ‘चमको’ सामाजिक संस्थांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे उदाहरण आहे. संस्थेच्या माध्यमातून नऊ वर्षांत 150 निरक्षर मुलांना अ, ब, क, ड कळायला लागले असून ते आपल्या झोपडीतील अंधार दूर करण्यासाठी संघर्षरत आहेत.
  समाजकार्याने झपाटलेले हेमंत बेलसरे हे जळगावच्या तत्कालीन केबीएक्स व हल्लीच्या बॉश कंपनीत कामाला आहेत. सन 2002 मध्ये ‘सुधर्मा’ ज्ञानसभा बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. आज 15 सदस्य पूर्ण वेळ काम करीत असून संस्थेने नुकतेच दहाव्या वर्षांत पदार्पण केले आहे.
  प्रेरणादायी उपक्रम - संस्थेच्या माध्यमातून नऊ वर्षांत अनेक भरीव उपक्रम राबवण्यात आले आहेत. यात ‘बिनभिंतीच्या शाळे’चा उपक्रम लक्षवेधी ठरला आहे. त्यामुळे आज 150 मुलांना ज्ञान प्राप्त झाले आहे. यासोबत संस्थेने कचरा गोळा करणा-या मुलांसाठी फिरते बाल वाचनालय, विद्यापीठ सहल, विश्व जिज्ञासा, उपग्रहांची ओळख, संस्कार गोष्टी, आजारी मुलांना मदत करणे, गणवेश- सायकली वाटप, संस्थेच्या वर्धापनदिनी प्राथमिक विद्यालयातील प्रथम क्रमांक पटकवणा-या बालकांचा गौरव आदींचा समावेश आहे. सदर उपक्रम खेडी, मन्यारखेडा, राजीव गांधीनगर, समतानगर, बांभोरी, सावखेडा, जैनाबाद आदी ठिकाणी राबवण्यात आले आहे. तसेच माता-पित्याची सेवा करणा-या मुलांसाठी त्यांनी ‘भक्त पुंडलिक’ हा पुरस्कार सुरू केला असून आतापर्यंत फक्त तीन जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हे उपक्रम राबवताना ते स्वत: पदरमोड करीत असतात.
  कैद्यांसाठी ‘गीता अभ्यास’ - गीतेमुळे जीवनात बदल घडून येतो. यानुसार ते जळगाव, धुळे येथील कारागृहातील कैद्यांसाठी ‘गीता अभ्यास’ बैठक आयोजित करीत असतात. आतापर्यंतच्या 12 बैठकीत सुमारे सहा हजार कैद्यांनी यात भाग घेतला असून त्यांच्या जीवनात बदल घडून आला आहे.
  कचरा वेचणारा दीपक प्रथम - ‘बिनभिंतीच्या शाळे’त धडे गिरवलेल्या आणि कचरा वेचणा-या दीपक भगवान सपकाळे या विद्यार्थ्याने गतवर्षी दहावीच्या परीक्षेत शेकडा 75 टक्के गुण मिळवून आदर्श निर्माण केला आहे. समतानगरात राहणा-या मनीषा ढोणे या बालिकेच्या डोळ्यात चुना गेल्याने तिची दृष्टी गेली होती. अशा परिस्थितीत सुधर्माने पुढाकार घेऊन तिला नवी दृष्टी प्राप्त करून दिली.

Trending