आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उथळ मराठीला खळखळाट फार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेविषयी काही म्हणताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची दखल घेणे आवश्यक आहे. अलीकडच्या काही वर्षांत या संदर्भात शासकीय पातळीवर चांगले प्रयत्न झाले. मराठीसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना झाली. भाषा संचालनालय सोबत होतेच. मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध करणारे पुरावे शोधण्याच्या हेतूने तज्ज्ञांची समिती नेमून ते काम पूर्णत्वास नेण्यात आले.

या सर्व प्रक्रियेत मला महत्त्वाचे वाटणारे भाषेविषयीचे मुद्दे स्पष्ट करतो. पहिला मुद्दा अभिजात दर्जा मिळावा, यासाठी मराठीसंबंधीचे जे संशोधन केले गेले, ते फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे मराठी ही मध्ययुगीन नसून, त्याही फार आधीची इसवीसनापूर्वीच्या पहिल्या शतकापासूनची भाषा आहे, हे सिद्ध झाले. दुसरा मुद्दा अभिजात दर्जा मिळाल्यावर जो निधी केंद्राकडून राज्याला मिळेल, त्या निधीच्या विनियोगाचे नियोजन कसे करावे, हा आहे. माझ्या मते, हा निधी तीन प्रकारे वापरता येईल. एक- भाषेसाठी शासकीय पातळीवर ज्या संस्थांचे काम सुरू आहे, त्यांना बळकटी देणे.
 
 दोन- जिथे मराठी भाषा शिकवली जाते, त्या शैक्षणिक स्तरावर शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्तरावर मराठी भाषेसाठी प्रयत्न करणे. आणि तिसरा- जनतेच्या स्तरावर लोकशिक्षणाद्वारा मराठीचा प्रसार-प्रचार करणे. यापैकी लोकशिक्षणाद्वारा मराठीचा प्रसार करणे फार महत्त्वाचे आहे.
 
 कारण आपल्या देशात राज्यांची निर्मितीच भाषावार झाली आहे. लोकांना जे क्षेत्र रोजच्या व्यवहारासाठी अपरिहार्य असते, त्या प्रत्येक ठिकाणी मराठीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, न्यायालयाचे कामकाज इंग्रजीत चालते. त्यामुळे बहुसंख्यांना वकिलांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जिथे लोकांचा अधिकाधिक संबंध सतत येतो, अशा न्यायालयांसह सर्व ठिकाणी मराठीचा आग्रह धरला पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र परिभाषा विकसित केली पाहिजे आणि ती रुळायला वेळ लागला तरी तसे सातत्यपूर्ण प्रयत्न होत राहिले पाहिजेत.
 
मुलांसाठी लेखन गरजेचे
मुळात, भाषेच्या प्रसार-प्रचाराची सुरुवात लहान मुलांपासून झाली पाहिजे. कारण जगाची, भोवतालाची ओळख प्रथम भाषेतूनच घडत असते. आपल्याकडे मराठीच्या अनेक बोली आहेत. त्या बोलीभाषांत मुलांसाठी लेखन झाले पाहिजे. बोलींचा मी आदर करतो, कारण त्या स्थानिक संस्कृती सोबत आणतात आणि प्रमाण किंवा मुख्य भाषेला समृद्ध करत असतात. प्रमाणभाषेला लय नसते, जी बोलींना असते. 
 
सर्वसामान्यांचे नाते त्या लयीशी असते. त्यामुळे भाषेचा गोडवा वाढतो. बोलीभाषेतील लेखनाला उत्तेजन मिळाले पाहिजे. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यात दुरावा येऊ न देता त्यांचे संतुलन साधणे, ही लेखकांची जबाबदारी ठरते. त्यासाठी आजच्या लेखकांनी बुजुर्ग बालसाहित्यकारांचे आदर्श समोर ठेवले पाहिजेत. साने गुरुजी, विनोबा भावे, ना. धों. ताम्हनकर, विंदा करंदीकर, आचार्य अत्रे, चि. वि. जोशी यांचे बालकांसाठीचे लेखन अभ्यासले पाहिजे. आज माहितीची-ज्ञानाची क्षेत्रे तंत्रज्ञानाच्या जोडीने विस्तारत आहेत. ते सारे मराठीत बालवाचकांसाठी आले पाहिजे. सत्यजीत रे यांच्यासारखा जागतिक कीर्तीचा दिग्दर्शकही अखेरपर्यंत बालसाहित्यासाठी कार्यरत होता, हे इथे लक्षात ठेवले पाहिजे.
 
विद्यापीठांकडून भ्रमनिरास
विद्यापीठ स्तरावर मराठीचे काय चालले आहे, याचा विचार करता जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येतात, त्यांचा भ्रमनिरास व्हावा, अशी परिस्थिती आहे. काही तुरळक अपवाद वगळता भाषेचा, साहित्याचा ध्यास घेऊन कुणीच काम करत नाही. इतर कुठे (उदाहरणार्थ टपाल, तहसील) काम करताना जो दृष्टिकोन असतो, तोच घेऊन मंडळी विद्यापीठाच्या भाषा विभागात कामाला येतात. ते भाषेला, साहित्याला पुरेसा न्याय देऊ शकत नाहीत. केवळ नियमित, भरपूर पैसे मिळतात, म्हणूनही अनेक जण येतात.
 
 परिणामी, कुठलेही गंभीर, प्रामाणिक संशोधन विद्यापीठात होत नाही. खरे तर आपल्याकडे प्राचीन काळापासून साहित्य व भाषा क्षेत्रातील संशोधनाची उज्ज्वल परंपरा आहे. पण, विद्यापीठातील सध्याचे लोक ही परंपरा निस्तेज करत चालले आहेत. कुठल्या तरी सामान्य लेखकाची चार पुस्तके वाचायची, त्यांची कथानके सांगायची, त्या लेखकाची मुलाखत घ्यायची आणि त्यानंतर जे तयार होते ते ‘संशोधन’, असा प्रकार आहे. सुमार लेखकांवर हे संशोधन केले जाते, त्यामुळे ना लेखक टिकतो, ना संशोधन... सारेच तात्कालिक ठरते.
 

भाषा, साहित्य गंभीरपणाने न घेतल्यानेच विद्यापीठीय स्तरावरील संशोधनाला तात्पुरतेपणा, उथळपणा आला आहे. भाषाशास्त्रावर गंभीर चिंतन करणारे लोक विरळ झाले आहेत. जे उरलेत त्यांच्यात विद्याशाखीय शिस्त राहिलेली नाही. काही प्रमाणात याचे ‘श्रेय’ विद्यापीठ अनुदान आयोगाकडेही जाते. युजीसीने जारी केलेले निकष (नॉर्म) पूर्ण करण्यापुरते उथळ काम तथाकथित प्राध्यापक करत असतात. त्यामुळे बाजारू व्यावहारिक प्रवृत्ती सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. विद्यापीठात शोधनिबंध रातोरात तयार केले जातात. 
 
संगणकाच्या एका क्लिकवर मिळणाऱ्या माहितीचा उसना आधार घेतला जातो. त्यामुळे स्वतंत्र विचारक्षमता नष्ट होते. चिंतनशीलतेचे तर नावही नसते. संगणकाच्या अनिर्बंध नि काहीशा अपरिहार्य वापरामुळे सलग, मुद्देसूद विचार संपत चालले आहेत. एक विशिष्ट दिशा धरून विचार करण्याची परंपरा खंडित झाली आहे. तुकड्यातुकड्याने विचार केला जात आहे. त्यातून भाषेची जाण वाढण्याची शक्यताच नाही.
 
प्रत्यक्ष काय आहे, याचा विचार नाही. प्रश्न विचारणे, हा प्रकारच शिक्षणातून संपुष्टात आला आहे. त्यामुळे भाषेविषयीची सूक्ष्म जाणीव विकसित होत नाही. सगळ्या चर्चासत्रांत, परिसंवादांत हेच चित्र दिसते. उथळपणा, दाखवेगिरी आणि तात्पुरतेपणा, हीच विद्यापीठीय संशोधनाची स्थिती आहे. सटरफटर लिहिणारे बहुतांश तिथे नोकरी करतात आणि प्राध्यापक झालो, आता लिहिले पाहिजे, म्हणून सुमार दर्जाचे काहीबाही लिहीत राहतात, असे घातचक्र सुरू आहे. त्यामुळे चांगली मराठी आता विद्यापीठाबाहेरच, अशी वर्तमान अवस्था आहे. 
 

विद्यापीठात काम करायचे तर संशोधन अपरिहार्य हवे. त्यासाठी वाहून घेतलेले लोक हवेत. पण तिथेच मराठीला, भाषेला काहीही किंमत नाही, तिची अपरिहार्यता नाही. कुठल्याच प्राध्यापकाचे पहिले प्राधान्य भाषा वा साहित्य हे नसतेच, त्यामुळे भरीव काही घडत नाही.
 
उपाय जालीम हवेत
संस्कृतीचे मोल भाषा जपते आणि जाणत असते. भाषा भावनांचे वहन करत असते. ज्येष्ठ पाश्चात्त्य तत्त्वज्ञ, अभ्यासक, संशोधक हे तर ‘तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा मूळ भाषेचाच अभ्यास असतो,’ असे म्हणतात. पण आपल्याकडे भाषेसह तत्त्वज्ञानालाही अवकळा प्राप्त झाली आहे. कारण तत्त्वज्ञानासाठी बौद्धिक, वैचारिक परिश्रमांची, चिंतनाची गरज असते. तात्पुरतेपणा, उथळपणावर जगणाऱ्यांना ते नकोच असते.
 
 भाषा संवाद साधत असते- माणसामाणसांत, माणूस आणि समाजात, माणूस आणि भवतालात... भाषेकडे दुर्लक्ष केल्याने हा संवाद बिघडतो, सामाजिक तोल ढासळतो आणि नाते संपुष्टात येते. जागतिकीकरणाच्या आजच्या रेट्यात आपली भाषा जिवंत कशी ठेवायची, हा पेच सोडवण्यासाठी आता विचारवंत, विवेकशील लोकांनी एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे. समाजातील सुजाणांनी  भाषा चळवळीचे नेतृत्व करणे अगत्याचे आहे.
 
- शब्दांकन : जयश्री बोकील, 
 संपर्क : ९८२२४९८५६४
बातम्या आणखी आहेत...