आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रियांच्या कवितेचा समग्र आलोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीतील स्त्रियांची कविता हे ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांनी संपादित केलेले पुस्तक नुकतेच लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केले आहे.
पुस्तकामागची भूमिका समजावून सांगणारे हे संक्षिप्त मनोगत.

मराठीतील स्त्रियांच्या कवितेचा अभ्यास करण्याचा प्रकल्प हाती घेताना सुरुवातीला १९४०नंतरच्या सुमारे साठ वर्षांच्या काळात स्त्रियांनी लिहिलेल्या कवितेचे स्वरूप समजावून घ्यावे असा विचार होता. कारण या काळातील स्त्रियांची कविता आशय, रूपबंध, आविष्कार, अनुभूतींची विविधता आणि संदर्भ या सर्वच दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तथापि या कवितेची फारशी दखल घेतली गेलेली नाही. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात या कवितेचा धावता आढावा घेण्यात आलेला असतो. एखाद-दुसऱ्या पुस्तकातही त्रोटक विवेचन असते. विद्यापीठात परिसंवादाचा विषय म्हणून स्त्रियांच्या कवितेकडे तात्पुरते लक्ष वेधण्यात येते ते पाचपन्नास श्रोत्यांपुरते मर्यादित राहते. गंभीर समीक्षादृष्टीने स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप अभ्यासण्याची गरज न वाटणे म्हणजे स्त्रियांची कविता हा मुख्य प्रवाहाचा एक भाग आहे याकडे दुर्लक्ष करणे किंवा या कवितेला महत्त्व न देणेच होय. त्यामुळे हा मर्यादित कालखंड विचारात घ्यायचे प्रथम ठरवले.
गेल्या काही वर्षांत स्त्रीवादी समीक्षादृष्टी घेऊन स्त्रियांच्या लेखनावर लक्ष केंद्रित केले जात आहे. या संदर्भात, सूझी थारू आणि के. ललिता यांना संपादित केलेले ‘विमेन रायटिंग इन इंडिया’ (खंड पहिला ः १९९१. खंड दुसरा - १९९३) ही दोन महत्त्वाची संकलने सहज आठवावीत. भारतातील विविध भाषांमध्ये लिहिणाऱ्या स्त्रिया प्राचीन काळापासून का लिहीत आहेत, काय लिहीत आहेत, कोणत्या वाङ्मयीन-सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात लिहीत आहेत याचे दर्शन या संकलनातून घडते. शिवाय मध्ययुगीन स्त्रियांची कविता आणि वसाहतोत्तर काळातील स्त्री कविता यांच्यात जो मूलभूत फरक आहे त्याचाही अंदाज या संकलनातून येतो. ही संकलने मनात ठेवून, १९४०नंतरच्या स्त्रियांच्या कवितांचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर हा अभ्यास अधिक सविस्तर केला पाहिजे असे वाटू लागले. मराठी भाषेत स्त्रियांचे लेखन जेथून सुरू झाले तेथून, म्हणजे तेराव्या शतकापासून पुढची जवळजवळ सातशे वर्षे स्त्रियांची कविता कशी बदलत गेली याचा मागोवा घेणे गरजेचे वाटू लागले. अभ्यासाची दिशा निश्चित झाली आणि आवाकाही.
स्त्रियांची कविता ही पुरुषांच्या कवितेहून वेगळी ठरते, यामागे असणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक कारणांची चिकित्सा करणे हा या अभ्यासाचा मुख्य गाभा आहे. स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप पूर्वी कसे होते व तसे ते का होते, नंतर ते कसकसे बदलले, कोणत्या वाङ्मयीन मूल्यांचा प्रभाव त्यांच्या कवितेवर होता व आहे, कोणत्या सामाजिक वा राजकीय पर्यावरणात स्त्रिया लिहीत होत्या व आहेत याचा शोध घेताना स्त्रियांच्या कवितेचे लक्षणीय टप्पे ध्यानात येतात. सुमारे चारशे वर्षांतली संतकवयित्रींची कविता, पंडित आणि शाहीर यांच्या काळातला स्त्रीकवितेचा पूर्ण अभाव, एकोणिसाव्या शतकानंतर समाजसुधारकांच्या आणि स्त्रीशिक्षणाच्या प्रभावातून निर्माण झालेल्या स्त्रियांच्या काव्यलेखनाचे स्वरूप, रविकिरण मंडळाच्या छायेतील स्त्रियांची कविता, स्वातंत्र्योत्तर काळातल्या कवयित्रींची आधुनिक कविता आणि स्त्री मुक्ती आंदोलनाच्या प्रभावाने आमूलाग्र बदललेली स्त्रियांची कविता असे हे टप्पे आहेत. ते काळाचे आहेत. तसेच सामाजिक स्थित्यंतराचेही आहेत.
या सातशे वर्षांच्या काळातल्या स्त्रियांचे सारे जग, त्यांच्या भोवतीचे वास्तव, त्यांचे पुरुषांशी व इतर स्त्रियांशी असणारे नाते, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या प्रेरणा यांचा वेध घेणे या अभ्यासाच्या परिघात आपोआप समाविष्ट होते. मराठीत लिहिणाऱ्या स्त्रियांच्याच नव्हे तर त्यांच्या समकालीन इतर भारतीय स्त्रियांच्या स्थितीवरही त्यामुळे प्रकाश पडू शकतो. भारतातील स्त्रियांचे विचार, त्यांच्या धारणा, इच्छा, गरजा, ‘पुरुषी जगता’पासून त्यांचे विलग असणे वा अलग पडणे व त्या जगाचा भाग असण्यासाठी त्यांची चाललेली धडपड, ती सुरू असतानाही त्यांनी सांभाळलेले ‘स्त्री’त्वाचे भान, लिंगभेदातून आलेल्या भूमिका आणि त्या निभवतानाच त्या भूमिकांना आव्हान देण्याची त्यांना वाटणारी निकड, त्यांनी त्या भूमिकांचा केलेला स्वीकार वा दिलेला नकार, पुरुषप्रधान व्यवस्थेतील त्यांच्या स्थानाची त्यांना झालेली जाणीव, या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार या अभ्यासात अनुस्यूत आहे. स्त्रीच्या सामाजिक ‘स्व’चा मागोवा घेत घेत त्यांच्या कवितांमधून दिसणाऱ्या त्यांच्या मनाच्या मार्गिकांमधून त्यांचा शोध घेताना त्यांचे समाजातील स्थान आणि त्यांची स्थिती यासंबंधीच्या वास्तवावर प्रकाश पडत जातो.
१९४०नंतरच्या कवयित्रींचा अभ्यास करताना संत कवयित्रींपासून प्रारंभ करणे हा दूरान्वय नव्हे. इंदिरा संतांपासून प्रज्ञा लोखंडेंपर्यंतच्या कवयित्रींच्या काव्यात त्यांचे मुक्ताई, जनाबाई यांच्याशी असलेले नाते अजूनही टिकून असलेले दिसते. महानुभाव आणि वारकरी या दोन्ही पंथांचे संदर्भ आजही महाराष्ट्रात, जिवंत आहेत. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे या आधुनिक कवींनी तसेच म. सु. पाटील, स. रा. गाडगीळ, सदानंद मोरे, रा. ग. जाधव, प्रकाश देशपांडे-केजकर यांसारख्या समीक्षकांनी संतकवितेचे माहात्म्य वारंवार प्रतिपादिले आहे. गुन्थर सोन्थायमर यांनी विठोबा, खंडोबा या दैवतांशी असणारे विराट जनमानसाचे नाते उलगडून दाखवले आहे. इयन रेसाइड, अॅन फेल्डहाउस यांनी महानुभाव वाङ्मयाचा अनुवाद केला आहे. पंथीय साहित्याचा आजच्या काळाशी आजही अनुबंध आहे. त्यामुळे संतकवयित्रींची रचना विचारात घेणे आवश्यक ठरते. स्त्रियांच्या ‘स्वतंत्र’ होण्याचा तो प्रस्थानबिंदू आहे.
आधुनिक मराठीतील स्त्रियांच्या कवितेची नाळ स्त्रियांच्या लोकगीतांमध्ये पुरलेली आहे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्त्रियांच्या लोकगीतांमधून व्यक्त झालेली कुटुंबसंस्कृतीची चौकट व तिने दृढमूल केलेले संस्कार स्त्रीजीवनात आजतागायत खोलवर रुजलेले आहेत. आजच्या काळातील स्त्रियांच्या बव्हंश कवितेतून पारंपरिक जीवनमूल्येच व्यक्त होतात. लोकगीतांतून प्रकटलेले स्त्रीजीवन, त्यातील कुटुंब, सासर, माहेर, पती, मुले, सुखदुःखे, आजच्या काळातील स्त्रियांची कविताही व्यक्त करते. म्हणून लोकसाहित्यातील स्त्रियांच्या रचनांचा विचारही अभ्यासाला पूरक ठरतो.
अद्यापपावेतो, सुमारे सातशे वर्षांच्या प्रदीर्घ काळातील स्त्रियांच्या कवितेचा असा समग्र आलोक कवेत घेणारा हा पहिलाच प्रयत्न आहे. या प्रकारच्या अभ्यासाची व तो वाचकांसमोर येण्याची आवश्यकता लक्षात घेऊन लोकवाङ्मय गृहातर्फे हा ग्रंथ प्रकाशित केला जातो आहे याचा मला मनापासून आनंद झाला आहे.

श्री. प्रकाश विश्वासराव आणि श्री. जयप्रकाश सावंत हे सहयोगी स्नेही या आनंदाचे वाटेकरी आहेत.
ख्यातनाम चित्रकार श्री. सुधीर पटवर्धन यांचे अतिशय समर्पक आशयाचे चित्र मुखपृष्ठासाठी लाभले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते.