आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक तरुणाने वाचावे असे....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी माणसांच्या नव्या पिढीत उद्योजकता आणि शेती-शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी जिल्ह्यजिल्ह्यांतून उद्योजक व शेतकरी शोधून ते पुस्तकरूपाने मांडण्याचा उपक्रम मुक्त पत्रकार दत्ता जोशी अणि पोलाद या उद्योगाने मिळून हाती घेतलाय. या मालिकेत आतापर्यंत सातारा आयकॉन्स, सांगली, लातूर, उस्मानाबाद, जालना, नांदेड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर आयकॉन्स ही 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भविष्यात राज्यभरात हा उपक्रम नेण्याचा त्यांचा मानस आहे. ही पुस्तक मालिका आणि त्यामागील प्रेरणांबद्दल.....
सां स्कृतिक पर्यावरणातील साहित्य संमेलने, काव्यवाचन, एकांकिका महोत्सव आदी देखावे काही तरुणांची मने आकर्षित करतात. पण त्यांच्या एकंदर संख्येच्या मानाने सहभाग असणा-यांची संख्या नगण्य आहे. बहुसंख्य तरुणांना समाजाने घेतलेली गती भोवळ आणणारी वाटते. समाधानाच्या जागा दुर्मिळ होत चालल्या आहेत. प्रेरणास्रोत आटून जाताहेत. असे वाटत असतानाच समाजजीवनात सकारात्मक, दिलासा देणारे, प्रेरक असे काही घडतच असते. फक्त निराश न होता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. असा एक प्रकल्प मराठवाड्यातील औरंगाबाद-जालनासारख्या शहरातून आकार घेतो आहे. दत्ता जोशी यांनी हा लक्षणीय प्रकल्प हाती घेतला आहे. ‘आयकॉन्स’ हे त्यांच्या प्रकल्पाचं नाव. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या श्रमसातत्यातून, उपक्रमशीलतेतून, चिकाटी आणि कल्पकतेतून आपल्या कार्यावर व्यक्तित्व कोरले आहे. अशा व्यक्ती ग्रंथरूपात येणारी ही मालिका जिल्हानिहाय आहे. आयकॉन्सच्या निवडीसाठीचे काही निकष यासाठी आहेत. ते निकष परिपूर्ण आहेत वा निवड केलेल्या आयकॉन्सची यादी परिपूर्ण आहे, असा कोणताच दत्ता जोशी या लेखक-संपादकाचा नाही. कारण आयकॉन्सचा शोध आणि निवड हा ते शोध प्रक्रियेचा भाग मानत असावेत, असे त्यांच्या लेखनातून जाणवते. त्यांच्या या लेखनाच्या केंद्रवर्ती महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी आहे. आयकॉन्सच्या या लेखकाने घेतलेल्या मुलाखती विलक्षण प्रत्यय देणा-या आहेत. त्या विलक्षण यासाठी वाटतात की, त्याच्या निवडीमागे त्यांची वस्तुनिष्ठ निकषांवर आधारलेली दृष्टी काम करताना दिसते.
पन्नाशीच्या आतील ती व्यक्ती चारित्र्यसंपन्न असावी, व्यावसायिक सचोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा मिलाफ त्या व्यक्तिमत्त्वात झालेला असावा, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत वर्धमान होण्यावर त्यांचा विश्वास असावा. श्रमसाधनेतून निर्माण झालेल्या उत्पादनाकडे समूहभावाने पाहण्याची दृष्टी असावी. या निकषासह उत्पादनक्षमता आणि निर्मितीक्षमता वा उपक्रमशीलता यांच्यामध्ये असलेले अंगभूत नाते लक्षात घेऊन. या निकषांचे सतत भान ठेवत दत्ता जोशी आयकॉन्सच्या शोधात असतात. पुस्तकात त्यांनी अनेक आयकॉन्सनी केलेल्या कार्याचे मर्म, त्याच्या श्रमाच्या प्रक्रियेत झालेला त्याच्या विचाराचा विकास, इतरांसोबत काम करण्यातून निर्माण झालेली समूहनिष्ठ जाणीव याचा एक आलेख वाचकासमोर ठेवला आहे. यातला प्रत्येक आयकॉन प्रेरणेची गंगोत्री होण्यासारखा आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या या आयकॉनविषयी वाचत असताना त्या प्रत्येकाचे श्रम, त्याच्या आई-वडिलानं खाल्लेल्या खस्ता वाचकांसमोर तरळत राहतात. नवा विचार-योजना-शोधाची दिशा-क्षितिज या गोष्टी दिसू लागतात आणि त्या नव्या साहसाला, नव्या आव्हानाला बळ पुरवत असतात. अशाच आयकॉन्सची निवड जोशी यांनी केली आहे.
ही निवड करताना वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी जीवनाची विविध क्षेत्रे लक्षात घेतली आहेत. अगेन्स्ट ऑल ऑड्स, त्या त्या क्षेत्रामध्ये स्वत:ला रोवून, उद्यमशील राहून त्यांनी त्या क्षेत्राला विकसित केले. काही आयकॉनचे अनुभव सामाजिक जाणिवेच्या थेट गाभ्यापर्यंत नेणारे आहेत. काही उद्योजकीय कल्पकतेला हात घालणारे आहेत, काही कचरा डोपो ते आयआयटी पवईपर्यंतचा प्रवास करून श्रमाला प्रतिष्ठित करणारे, काही व्यवस्थेच्या अजगरी विळख्याचं वास्तव समोर ठेवणारे आहेत. या ग्रंथांमधला प्रत्येक आयकॉन जीवनावरचा विश्वास वाढवणारा आहे.
वानगीदाखल म्हणून लातूर आयकॉन्स या पुस्तकातील मिलिंद कांबळे यांचे कर्तृत्व नजरेखालून घालता येईल. (त्यांना 2013 मध्ये पद्मश्री हा नागरी सन्मानही जाहीर झाला आहे.) आंबेडकरी आर्थिक विचारातील मर्मदृष्टी स्वीकारून तिला दृश्यरूपात विकसित करणारे ते एक अफलातून उद्योजक आहेत. त्यांनी 2005 मध्ये दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) ची स्थापना केली. 2011 मध्ये त्यांनी दलित उद्योजकांची रार्ष्टÑीय परिषद आयोजिली. तीत दरवर्षी एक कोटीहून अधिक कर भरणा-या टॉप टेन दलित उद्योजकांचा सत्कार घडवून आणला. या संमेलनात 150 उद्योजकांचे स्टॉल्स होते. वयाच्या 17 व्या वर्षी चप्पल घालायला मिळालेला अशोक खाडे नावाचा उद्योजक आपल्या कंपन्यांमधून आज 4500 कर्मचा-यांना सामावून घेतो आहे. अशा सगळ्या उद्योजकांसाठी पुढाकार घेऊन मिलिंद कांबळे यांनी राष्ट्रीय स्वरूपाचं व्यासपीठ निर्माण केलं. त्यांच्या या राजकारण निरपेक्ष गुणवत्तेची प्रतिमा, हा लौकिक रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचल्याने ते स्वत: परिषदेस उपस्थित होते. त्यांनी जे आश्वासन दिले ते चैतन्य निर्माण करणारे होते. कारण टाटा उद्योगसमूहाला लागणा-या वस्तूंची दहा टक्के खरेदी दलित उद्योजकांकडून करण्याचे ते आश्वासन होते. दलित राजकीय नेतृत्वाने अस्मितेचा जागर सुरू ठेवला. तो आवश्यक होता, पण तो अर्थयुक्त नव्हता. मिलिंद कांबळे यांनी दलित इंडस्ट्री सुरू करून तो अर्थयुक्त ठेवला. आंबेडकरी आर्थिक विचाराचा हा गाभा आहे. एक इंडस्ट्री म्हणजे एक संबंधाचे जाळे. या सहसंबंधांना नव्या आर्थिक व्यवस्थेच्या दिशेने त्यांना वळवायचं आहे आणि त्याद्वारेच आजच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवता येतो ही त्यांची धारणा आहे.
एवढी मोठी पुस्तक मालिका सिद्ध करण्यासाठी मोठ्या अर्थसाहाय्याची गरज असते. आर्थिक कणा आवश्यक असतो. जालन्याच्या पोलाद या लोखंडी सळई उत्पादक कंपनीचे संचालक सुनील गोयल आणि त्यांचे सहकारी यांनी ती केली. त्यांची ही भूमिका, प्रेरणा आणि पुढाकार महत्त्वाचा आहे. त्यांनी दत्ता जोशी यांना आर्थिक पाठबळ दिले आणि व्यवसायाला सामाजिक आणि सांस्कृतिक परिमाण असते हे त्या मदतीतून सूचित केले. या आयकॉन्सच्या चरित्रकार्यातून दोन टक्के युवापिढी विद्यार्थ्यांनी फायदा उचलण्याचे ठरवले तर सामाजिक संवेदन असणारी उद्योजकीय वृत्ती महाराष्ट्राचे चित्र पालटून टाकेल.
पुस्तकातील हे आयकॉन्स उद्योजकीय क्षेत्रातील संख्येने अधिक दिसतात. त्यात एक जाणीवपूर्वकता दिसते. कारण महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी उद्योग व्यवसायात जी एक रिस्क असते तिला सामोरे जाण्याचे धाडस कधी दाखवलेच नाही. काही तुरळक अपवाद आहेत. उद्योजकता मराठी भाषिकांच्या हाती नसल्यामुळे मराठी भाषेच्या विकासाचा एक महत्त्वाचा स्रोत निसटलेला दिसतो आणि म्हणून उद्यमशील आयकॉन्स या मालिकेत ते जास्त दिसतात. या सर्व जिल्हानिहाय आयकॉन्सची एक त्रैमासिक बैठक बोलावली पाहिजे, अनुभवाचे शेअरिंग व्हायला हवे, त्यात आवर्जून तरुणांना निमंत्रित करण्यात यावे. या आयकॉन्सच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून, उद्योजकीय अनुभवातून काही नवे परिप्रेक्ष्य (पर्स्पेक्टिव्ह) आकार घेण्याची शक्यता असते आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील निवडक आयकॉन्सचे वार्षिक मेळावे राष्ट्रस्तरावर झाले तर महाराष्ट्राचा उद्योजकीय इथॉस दृष्टिपथात येईल.