आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाकी इतिहास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायतोंडे यांची आठवण झाली की मनात संवेदनशील मौन जागं होतं. त्यांच्याविषयी मी पहिल्यांदा ऐकलं, ते गुरुवर्य प्रा. शंकर पळशीकर यांच्याकडून. ते स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना गायतोंडे, पै आणि पळशीकर असं मैत्रीचं त्रिकूट होतं. तिघंही मूलत: गंभीर प्रकृतीचे. त्यांपैकी लक्ष्मण पै डिप्लोमानंतर लंडनला गेले आणि गायतोंडे-पळशीकर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. गायतोंडे यांना लवकरच कळून चुकलं की ते काही शिक्षक नव्हेत आणि त्यांनी त्या क्षणीच जेजेला रामराम ठोकला. पळशीकर मात्र कला शिक्षणात रुजले, वाढले आणि एक निष्णात शिक्षक, सडेतोड उपदेशक आणि द्रष्टे मार्गदर्शक म्हणून नावारूपाला आले. गायतोंडेंसारख्या सहाध्यायापासून नंतरच्या अनेक पिढ्या त्यांना गुरुस्थानी मानत आल्या ते त्यामुळेच.

आज जगाला माहीत असलेले गायतोंडे गंभीर स्वभावाचे आहेत, परंतु विद्यार्थिदशेत किंवा त्यानंतरच्या उमेदवारीच्या काळात ते असे नव्हते. चारचौघांसारखे हसत-खेळत वावरणारे, आवडीनं विनोद करणारे आणि इतरांनी केलेल्या विनोदात आनंद शोधणारे होते. माझी त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा ते मौनाच्या प्रवासात खूप दूरवर पोहोचले होते. तत्पूर्वीच्या काळात चित्रकलेच्या व्यासंगातील गांभीर्यानं, त्यातील कूट प्रश्नांनी आणि सभोवतालच्या कलाजगतातील विभ्रमानं उत्तरोत्तर चिंतनशील होत गेले. चिंतनाचं मौनाशी असलेलं पिढीजात नातं त्यांनी ओळखलं आणि तिथून पुढं ते आजच्या गायतोंडे यांच्यापर्यंत आले. त्यांच्या गांभीर्यावर उदासीपणाची सावली नव्हती, तरी त्यात आत्मज्ञानाची समतानता होती. त्यांनी डिप्लोमा घेऊन कलाप्रांतात प्रवेश केला तेव्हा चित्रकलेचं स्वरूप विकासाच्या वाटा शोधत होतं.

माझी पिढी जेजेमधील शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली, तेव्हा भुलाभाई स्टुडिओ जवळजवळ बंद झाला होता. जहांगीर आर्ट गॅलरी बर्‍यापैकी रसिकांत आली होती. (आता ती निरस झाली आहे, असं खेदानं म्हणावंसं वाटतं.) केमोल्ड, पंडोल आणि ताज या गॅलर्‍या नव्या उत्साहानं कार्य करीत होत्या. या गॅलर्‍यांमधून समकालिनांची चित्र-प्रदर्शनं गाजत होती. त्यांची दखल घेतली जात होती. या खासगी गॅलर्‍यांमधून चित्रकलेची नवी ओळख, नवे विचार, नव्या शैली आणि नवी जाण यांची मुळं धरू लागली होती.

गायतोंडे या बदलत्या हवेत श्वास घेत होते आणि तरीही अलिप्त होते, किंबहुना ते स्वत:ला सोडून कुठे गेले नाहीत. एखादा पट्टीचा पोहणारा अंगाला तेल लावून समुद्र तरून जातो तसे. समुद्रासमोरच्या अनेक दृढ बैठकांतून त्यानंतर त्यांची कुठेही, कधीही समाधी लागू लागली असावी. ते अमेरिकेला, जपानला जाऊन आले आणि आधी होते त्याहून अधिक एकटे झाले, ‘झेन’ मास्टरसारखे; स्वत:शीच स्पर्धा करणारे. चित्रकला हाच ध्यास, तेच लक्ष्य आणि तोच मोक्ष, असंच त्यांना पोटतिडकीनं जाणवलं असावं. त्यांच्या त्या एकटेपणावरच्या श्रद्धेला पुढं कधीही तडा गेल्याचं ऐकिवात नाही. त्यांना लाभलेल्या एकटेपणाचं वरदान दुर्लभ जातीचं असावं. मृत्यूनंतर कुणालाही लाभणार्‍या एकटेपणासारखं. ते त्यांनी जिवंतपणीच भोगलं, मात्र त्यातल्या अमर्त्य सजीवत्वाशी मैत्र साधून; जे मृत्यूनंतर साधणं अशक्य.

आम्ही विद्यार्थी त्यांच्या नुसत्या दर्शनानंही प्रभावित होत असू. त्यांना पाहणं म्हणजे एक सोहळा असायचा. काशीतल्या विश्वेश्वराला मुंबईतून नमस्कार करावा तसा. आजही त्यांच्या आठवणीनं मन पन्नास वर्षं मागं जातं. त्यांच्या दर्शनानं मिळालेली प्रेरणा आजही अस्तित्व ढवळून काढते. त्यांना पाहिल्यामुळे आपणही चित्रकला क्षेत्रात असल्याचा अभिमान वाटतो. वाटतं, चित्रकार व्हावं तर असं- इतकं त्यांचं व्यक्तिमत्त्व भुरळ घालणारं होतं. परंतु त्यांचं दर्शन दुर्लभ असे. जेव्हा दिसत तेव्हा त्यांच्याभोवती जतीन दास, लक्ष्मण श्रेष्ठ, मनोहर म्हात्रे यांच्यासारखे नव्या पिढीचे उमदे कलावंत हमखास असत.

पळशीकर सरांच्या सहवासात गायतोंडे यांचा विषय असायचाच. त्या दोघांनाही एकमेकांबद्दल नितांत आदर होता. प्रेमाचं अंतिम टोक म्हणजे आदरच असावा, इतका आदर. एकदा मी सरांना म्हटलं, ‘‘सर, गायतोंडे यांची चित्रं समजत नाहीत.’’ त्यावर ते पटकन म्हणाले, ‘‘अरे, पण दिसतात ना? ती पाहायचा प्रयत्न कर. डोळ्यांनी, दृष्टीनं, बुद्धीनं, मनानं पाहायचा प्रयत्न कर. सगळ्या ज्ञानेंद्रियांनिशी अनुभवण्याचा प्रयत्न कर. समजतील.’’ त्या वेळी दृश्यानुभवाचा इतका प्रदीर्घ प्राणायाम एका दमात त्यांनी सांगितला, की तो कळण्यात आणि पचनी पडण्यात आजवरचं आयुष्य खर्ची पडलं. पळशीकर सरांचंही हे असंच होतं. गुंजभर मोती मिळविण्यासाठी जवाहिर्‍यांच्या दुकानात नव्हे तर थेट सागराच्या तळाशी जाण्यासारखं. त्यांचे अशासारखे सल्ले आम्हा तरुणांना सतत दृश्य-विचारांत गुंतवून ठेवायचे. कधी कधी मी कल्पना करायचो, सर आणि गायतोंडे या दोघांतला संवाद कशा स्वरूपाचा असेल? वाटायचं, ते एकमेकांकडे डोळ्यांच्या डोळ्यांनी पाहत आणि कानांच्या कानांनी ऐकत बसत असावेत.

त्यांच्या पिढीला चित्त आणि चित्र यांमधील पुरातन नातं उमजलं असावं. त्यांचा चित्रावर शब्दांहून अधिक विश्वास होता. किंबहुना म्हणूनच त्यांच्या पिढीचे बहुतांश कलावंत मौन वृत्तीचे झाले असावेत. ‘वीतभर कला आणि हातभर कलकलाट’ यावर नखभरही विश्वास न ठेवणारी ही पिढी माझ्या पिढीला घडवून गेली, याचा मला अभिमान वाटतो. या पिढीनं आम्हाला पाहायला शिकवलं, रंगांचं इंद्रधनुष्य आमच्या डोळ्यांत उभं केलं, चित्राच्या किमतीकडे नव्हे तर दर्जाकडे आमचं लक्ष वेधलं. त्यांनी आम्हाला अंतर्बाह्य रंगवलं, इतकं की देह गेला तरी रंग जाणार नाही. त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्याचा विचार करणंदेखील नतद्रष्टपणाचं ठरेल.

पळशीकरांना विचारलेला प्रश्न, एकदा प्रत्यक्ष गायतोंडे यांना विचारण्याची संधी मला मिळाली. मी म्हटलं, ‘‘सर, तुमची चित्रं लोकांना कळत नाहीत यावर तुम्हाला काय वाटतं?’’ त्यावर तेही पटकन म्हणाले, ‘‘मला काय वाटायचं? मला जे वाटतं ते लोकांना वाटत नाही. आणि त्यांना कळत नाही ही त्यांची समस्या
आहे.’’ वर असंही म्हणाले, ‘‘मला तरी सगळंच कुठं कळतंय जगातलं.’’ बस्स. एवढंच होतं त्यांचं उत्तर.
खरं आहे त्यांचं म्हणणं. लोकांना चित्राविषयीचे प्रश्न, विचार, तत्त्वज्ञान कळलं तर चित्रही समजेल आणि चित्रकारसुद्धा समजेल. त्यांची ही अशी त्रोटक, मुद्देसूद उत्तरं त्यांच्या प्रदीर्घ मौनातूनच आली असावीत.

त्यांना झालेल्या भीषण अपघातात त्यांचं शरीर मोडलं; पण मौनाचा कणा अधिक कणखर झाला. त्यानंतर मौन हेच बोलणं झालं. ज्यांना त्यांची मौनाची भाषा कळली त्यांनी त्यांना प्रश्न केले नाहीत. ज्यांनी प्रश्न केले त्यांना गायतोंडे यांनी आपल्या चित्रांतून उत्तरं दिली. स्वत:ला पृथ्वीवरचा रहिवासी समजणार्‍या गायतोंडे यांचा जन्म कुठं झाला, बालपण कुठं गेलं, तारुण्यात त्यांनी काय केलं, म्हातारपणात काय भोगलं, ते दिल्लीला का स्थलांतरित झाले, पुन्हा मुंबईला का आले नाहीत, हे सारे प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत किंवा त्यांची अनेक वेगवेगळी उत्तरं अस्तित्वात येतील. दंतकथा, आख्यायिका तयार होतील. चित्राव्यतिरिक्त इतर अनेक रूपकांतून गायतोंडे शिल्लक राहतील. संपूर्ण गायतोंडे कधीच कुणाला सापडणार नाहीत. पूर्णत्वाची हीच किमया असते. पूर्ण असलं तरी अपूर्णच वाटत राहणारं. अगदी अलीकडची बातमी अशी आहे, की गायतोंडेंचं प्रदर्शन अमेरिकेत गुगेनहॅमला होणार आहे. चांगल्या, दर्जेदार कामाचं असंच असतं. अशा कामांना प्रायोजक लागत नाही, त्यांचा अस्खलितपणा त्या कामाचं प्रयोजन करतो. पाठिंबा, गटबाजीची गरज पडत नाही. कट-कारस्थानं करावी लागत नाहीत. कामातील दर्जा वारसा-हक्कात कुणाला मिळत नाही आणि देताही येत नाही. तो मिळवावा लागतो.

गायतोंडे यांनी स्वत:च्या चित्रांद्वारे तो मिळवला. दर्जेदार काम काही काळ टाळता येईल, पण झाकून ठेवता येणार नाही; कारण ते आरवणारं असतं. गायतोंडेंचा काळ सांस्कृतिकदृष्ट्या परिपक्व परंतु परिवर्तनशील होता. कला-क्षेत्राचं बाजारीकरण झालेलं नव्हतं. कलेतील अक्षय आनंद आणि अपार्थिव आशय शोधण्याला कलावंत आपलं धर्मकार्य समजत असत. चित्रकार भरपूर वाचन करत असत. आपापसात वाद घालत. परंतु एक-दुसर्‍याच्या मनावर ओरखडाही उमटणार नाही, याची काळजी घेण्याइतपत त्यांची संवेदनशीलता जागी असे. त्यांच्या लेखी जीवनातील महानुभव अधिक महत्त्वाचा होता.

(प्रभाकर कोलते यांची प्रस्तावना असलेला, ‘चिन्ह’ प्रकाशन संस्थेचा निवडक चिन्ह मालिकेतील दुसरा खंड मे महिन्यात प्रकाशित होत आहे. या खंडात गायतोंडे यांच्या 16 स्नेह्यांचे लेख, गायतोंडे यांच्या सहा मुलाखती व एक लेख, सोबत 65 रंगचित्रे आदींचा समावेश आहे. ग्रंथासंबंधी अधिक माहितीसाठी chinhamag@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.)