आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकला : एक चित्त मीमांसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूलभूत इंद्रिय-संवेदनांच्या आधाराने चित्ताच्या (मनाच्या) वैविध्यपूर्ण भाषा विकसित होत जातात. खरं म्हणजे, त्या भाषेतूनच पुढचा बहुपेडी जीवनमार्ग मूलत: विकसित व्हायला हवा, परंतु तसे होत नाही. आपल्या आंतर-जाणिवेला छळणार्‍या औत्सुक्याला अनुभवाशी जोडणार्‍या ज्ञान-प्रक्रियेची शब्द-भाषेशी ओळख करून देऊन चित्त-भाषेची गळचेपी केली जाते. या शब्द-भाषेलाच आपण आपली मातृभाषा म्हणतो. वस्तुत: इंद्रिय संवेदनेद्वारे अनुभव देणारी आणि व्यक्त होणारी भाषा हीच खरी मातृभाषा. हिचा श्रीगणेशा आपण आईच्या कुशीतच केलेला असतो. परंतु, संवादभाषेमार्फतच, भाव-भावनांसकट अख्ख्या जगाची आपल्याला माहितीवजा ओळख करून दिली जाते. परिणामी, वास्तवातल्या वस्तूंची नावे व त्यांची उपयुक्तता एवढ्यापुरताच आपला त्यांच्याबरोबरचा संवाद मर्यादित राहतो. त्यांच्या वस्तुत्वाबद्दलचे इतर अनेक तपशील आपल्याला अपरिचितच राहतात. विशेषत: वस्तूत असलेल्या रूप-भेदादी चित्रांगांबद्दल आपण अनभिज्ञच राहतो. तद्वत तिच्यातील नाद-स्पर्शादी इतरही शक्यता असतात, हेदेखील आपल्याला माहीत नसते. तिचे इतर वस्तूंशी असलेले नातेसंबंध तर फार दूरच्या कल्पना.

चित्रकलेत पाश्चात्त्य चित्रकार पौल सेझान याने निसर्गात भूमिती पाहिली आणि घनवादाची मुहूर्तमेढ रोवली. वासुदेव गायतोंडे यांनी सुरुवातीला सभोवतालच्या परिसरात आणि नंतर अंतर्मनातल्या अवकाशात अमूर्त आकारांचे संकेत पाहिले. भारतीय संगीत क्षेत्रातील तौफिक कुरेशी किंवा त्रिलोक गुर्टू यांनी एखाद्या वस्तूतून वाद्यासारखा आवाज काढला की आपण चकित होतो, ते खरे म्हणजे वस्तूविषयीच्या आपल्या मर्यादा उघड्या होतात, म्हणून. केवळ गरजेपुरती माहिती घेऊन आपण अशा अनेक वस्तूंशी आयुष्यभर व्यवहार करीत आलो, हे आपल्याला अशा प्रयोगांमुळे कळते. मग असे प्रयोग ज्यांचे सातत्यपूर्ण अनुभव होतात, ते एक तर कलावंत होतात किंवा रसिक. उरलेले बहुतांश अर्ध्या-मुर्ध्या माहितीच्या आधारे विशिष्ट जीवन-मार्गाची (करिअरची) स्वत:ला सवय लावून घेतात आणि घड्याळाच्या काट्यासारखे त्याच त्याच अंकांना (माहितीला/अनुभवाला) स्पर्श करीत, स्वत:भोवतीच गोल गोल फिरत राहतात. नोकरी-धंदा सांभाळत, लग्न, मुले, त्यांचे शिक्षण इत्यादी टप्पे ओलांडत जिवंत राहण्यासाठी धडपडतात. या धडपडीलाच जीवन समजण्याचा गोड गैरसमज करून घेतात.

कलेद्वारे स्वत:ची केवळ करमणूक करून घेणे आणि कलांचा आस्वाद घेणे, यातला सांस्कृतिक रस-भेद त्यांच्या लक्षात येत नाही. चित्रकलेकडूनही अशाच प्रकारच्या करमणुकीची त्यांना अपेक्षा असावी. चित्रकला ती अपेक्षा पूर्ण करत नाही, यास्तव त्यांना ती कळत नसावी. खरे म्हणजे, त्यांनी स्वत:च्या जन्मासोबत आणलेली चित्ताची भाषाही कधीचीच त्यांच्या इंद्रियातच गोठून गेलेली असते. चित्रकलेसारख्या दृश्यानुभवालाही समजावून सांगण्यासाठी शब्दांचाच आधार घेणे समजावणार्‍याला दुर्दैवी वाटावे, इतकी ती त्यांच्या इंद्रियात दगड झालेली असते, एखाद्या पुरातन शिलालेखासारखी असंबद्ध.
चित्रकलेकडे पाहण्याचा समाजाचा तसेच मूलत: चित्रकारांचा व इतर कला-प्रांतातल्या कलावंतांचाही दृष्टिकोन म्हणावा तसा विकसित झालेला दिसत नाही, ते त्यामुळेच. त्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, मुळात जीवनाकडेच बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन संकुचित, मर्यादित, पूर्वदूषित आणि परावलंबी आहे, असे वाटते. त्यामुळे चित्राचा, विशेषत: आजच्या आधुनिक युगातल्या समकालीन कलाकृतींचा आस्वाद फक्त संबंधित चित्रकार, त्यांचे चाहते, मित्र-परिवार आणि तथाकथित कला-समीक्षकाच्या वेशातले वार्ताहर घेत आलेले दिसतात. आपल्याकडे समीक्षेवर पोट भरणारे समीक्षक अधिक, परंतु स्वत:ला समीक्षेला वाहून घेतलेले औषधालाही सापडणे कठीण!
व्यवसायधार्जिणी शिक्षणप्रणाली व त्यामुळे हळूहळू सगळेच ज्ञान-विषय तिच्या रुक्ष परिघात बळजबरीने आणून अभ्यासक्रमांच्या खुंट्यांना वर्षानुवर्षे बांधलेले. त्यातून कला-विषयांचीही सुटका झाली नाही. परिणामी, कलाशाळा उघडल्या गेल्या. हळूहळू त्यांची संख्या इतकी वाढली आणि ती वाढूनसुद्धा सुमार शिक्षकांच्या हाती कला-ज्ञानाचे तारू आल्याने विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आणि ती पुढे त्यांच्यातल्या कलावंतालाही भेडसावू लागली. पुढे कला-शिक्षणच अर्थ-कारणाला जोडले गेले आणि त्यामुळे उत्तरार्धात ते विकासाचा केंद्रबिंदू होण्याऐवजी विकाराचा अड्डा झाले.

इकडे कौटुंबिक सीमेवर, सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणेच जोवर कुटुंबातली चित्रकार असलेली व्यक्ती चित्र विकून पैसे आणत नाही, तोवर संशय आणि चिंता दर्शवत त्याच्या कर्तृत्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती बळावली. सगळी सोंगं आणता येतील; पण पैशाचं सोंग आणता येत नाही, असे का म्हणतात, हे चित्रकाराला हळूहळू कळायला लागते, पटते आणि मग तो मनाशी ठरवतो की, सोंग कशाला, चक्क पैसेच आणून दाखवतो आणि स्वत:च्याच निर्णयाला बळी पडतो. खरे म्हणजे, त्याने तिथे आणि तेव्हाच आपल्या कलेचा बळी दिलेला असतो. व्यासंगाचा संग सोडून कला-व्यापाराचे रंग आपल्या शिंगावर घेतो तेव्हाच त्याच्यासाठी दिसण्याचे, बघण्याचे, शोधण्याचे, संशोधन करण्याचे, स्वत:ला ओळखण्याचे, एवढेच नव्हे, तर स्वत:च्याच चित्राने आश्चर्यचकित होण्याचे प्रश्न आणि अनवट अनुभव संपुष्टात येतात. त्याचा हा कमकुवतपणा नष्ट करण्याऐवजी त्याच्या समोर व्यवसाय-धर्मी उपयोजित कलेचे गाजर धरून त्याचा उरलासुरला आत्मविश्वासही खच्ची करण्याची फार मोठी चूक महाराष्ट्रातल्या व अवघ्या देशातल्या कला-शिक्षणाने केली. त्या चुकीचे विषारी परिणाम स्वयंभू, स्वायत्त अशा चित्र-शिल्प कलेवर खोलवर झालेला आज दिसतो आहे.

आपण बाहेरून दिसणारे आणि बदलते जगच सत्य, शिव आणि सुंदर समजून पुजत चाललो आहोत. नक्कल, उसनवारी, करता करता केवळ शब्द-प्रामाण्य चित्र तयार करण्यावरच भर देत आहोत. दिसणार्‍या दृश्याच्या आत ज्ञानबळाने डोकावायला मदत करू शकली असती, ती ‘इंद्रिय-भाषा’ अप्राप्य वाटावी इतकी बहिरी, बधिर, आंधळी, बेचव आणि निर्गंध झाली आहे की, तिला प्राप्य करायची असल्यास ‘संवेदन-क्रांतीच’ करावी लागेल. अर्थात, अप्राप्यतेला अपवाद ठरतील अशा काही वाटा द्रष्ट्या कलावंतांनी शोधून आपल्याला दाखविल्या आहेत.

prabhakarkolte@hotmail.com