आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून वेडिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान्सून म्हटलं की डोळ्यांसमोर येतात दाटून आलेले मेघ, अंगावर शहारा आणणारा गार वारा आणि मातीच्या सुगंधाने प्रसन्न झालेलं वातावरण. किती आल्हाददायी भावना असतात ना या, नुसत्या कल्पनेनेच मनातील कोपरा नि कोपरा शहारून उठतो.

मनात कल्पनाविलास जागवणारा हा पर्जन्य कवींना तर वेड लावतोच, पण सामान्य माणसालाही हवाहवासा वाटतो. पहिला पाऊस आणि त्यामागच्या आठवणींनी मन हरखून जाते या आल्हाददायी मान्सूनशी माझ्या आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षण बांधले गेलेले आहेत. कारण माझं लग्न ऐन पावसात झालेलं आहे. अगदी आमच्या निमंत्रणपत्रिकेवरही मान्सून वेडिंग असं सुंदर लेबल लागलं होतं, ते वाचून येणारा प्रत्येक जण सुखावून गेला होता.

प्रत्येक वर्षी मान्सूनच्या आगमनाच्या वेळी या आठवणी मनामध्ये नव्याने उमलतात आणि निसर्गाच्या या सुंदर स्वप्नाळू अनुभूतीमध्ये आम्ही दोघे चिंब भिजतो.

वर्षा ऋतूमध्ये ही धरतीही हिरवागार साज लेऊन सुंदर होऊन जाते. हिरवाईने नटलेल्या धरेला इंद्रधनुष्याचे तोरण सजते. निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार नवपरीणितांच्या आयुष्याची सुरेल सुरुवात करून देतो. असं हे आमचं मान्सून वेडिंग. दरवर्षी पहिल्या पावसात त्याची आठवण आम्हाला होतेच.
प्राची शिरोडकर, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...