आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोर नात्यांची नवी गोष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही कुटुंबं ही एका लग्नाच्या गोष्टीपुरती मर्यादित नसतात. एका लग्नामुळे तयार होणाऱ्या रक्ताच्या नात्यांची चौकट त्यांना नसते. अशा नात्यांपलीकडे या कुटुंबांचा विस्तार होत असतो. तरीही नात्यांचा गोफ घट्ट असतो. मोकळेपणा असतो. एकमेकांविषयी आदर, माया, जिव्हाळा, मैत्री असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सुरक्षितता आणि स्थैर्य असतं.
रा गिणीच्या सोबतीला जन्मापासूनच अपंगत्व होतं. रागिणी एकुलती एक. घरच्यांनी तिला ती अपंग असल्याची कधीही जाणीव करून दिली नाही. अपंग व्यक्तीकडे सहानुभूतीने किंवा दयेने पाहिलं जातं, रागिणीला याचा प्रचंड राग आहे. शिवाय अपंग मुलीला कशाला हवं लग्न, असंही तिच्यामागे बोललं जायचं. आपण चारचौघांसारखं लग्न करू शकतो, या विचारावर ती ठाम होती. या विचारापर्यंत येण्यासाठी मात्र तिला खूप झगडावं लागलं. वधू-वर सूचक मंडळात आईने तिचं नाव नोंदवलं. आणखी एका मानसिकतेचा तिला सामना करावा लागला. अपंग मुलाला लग्नासाठी धडधाकट मुलगी शोधली जाते. पण अपंग मुलगी असेल, तर अपंग मुलगाच शोधला जातो. त्यामुळे रागिणीला मुलगा शोधण्यासाठी अडचणी आल्या. अशाच एका भेटीत रागिणीची संजीवशी ओळख झाली.

संजीवला एका आजारात पायांमध्ये व्यंग आलं होतं. संजीवने लग्नासाठी तिला होकार दिला, पण रागिणीने त्याला नकार दिला. आपल्याला धडधाकट मुलगा मिळेल, अशी आशा तिला होती. नंतर प्रयत्न करूनही हवा तसा जोडीदार रागिणीला मिळाला नाही. पुढे पंधरा वर्षांनी रागिणीची संजीवशी फेसबुकमुळे पुन्हा भेट झाली. प्रत्यक्ष गाठीभेटीही वाढल्या. दोघांमध्ये मैत्रीची ओढ वाढली आणि लग्नाची आस मागे पडली. दोघंही चाळिशी ओलांडलेले. एकमेकांच्या सहवासाची गरज वाटत होती. रागिणीने आईला संजीवबाबत कल्पना दिली होती. त्यांनी विकेंड एकत्र घालवायला, आईचीही हरकत नव्हती. हळूहळू जवळच्या नातेवाइकांनादेखील त्यांच्या एकत्र येण्याची सवय झाली. रागिणीच्या आईच्या आजारपणात संजीवची साथ होती. नंतर आई गेल्यावर संजीव रागिणीसोबत राहायला आला. रागिणी म्हणते- लोक काय म्हणतील, हे मिथ आहे. १०-१५ मिनिटं दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्यापलीकडे लोकांना, शेजारपाजाऱ्यांना रस नसतो. त्यामुळे संजीवचं रागिणीच्या घरात राहणं शेजाऱ्यांना खुपण्याचं काही कारण नव्हतं. आता रागिणी आणि संजीव एकत्रितपणे तिच्या नातेवाइकांकडे वा शेजारी गप्पांच्या मैफलीत सामील होतात. दोघांनाही लग्न हे बंधन नकोय. लग्नाने जितकं बांधलो गेलो असतो, त्यापेक्षा घट्ट हे नातं असल्याचं रागिणी सांगते. घरात आईच्या आजारपणात केअरटेकर असलेली सुनीता आई गेल्यावर परत गेली नाही. तिचंही रागिणीशी जिव्हाळ्याचं नातं तयार झालंय.

‘पगार नको, मला जीव लावणारी माणसं मिळाली’ या सुनीताच्या वाक्यावर आजही रागिणीला भरून येतं. संजीव आणि रागिणीच्या नात्याबद्दल बोलताना सुनीता म्हणते- माणूस महत्त्वाचं, नातं महत्त्वाचं. सुनीता सातवी शिकलेली, तिचं लग्न ‘यशस्वी’ झालं नाही. आता मुंबईत स्वत:चं आयुष्य जगतेय. संजीव आणि रागिणी यांनी वयाची पंचेचाळिशी ओलांडली आहे. दोघंही आनंदी आहेत. बाहेरच्या कुठल्याही नियंत्रणाशिवाय त्यांचं नातं रुजलं आणि वाढलं. कुटुंब याहून काय वेगळं असतं, असं रागिणीचं म्हणणं. लिव्ह इन रिलेशनशीपच्या मर्यादित चौकटीत त्यांना आपलं नातं ठेवावंसं वाटत नाही...

सामाजिक कार्यकर्त्या आणि AIDWAच्या सुगंधी फ्रान्सिस यांचं कुटुंबही असंच चौकटीबाहेरचं. सुगंधी फ्रान्सिस हे त्यांचं लग्नानंतरचं नाव. आधीचं नाव पवित्रा. सुगंधी यांचा फ्रान्सिस यांच्याशी प्रेमविवाह झाला. जातीबाहेर लग्न केलं, म्हणून सुगंधी यांच्या कुटुंबाने त्यांच्याशी नातंच तोडलं होतं. फ्रान्सिसच्या घरातूनही नाराजी होती. पण, त्यांचं सासरी जाणं-येणं सुरू राहिलं. फ्रान्सिस यांची कंपनी बंद पडली आणि संसाराला मिळणारी जी काही मिळकत होती, तीदेखील बंद झाली. फ्रान्सिस यांचं पिणं सुरूच राहिलं. संसाराचा गाडा ओढण्याचं काम सुगंधींना एक छोटसं हॉटेल चालवून करावं लागलं. फ्रान्सिस आजारी पडले, तसे अवघे १६ वर्षं वय असलेल्या मुलीच्या लग्नाची घाई करायला सुरुवात केली. पण सुगंधी यांनी लग्नाला विरोध करत मुलीला शिक्षणासाठी मुंबईबाहेर मैत्रिणीकडे पाठवून दिलं. १९८६मध्ये फ्रान्सिस वारल्यानंतर सासरच्या मंडळींनी सुगंधींच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला. पण दबावाला बळी न पडता, त्या स्वतंत्रपणे निर्णय घेत राहिल्या. याच काळात भाडेकरूंच्या प्रश्नांवर त्या काम करू लागल्या. AIDWA या संघटनेतही अधूनमधून मदतीसाठी जात राहिल्या. रेशन आणि पाण्याच्या प्रश्नावर महिलांना संघटित करू लागल्या.

याच सामाजिक कामादरम्यान त्याची ओळख गणिततज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक माँटेरो यांच्याशी झाली. १९९०मध्ये दोघांनी लग्न केलं. त्या वेळी त्यांच्या मोठा मुलगा १७ वर्षांचा, मुलगी १५ वर्षांची आणि लहान मुलगा १३ वर्षांचा होता. सुगंधी म्हणतात, ‘विधवा महिलांना लग्न करायचं असतं, पण आजूबाजूच्या दडपणामुळे त्यांची हिंमत होत नसते. पुन्हा लग्न केल्याने आपल्या मुलांचा वारसा हक्क जाईल का, याची भीती अनेकींना असते.’ त्यांनी लग्न केल्यावर वस्तीतल्या अनेकींना आनंद झाला. इतकंच नाही, तर मागाहून तिघींनी धाडसाने पुनर्विवाह केले.

आठ वर्षांनी त्यांचा मोठा मुलगा अपघातात गेला. त्याची होणारी बायको गीता, या प्रसंगानंतर सावरली आणि सुगंधी यांच्या घरी राहायला आली. या कुटुंबाशी जुळलेलं नातं तिने तोडून टाकलं नाही, तर त्यात स्वत:ला सामावून घेतलं. जवळपास दहा वर्षांनी गीताचं एका तामीळ तरुणासोबत लग्न झालं. मुलगा गीतापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. पण, त्यामुळे त्यांच्या नात्यात काही फरक पडला नाही. सुगंधी यांच्यासोबत तिचं नातं इतकं घट्ट आहे की, गीताला त्यांनी वारसाचा समान कायदेशीर हक्क दिला आहे. जसं गीताचं तसंच सुषमाचंदेखील या कुटुंबाशी कोणतंही रक्ताचं नातं नव्हतं. ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली तिच्या घरच्यांची हत्या करण्यात आली, त्यातून सुषमा कशीबशी वाचली, पण सुषमादेखील आपल्या चिमुरड्या मुलीसह सुगंधींच्या कुटुंबाचा भाग झाली. नंतर सुगंधींच्या धाकट्या मुलासोबत सुषमाचं लग्न झालं. सुगंधी यांच्या मुलीनेही आंतरजातीय विवाह केलाय. घरात नातवंडं आहेत. त्यांच्यात रमण्यासाठी सुगंधी-विवेक यांना रक्ताच्या नात्यांची आवश्यकता वाटत नाही. वृद्धापकाळाने आजारी असणाऱ्या ९८ वर्षांच्या सासूबाईही (फ्रान्सिस यांची आई) या कुटुंबात सात वर्षांपूर्वी दाखल झाल्याहेत. त्यांना सुगंधींच्या कुटुंबात मायेचा आधार मिळतो. सुगंधी यांना हे कर्तव्याचं पालन करण्यासारखं वाटतंय...

घडून गेलेल्या प्रसंगांची उजळणी नाही, की मनात कडवटपणा नाही. सुगंधी फ्रान्सिस यांचं वय आज ६८ वर्षं आहे, पण नाती जोडण्याची उमेद तसूभरही कमी झालेली नाही. घरातले सगळे निर्णय सर्वांच्या सहमतीने आणि संमतीने होतात. वर्षातून दोनदा हे कुटुंबीय आवर्जून फिरायला जातात. सुगंधी-विवेक यांच्या कुटुंबाला कोणत्याही सीमा नाहीत. बदलत्या काळातल्या बदलत्या नात्यांना सामावून घेण्याची ताकद या कुटुंबामध्ये आहे...
prajakta.dhulap@gmail.com