आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुंजार गौरी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि आता पत्रकार गौरी लंकेश...
सरकार कोणाचेही असो, व्यवस्था कोणाच्याही ताब्यात असो, धर्माभिमानी, कट्टरपंथी लोक सर्वांदेखत गोळ्या घालून निघून जातात. असहिष्णुतेचे बळी ठरलेलेच पुन:पुन्हा बळी पडत जातात... गोळ्या घालणाऱ्यांचा केसही वाकडा होत नाही. खुनाची कार्यपद्धती एकसारखी असते. दहशतीचा पट्टा सर्वपरिचित असतो... म्हणूनच घटनेनंतर मंत्र्या-संत्र्यांनी शोक व्यक्त करणे, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे हे सारे निरर्थक ठरते... विवेकी लोक बेंबीच्या देठापासून आक्रोश करतात. निर्ढावलेले सत्ताधारी सत्तेसाठी जाती-धर्माचे नवे हिशेब मांडण्यात स्वत:ला गुंतवून घेतात. सगळ्यांना सगळे ठाऊक असते, तरीही सत्ताधाऱ्यांपासून पोलिसांपर्यंत सगळे अनभिज्ञ असल्याचा अभिनय तेवढा करत राहतात... हाच बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आणि लिंगायत धर्मासाठी सुरू असलेल्या ताज्या राजकीय संघर्षाचा साधासरळ अर्थ असतो...

निर्भीड पत्रकार, कणखर संपादक आणि झुंझार कार्यकर्ती म्हणून गौरीला सगळे जण ओळखत होते. पण आमच्यासाठी ती अत्यंत प्रेमळ आणि मायाळू आणि थोडीशी तापट अशी बालमैत्रीण होती. गेल्या ३५ वर्षांपासून मी तिला ओळखत होतो. एवढ्या प्रेमळ गौरीची हत्या करण्याएवढा तिचा कुणी द्वेष करत असेल, यावर माझा विश्वासच बसत नाही. ती माझ्यासाठी अत्यंत हळवी मैत्रीण आणि तेवढीच कणखर स्त्री होती. 

गौरी लंकेशच्या कुटुंबासोबतचा आमचा स्नेह खरे तर तिच्या वडिलांसोबतचा. गौरी, तिची बहीण, भाऊ, मी, माझी बहीण आम्ही सारे एकत्रच वाढलो. खरे तर गौरीचे वडील पी. लंकेश यांच्यामुळेच सत्तरीत जन्मलेल्या आमच्या पिढीची सांस्कृतिक-सामाजिक जडणघडण झाली. नवे नाटक, नवे लेखन, नवी पत्रकारिता त्यांनी आम्हाला शिकवली. जगाकडे बघण्याची दृष्टी दिली आणि दिशाही दाखवली. १९७० च्या कन्नडातील सांस्कृतिक क्रांतीचे ते जनक होते, नायक होते. आमच्या पिढीचे ‘मेस्त्रू’ होते, शिक्षक होते. १९७६ मध्ये त्यांच्या ‘पल्लवी’ या चित्रपटाला सुवर्णपदकाने गौरवण्यात आले होते. आधुनिक कानडी काव्यातील त्यांची प्रतिभा असामान्य होती, दृष्टी व्यापक होती. फेबरच्या आधुनिक सुनितांवर आधारित त्यांनी रचलेले ‘अक्षर होसा काव्य’ ही आधुनिक काव्याची अत्यंत बुद्धिवंत साहित्यकृती ठरली. त्यांनी कन्नडा नाट्यसृष्टीला नवे नाट्य दिले. १९७२ मध्ये ‘रवींद्र कलाक्षेत्र’च्या खुल्या रंगमंचवार आलेली ‘संक्रांती’ आणि ‘डोरे ऑडिपस’ ही त्यांची नाटके फार गाजली... या रवींद्र कलाक्षेत्राच्या खुल्या रंगमंचावर कन्नडा रंगभूमीच्या चळवळीला त्यांना नवसंजीवनी दिली आणि आज त्याच खुल्या रंगमंचावर गौरीचा निर्जीव देह अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हा जितका विचित्र योगायोग होता, तितकीच एक प्रकारची प्रतीकात्मकता त्यात मला जाणवत होती.
 
१९८० मध्ये जाहिरातींच्या आक्रमणापासून मुक्त अशा स्वतंत्र आणि स्वायत्त पत्रकारितेच्या उद्देशाने त्यांनी ‘लंकेश पत्रिके’ची स्थापना केली. अल्पावधीतच फक्त वर्गणीदार आणि विक्री यावरच आधारलेली ‘लंकेश पत्रिका’ ही शेकडोंची प्रेरणा बनली. कन्नड पत्रकारितेत एक मैलाचा दगड रोवला गेला. 

२००० मध्ये पी. लंकेश गेले, तेव्हा गौरी ३८ वर्षांची होती. मात्र, तिला तिचा सूर स्पष्टपणे सापडला नव्हता. प्रेम आणि करिअरच्या हिंदोळ्यांवर ती गटांगळ्या खात होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या बंगळुरू आणि दिल्ली आवृत्त्यांमध्ये तिने उमेदवारी केली होती. ‘वीकली संडे’मध्ये वार्तांकन केले होते. पण तरीही तिला तिचे असे काही सापडले नव्हते. कदाचित, भविष्यात तिला मोठा वारसा चालवायचा होता, म्हणूनही असेल. पुढे वडिलांच्या पश्चात गौरीने ‘लंकेश पत्रिके’च्या संपादकपदाची धुरा हाती घेतली आणि तोपर्यंत आम्हाला माहीत नसलेली एक वेगळीच गौरी आम्ही पाहिली. अनुभवली. नव्या अवतारातल्या गौरीच्या आवाजाला आणि शब्दांना धार आली होती. कर्नाटकातील दलितांच्या आणि स्त्रियांच्या चळवळीची हक्काचा ती आवाज बनली होती. समाजातील पददलितांची बाजू अत्यंत पोटतिडकीने मांडणारी, वेळोवेळी जोखीम पत्करणारी संपादक, सांप्रदायिकतेविरोधात लढणारी कार्यकर्ती, वंचितांच्या हक्कांच्या विचारांशी बांधिलकी सांगणारी कणखर स्त्री तिच्यातून पुढे येत गेली होती. त्यातूनच पुढे चिकमंगळूरच्या बाबा बुधनगिरी दत्त पीठासोबतच्या संघर्षात ती कडव्या हिंदुत्वाच्या विरोधात आणि अल्पसंख्याकांच्या बाजूने उभी राहिली. रोहित वेमुलाने आत्महत्या केली तेव्हा ती त्याचा दमदार आवाज बनली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैयाकुमार पुढे आला आणि दलितांवरील अन्याय अत्याचाराविरोधात बोलू लागला, तेव्हा गौरी त्याची आई बनली. गेल्या दीड दशकात गौरी सर्वार्थाने कर्नाटकातील प्रभावी व्यक्तिमत्त्व बनली होती. 
वैदिक धर्म, संघ परिवार आणि उजव्या विचारांविरोधात जाहीरपणे आणि ठामपणे भूमिका मांडत पुढे चालली होती. मुक्त आणि आधुनिक विचारांची तिने धरलेली कास तिच्याबद्दलचा अभिमान जागवत होती.  

मात्र, आज एका  टप्प्यावर तिला श्रद्धांजली वाहताना मी अत्यंत हादरून गेलो आहे. खरे तर मला तिची विचारसरणी पूर्णपणे समजली नाही किंवा मी ती स्वीकारलीही नाही, पण गौरीच्या प्रेमाचा मी कायमचा धागा बनलो होतो. कानडीतील कला, सांस्कृतिक वातावरणात वावरणाऱ्या कुटुंबांमध्ये आम्ही मोठे झालो. आम्ही शेवटचे भेटलो, ते २०१४ च्या हिवाळ्यात. त्या वेळी आमच्या मैत्रीत एक दरी आली होती. मी नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊन भाजपचा मीडिया कन्सल्टंट बनलो होतो. ‘तुझ्यातला ब्राह्मण जागा झाला आहे,’ गौरी त्या वेळी मला म्हणालेली. सोशल मीडियावरही आमची याबाबत वादावादी झाली होती. शेवटी मी तिला काही काळ ‘अनफ्रेंडही’ केले होते. पण त्या दिवशी तिला पुन्हा भेटलो तेव्हा तिच्या त्या प्रेमळ आणि मायाळू स्वभावाचा, माफ करण्याच्या वृत्तीचा प्रत्यय मला आला होता. लहानपणीच्या त्या गौरीची त्या दिवशी मला पुन्हा भेट झाली होती. विचारांच्या भिंती ओलांडून, जुन्या आठवणींनी आम्हा सगळ्यांना चिंब केले होते.

पण, परवा तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि खाडकन जाणीव झाली की विचारांच्या भिंती जीवघेण्या बनल्या आहेत.  आज  गौरीसारखी खंबीर मैत्रीण आम्ही गमावली आहे. वैयक्तिक द्वेषाने किंवा धार्मिक मत्सराने तिचा बळी घेतला आहे. तिच्या जाण्याने ती ज्या घटकांसाठी झटत होती, त्या दलित, अल्पसंख्याक चळवळीची मोठीच हानी झाली आहे,  पण माझ्यासाठी एक जिवलग मैत्रीण कायमची दुरावली आहे. मी पुरता उद्ध्वस्त झालो आहे. हादरून गेलो आहे. कोलमडलो आहे...

असहिष्णूंच्या मोकाट फौजा
समाजाला सगळ्यात मोठा धोका कोणापासून आहे? ओळखीचे चेहरे असलेल्या समाजकंटकांपासून की, सोशल मीडियावर अनेक मुखवटे घालून वावरणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या ‘ट्रोल आर्मी’पासून? ही चर्चासुद्धा शिळी वाटावी, असा सध्याचा माहोल आहे. म्हणजे, सत्ताधाऱ्यांचे उद्दाम समर्थक आता उघडपणे हिंसेचे समर्थन करू लागले आहेत. बळी ठरलेल्यांची जाहीर खिल्ली उडवत आहेत आणि हे सारे घडत असताना, ज्यांच्या दृश्य-अदृश्य पाठिंब्यावर हे सुरू आहे, असा आभास निर्माण केला जात आहे, ते सत्ताधारी-राजकारणी मात्र सूत्रबद्ध मौन बाळगून आहेत, म्हणजे, यापूर्वी जेव्हा डॉ. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून हत्या झाल्या तेव्हा ‘सनातन’सारख्या संस्थांचा आवाज तेवढा वाढलेला दिसला, परंतु गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मुखवटा घातलेल्यांनीच नव्हे, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसारख्या घटनादत्त पदावर बसलेल्या नेत्यांशी या-ना त्या निमित्ताने संबंध आलेल्यांनीही बेधडक हिंसेची भाषा केली आहे. प्रश्न जबाबदार नेत्यांनी अशा समाजविघातक मंडळींना सोशल मीडियाच्याच माध्यमातून स्पष्ट शब्दांत समज देण्याचा आहे. मात्र, आजवर तसे काहीच घडत नसल्याने दरदिवशी सोशल मीडियावरून असहिष्णूंच्या फौजा मोकाट सुटल्याचे भयावह वास्तव अनुभवास येत आहे...

शब्दांकन: दीप्ती राऊत

- प्रकाश बेलावडी 
prakash.belawadi@gmail.com
(लेखक बंगळुरूस्थित प्रसिद्ध कन्नड अभिनेते आणि दिग्दर्शक, कार्यकर्ते, पत्रकार आहेत.)
बातम्या आणखी आहेत...