आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्‍याछाया लुभवती ह्दया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्य बापडा आपला स्थिरच असतो; परंतु अंटार्क्टिकावर उन्हाळी काळात सूर्याची स्थिती कशी असते? याचं उत्तर सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या नित्य निरीक्षण संकल्पनेतूनच द्यावं लागतं. या काळात तिथं ना सूर्योदय ना सूर्यास्त; आकाशात सूर्य आपला फिरत असताना दिसतो. समजा, तुमच्या घड्याळात 7 वाजले आहेत. सूर्य आपला फिरतोय. बरोबर 24 तासांनी, त्याच स्थानी तो फिरत फिरत आलेला दिसून येतो. दिवस दर दिवस तो क्षितिजाच्या दिशेला सरकलेला दिसून येतो. 21 जानेवारीला आम्ही तो क्षितिजाला स्पर्श करताना पाहिला. 22 जानेवारीला तो क्षितिजाखाली जाताना दिसून आला. म्हणजे नित्य निरीक्षणानुसार सूर्यास्त झाला; परंतु पाचच मिनिटांत, तो क्षितिजाच्या वर आला. याचा नित्य जीवनातला अर्थ, सूर्योदय झाला. याचाच अर्थ, रात्र पाच मिनिटांची होती.
दुस-या दिवशी रात्रीचा हा कालावधी थोडा जास्त, साधारणपणे 10 मिनिटांचा होतो. हळूहळू रात्रीचा कालावधी वाढत जातो. 21 मार्च रोजी, तो साधारणपणे 12 तासांचा असतो. वाढत वाढत मेमध्ये तो 24 तासांचा होतो. पूर्ण अंधाराचं साम्राज्य अंटार्क्टिकावरील या भागात पसरतं. हे निरीक्षण भारताच्या ‘मैत्री’ तळावरचं. अक्षांशानुसार ते बदलत असतं, याचा ऊहापोह झालेलाच आहे.
तथापि जेव्हा रात्रीच्या कालावधीला प्रारंभ होतो, तेव्हा काळामिट्ट अंधार असतो का? हा प्रश्नही मला ब-याच जणांनी विचारलेला. त्याचं उत्तर, या रात्रीच्या काळात गगनात संध्याछायांचं, संध्याछटांचं साम्राज्य असतं, हे आहे. सर्वसाधारणपणे अंटार्क्टिकावरचा मार्च-एप्रिलचा कालावधी हा पृथ्वीवरील अत्यंत मनोहारी निसर्ग देखाव्याचा कालावधी असतो. हा अपूर्व अशा संध्याछटांचा कालावधी. ‘संध्याछाया भिववती हृदया’ नव्हे, तर ‘संध्याछाया लुभवती हृदया’ अशी निसर्गरंगत.
मावळतीचा काळ. प्रकाशछटांच्या स्कॅटरिंगमुळे आकाश अशा काही रंगछटांनी उजळून जातं, गगनात एकच गीत गुंजत असतं, ‘रंग भरे मौसम मे रंग जमा दे’. हा अनोखा रंगोत्सव. केवळ अवर्णनीय. अशी गगन-रंगबहार पृथ्वीतलावर केवळ धृवीय प्रदेशावरच पाहायला मिळते. काही प्रमाणात तो इतर उच्च अक्षांशांच्या प्रदेशावरही दिसून येतो. याचं कारण, धृवीय प्रदेशांत सूर्य क्षितिजाशी अधिक कललेला असतो (हे विधानदेखील नित्य निरीक्षणावर आधारित). तो 18 अंशाहूनही अधिक खाली असतो. याचा परिणाम म्हणजे, संध्याछायांचा कालावधी बराच लांबतो. रात्री एक-दोन वाजता (स्थानिक वेळ) संध्याछटांचे फोटो सोबत देत आहे. त्यावरून त्याची कल्पना यावी.
ध्रुवीय प्रदेशावरील अशी निसर्गरम्य मौज पाहण्याचं भाग्य मला भारतीय अंटार्क्टिक मोहिमेमुळं मिळालं. भारताच्या आठव्या उन्हाळी अंटार्क्टिक मोहिमेत माझा सहभाग होता. अंटार्क्टिकावर कायमस्वरूपी स्टेशन बांधणं, हे आमच्या मोहिमेचं लक्ष्य होतं. तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेविषयी (आणि नंतरच्या काही मोहिमांविषयी) काही सांगणं मला अगत्याचं वाटतं.