आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापारातून विज्ञानाकडे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरं म्हणजे अंटार्क्टिक हा पृथ्वीतलावरील सर्वात प्रदूषणरहित प्रदेश. प्रदूषण हा शब्द अंटार्क्टिक कोशात नाही. म्हणूनच तर वैश्विक गूढांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जिवाचं रान करून तिथं जात असतात. थोडंफार प्रदूषण होतं ते या मानवी वर्दळीमुळं. तथापि ही वर्दळ असते किती? अंटार्क्टिक भूभागाचं क्षेत्रफळ भारताच्या चौपटीहूनही अधिक आहे. मानवाची सर्वाधिक गर्दी(?) अंटार्क्टिकातल्या उन्हाळ्यात होत असते. या काळात एवढ्या विशाल भूमीवर साधारणपणे १० हजार वैज्ञानिकांचा राबता असतो. सर्व जण पर्यावरणाचे जाणकार आणि जबाबदारीने वागणारे असल्यामुळं त्यांच्यामार्फत होणारं प्रदूषण नगण्य असतं.

आता अंटार्क्टिक भूमी वैज्ञानिक संशोधनासाठीच खुली असली तरी, सुरुवातीच्या मोहिमा व्यापारी दृष्टीने आखण्यात आल्या होत्या. अंटार्क्टिक सागरात मिळणारे महाकाय व्हेल्स (वजनगट १० ते १०० टन) आणि सील्स (३ ते ५ टन वजनगट) यांची शिकार हे उद्दिष्ट होतं. या शिकारीतून बक्कळ पैसा मिळायचा. त्यांच्या त्वचेचे चांगले कोट बनायचे. महाकायेत मांसही मुबलक असायचं. चरबीचं तेल खाण्यात वा वंगणासाठी उपयोगी पडायचं. व्हेल्स आणि सील्सच्या शरीरात सुगंधी द्रव्यं असतात, त्यावर ललनांच्या काया सुगंधित होत होत्या. त्यांच्या शरीरातील तंतू चिवट धागे म्हणून वापरात येऊ लागले होते. ही गोष्ट सन १८९० मधली. शिकारीस्तव अंटार्क्टिक सागरात शिरलेला नार्वेजियन साहसवीर लार्सेनने शिकारीऐवजी सील्स आणि व्हेल्सवरच्या संशोधनात रस घेतला. पुढं १८९४-९५मध्ये शिकारीसाठी अंटार्क्टिक सागरात गेलेला हेन्सी जोहान्स बुल हा नार्वेजियन व्यापारी तिथलं सृष्टिसौंदर्य पाहून हरखून गेला. मृगया विसरला आणि या अनोख्या दुनियेच्या संशोधनात मग्न झाला. २४ जानेवारी १८९५ रोजी त्याने मुख्य अंटार्क्टिक भूमीवर पाऊल टाकलं. अंटार्क्टिक भूमीवर पाऊल ठेवणारा तो पहिला मानव ठरला.

खर्‍या अर्थाने अंटार्क्टिकावर पहिली वैज्ञानिक मोहीम आखली, ब्रिटिशांनी. वर्ष होतं १९२४. बर्‍याच वैज्ञानिकांचा त्यात समावेश होता. मोहिमेचं नेतृत्व प्राणिशास्त्रज्ञ डॉ. वेल्स केम्प यांच्याकडं होतं. त्यांनी साऊथ जॉर्जिया इथं मरीन बायॉलॉजिकल स्टेशन उभं करून व्हेल्स, सील्स, पेंग्विन, क्रिल्स, प्लँक्टन आदी सजीवांवर संशोधन सुरू केलं. तब्बल १६०० व्हेल्सच्या अभ्यासावरून त्यांचा विणीचा हंगाम, विणीचा कालावधी, पिलांची वाढ, पिलांना वयात येण्यासाठी लागणारा कालावधी आदी गूढं उजेडात आली.

व्हेल्सच्या स्थलांतराचा मार्ग काढणं हे कठीण कामही त्यांनी केलं. ते ध्रुवीय प्रदेशात प्लँक्टन, क्रिल खाण्यास केव्हा येतात, यावर प्रकाश पडला. पेंग्विनचाही असाच अभ्यास करण्यात आला. सूर्य-स्थितीवरून पेंग्विन आपल्या स्थलांतराचा मार्ग कसा आखतात, हे गूढ जगासमोर आलं. अर्थातच, हे काही दोन-चार वर्षांतलं संशोधन नव्हतं. १९२४ ते १९५१ या काळातल्या खडतर परिश्रमाचा हा परिपाक होता. अंटार्क्टिकाची जीवसृष्टी हे गूढ असल्याने सुरुवातीचं संशोधन जीवशास्त्रावरच झालं. यथावकाश भूगर्भशास्त्र आणि हवामानशास्त्र यांवरही संशोधन सुरू झालं आणि अंटार्क्टिकावरील संशोधनातून वैश्विक गूढं उकलणं शक्य आहे, ही विचारधारा पक्की झाली. मानवी ढवळाढवळीपासून मुक्त असा संदर्भ प्रदेश म्हणून अंटार्क्टिकाचं महत्त्व वैज्ञानिकांना वाटू लागलं. अंटार्क्टिकावर होणार्‍या पर्यावरणीय बदलांना निसर्ग तथा वैश्विक प्रक्रियाच कारणीभूत असतात, म्हणूनच. वैश्विक सिद्धांताच्या अभ्यासासाठी ही एक विशाल प्रयोगशाळा ठरली आहे. अंटार्क्टिक आणि उर्वरित पृथ्वी, हे दोन वेगवेगळे गट पाडून वैश्विक गूढं उकलली गेली आहेत.

अशा अभ्यासातला महत्त्वाचा ठरला तो ओझोन छिद्र सिद्धांत. समताप मंडलात (stratosphere) ओझोनचं प्रमाण हळूहळू घटतंय, हे वैज्ञानिकांना ज्ञात झालं. उर्वरित पृथ्वीवरील मानवी प्रदूषणामुळं हे स्पष्ट होणं अवघड होतं. क्लोरोफ्लुरो मिथेन, क्लोरोफ्लुरोकार्बन, हॅलोजिन संयुगं इत्यादी मुख्यतः मानवी प्रदूषितांमुळं ओझोनचा ऱ्हास होतो, असं दिसून आलं. ओझोनचा थर वातावरणातील अतिनील किरणांना अडथळा करतो. ओझोनच्या कमतरतेमुळं अतिनील किरणं अधिक प्रमाणात पृथ्वीवर अवतरतात. त्यांची अतिरिक्त मात्रा आरोग्याला घातक असते. उर्वरित पृथ्वीच्या तुलनेत अंटार्क्टिक वातावरणात ओझोनचं प्रमाण जास्त आहे. याची कारणं, इतर भूभागावर समताप मंडल १५-२५ कि.मी. उंचीवर असतं, तर अंटार्क्टिकावर ते आठ-दहा कि.मी. वर उंचीवर असतं, तसंच प्रदूषित वायूंचं प्रमाण नगण्य आहे, म्हणूनच हा सिद्धांत अंटार्क्टिकावर प्रस्थापित होऊ शकला. वैश्विक सिद्धांताच्या अभ्यासासाठी अंटार्क्टिकाला पर्याय नाही. किंबहुना अंटार्क्टिक भूमीवर पाऊल ठेवताच एका वैश्विक सिद्धांताचा प्रत्यय सर्वांनाच येतो, हे सत्य!