आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Joshi Article About Antarctica, Divya Marathi

आकस्मिक शीताघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंटार्क्टिकावर नवीन तळ उभारण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू झाली. तळ हिवाळ्यात राहण्याच्या दृष्टीने सुसज्ज आणि सुरक्षित असणं, अत्यंत महत्त्वाचं होतं. हिवाळी पथकाचा अंटार्क्टिकावरील मुक्काम साधारणपणे 16 महिन्यांचा असतो. या काळात खाण्या-पिण्यात काही कमतरता पडू नये, म्हणून खाद्यपदार्थ साठवणीची जागाही मोठी असावी लागते. ‘अंटार्क्टिक ट्रिटी’चा भाग नसला तरी, अंटार्क्टिकावर खाण्यापिण्याच्या बाबतीतही काटेकोर नियमावली आहे.

यात महत्त्वाचा घटक, मानवी शरीर. आपलं शरीर हे एक यंत्र आहे. ते ठरावीक तापमानाच्या मर्यादेतच कार्यक्षम राहतं. शारीरिक तापमान 95 फॅ.च्या खाली, अगर 105 फॅ.च्या वर गेलं की, हे राम! शारीरिक तापमान वाढलं, की उष्माघाताला तोंड द्यावं लागतं, तसंच ते घटलं की शीताघाताची म्हणजे, हायपोथर्मियाची समस्या निर्माण होते. शीताघात ही शारीरिक ऊर्जा घटण्यामुळं निर्माण होणारी समस्या. अन्नसेवनामुळं आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होत असते. शरीर ही ऊर्जा वापरतही असतं. चलनवलन, श्वासोच्छ्वास अशा आपल्या नेहमीच्या शारीरिक कार्यांत ती कामी येते. ही खर्ची पडणारी ऊर्जा निर्माण होणार्‍या ऊर्जेपेक्षा जास्त असेल, तर हायपोथर्मियाची बाधा निर्माण होते. याला ‘निगेटिव्ह थर्मल बॅलन्स’ असंही म्हटलं जातं. शारीरिक ऊर्जेत घट झाली, तर शरीर थंडावतं आणि चलनवलन तथा चयापचय (मॅटॅबोलिझम) कार्यांत बाधा येते. अशा कार्यांस्तव भारतातल्या हवामानात दररोज 2000-2200 कॅलरींचं अन्नसेवन पुरेसं होतं.

तथापि अंटार्क्टिक हा पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेश. पार्‍याचा काटा शून्य सेल्शियच्या खालीच असतो. इथल्या उन्हाळ्यात अंतर्गत भूमीवर तापमान उणे 30 से.पर्यंत घसरतं, तर हिवाळ्यात ते उणे 80 ते उणे 70 पर्यंत घसरतं. पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान अंटार्क्टिकावरील रशियन स्टेशन व्होस्टोकवर नोंदवलं गेलं, ते होतं, उणे 89 से. अशा वातावरणात शारीरिक चलनवलनासाठी अधिक ऊर्जेची गरज भासते. रोज 4000 ते 5000 कॅलरींचे अन्नपदार्थ खाण्याची सूचना आम्हाला देण्यात आली होती.

तथापि हायपोथर्मिया हा केवळ वातावरणीय तापमानाचा परिणाम नव्हे. हा चिलिंग, म्हणजे वातावरणीय तापमान आणि वार्‍याचा वेग यांचा एकत्रित परिणाम होय. अंटार्क्टिक जसा गोठवणार्‍या थंडीचा प्रदेश, तसाच तो भन्नाट वार्‍यांचाही. मुंबईहून समुद्रात 200 कि.मी.वर, ताशी 80 कि.मी.चं वादळ घोंघावणार आहे, अशी वार्ता ऐकली की, घाबरगुंडी उडते. इथे हे वारे नित्याचेच. ताशी 200-300 कि.मी. वेगाचे वारे म्हणजे इथे वादळ. वातावरणीय तापमान घटलं आणि त्याच वेळी वार्‍याचा वेग वाढला, तर परिणामात्मक तापमानात (इफेक्टिव्ह टेंपरेचर) लक्षणीय घट होते. सजिवांना तोंड द्यावं लागतं ते या परिणामात्मक तापमानाला. वातावरणीय तापमान 0 अंश से. असेल (यापेक्षा अधिक तापमान अंटार्क्टिकावर कधी नसतं.) आणि ताशी 50 कि.मी. वेगाचे वारे वाहात असतील, (अंटार्क्टिकावर वार्‍याचा सरासरी वेग ताशी 70 कि.मी. असतो.) तर परिणामात्मक तापमान उणे 20 अंश से. असतं. आणि हेच आकडे अनुक्रमे उणे 50 अंश से. व ताशी 60 कि.मी. असतील तर परिणामात्मक तापमान उणे 100 अंश से. असतं.

कमी खाणं-पिणं त्यातच अतिश्रमाची भर पडली, की शरीराची ऊर्जा पुरवण्याची क्षमता घटते आणि माणूस हमखास हायपोथर्मियाचं सावज बनतो. आम्हाला तर स्टेशन बांधणीसारखं श्रमाचं काम करायचं होतं, शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही गोड पदार्थांवर ताव मारत होतो. मी मूलत:च मिष्ठान्नांचा प्रियकर असल्यामुळं माझ्यासारख्याची चैन होती (आणि असा बकासुरासारखा उभा-आडवा हात मारू नका, म्हणून आवर घालणारी प्रिय पत्नी सोबत नसल्यामुळं, प्रिय पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता येत होता.) रोज किलो-सव्वा किलो आइसक्रीम हा त्या वेळी माझा आवडता बकासुरी आहार होता. अशा थंडीत आइसक्रीम?

शीताघातात शारीरिक तथा मानसिक दोन्हीही संतुलन बिघडू शकतं. विचार करण्याची क्षमता मंदावते. विस्मरणही वाढतं. आमच्यातल्या काही जणांना स्वत:च्या घरचे पत्ते, अगर दूरध्वनी क्रमांक आठवण्यासाठी श्रम पडायचे. प्रयोगासाठी मी सज्ज व्हायचो. काही वेळा सोबत काय साहित्य घ्यायचं, याचं विस्मरण व्हायचं. यदा कदाचित हायपोथर्मियाचा आघात झालाच, तर मृत्यू अटळच. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, हे मरण यातनाहीन असतं. माणसाच्या नकळत यमाचे फास आवळले जातात. असं काही अघटित यातनाहीन घडू नये, म्हणून भरपूर अन्नसेवन अनिवार्य असतं. आवश्यकतेपेक्षा कितीतरी, अन्नपदार्थ सोबत घेतले जातात. आमच्या सोबत आम्ही शेकडो टनांनी अन्नपदार्थ घेतले होते. अंटार्क्टिका हा नैसर्गिक फ्रिझच असल्यामुळे अन्नपदार्थ खराब होण्याची भीती नसते.

अगदी शेकडो वर्षेदेखील ते जसेच्या तसे राहू शकतात. (नैसर्गिक फ्रिझचा हा गुणधर्म कचर्‍यांबाबतीत बाकी दुर्गुण ठरतो. आपल्या शारीरिक विष्ठांनाही तिथं अमरत्व प्राप्त होतं. त्यांची विल्हेवाट हा महत्त्वाचा कार्यभाग असतो.) त्यामुळं सोबत पुरून बरंच उरेल, एवढं अन्न घेतलं जातं. एवढंच नव्हे तर, तात्पुरत्या निवार्‍यांत अन्नपदार्थ सोडून जाण्याचा अलिखित नियम पाळला जातो. समजा, कुणी चुकलेला प्रवासी तिथं आलाच तर त्याची अल्पकालीन तरी आबाळ होऊ नये. ऐन वेळी अन्नाची कुमक मिळाल्यामुळं मृत्यूपासून बचावलेल्या वीरांच्या कथा आहेत. तसंच अन्नाअभावी हायपोथर्मियांनी मृत्यूस कवटाळलेल्या वीरांच्या अनेक कथा अंटार्क्टिक मोहिमांत घडलेल्या आहेत. त्यात कॅप्टन स्कॉटची कथा चटका लावून जाणारी आहे...