आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारा फोफावला,दर्या उफाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहाज ४० दक्षांशावर आलं की, डेक बरॅकेट्सनी बंद करण्यात येतात. डेकचे दरवाजे बंद करण्यात येतात. सुरक्षेच्या दृष्टीने कुणालाही डेकवर जाऊ दिलं जात नाही. जहाज चांगलंच हेलकावे खात असतं. तोल सांभाळणं अशक्य होतं. मला एका जुन्या भावगीताची आठवण झाली. ‘वारा फोफावला दर्या उफाळला, माझं ग तारू कसं सवारू सजना समिंदरा...’ त्याबरोबर एका विचाराने डोक्यात घर केलं. अशा मृत्यूशी झुंज देणार्‍या तुफानात एखाद्या नावाड्याला गीत सुचतं कसं? आमचं जहाज काही छोटं तारू नव्हतं. चांगलं लाख टन वजनाचं होतं. तरीदेखील त्याची अवस्था गीताला साजेशीच झाली होती. जहाजावर काहीही स्थिर राहत नव्हतं. टेबल, खुर्ची, क्रोकरी, प्रयोगाची उपकरणं सारं घट्ट बांधून ठेवावं लागायचं. माणूसच काय तो तोल सांभाळत सुटा. घट्ट बांधलेल्या डिशमधला घास तोंडातच जातोय, ही कसरत करत उदरभरण करणारा. गंमत म्हणजे, अशा दोलायमान परिस्थितीत मी टेबल टेनिसचे धडे घेत होतो. बॉल उडवणार्‍या त्या फळीला बॅट म्हणायची की रॅकेट, हा संभ्रमदेखील दोलायमानच. घट्ट बांधून ठेवलेल्या टेबलावर मला हे धडे देत होता, फिल्म्स डिव्हिजनचा फोटोग्राफर शंकर पटनाईक. या दोलायमान सफरीत त्याचीच साथ मला मिळत होती.

माझे काही वातावरणासंबंधीचे वैज्ञानिक प्रयोग होते. हवेची सँपल्स जमा करणारी माझी यंत्रणा (मोठे पंप) जहाजाच्या अग्रभागी होती. पिछाडीस जहाजाच्या एक्झॉस्टचा धूर असायचा. स्वच्छ किंवा नैसर्गिक सँपल्स अग्रभागीच मिळत होती. दिवसातून सहा ते आठ सँपल्स जमा करावी लागत. त्यासाठी डेकवरच नव्हे, तर अगदी अग्रभागी जावं लागे. हे अंतर सुमारे १५० मीटर होतं. एरवी प्रश्न नव्हता, पण तुफानात हे अंतर काटणं आव्हानच होतं. त्यातून जहाजाचा कप्तान मला एकट्याला डेकवर जाण्याची परवानगी देत नव्हता. कोणीतरी साथीदार हवा होता. शंकर तयार झाला. एकमेकांना दोर बांधून आम्ही जहाजाच्या अग्रभागी जात होतो. हवेचं सँपल कागदी फिल्टरवर जमा करत होतो.

तुफानाच्या मार्‍यात तो फिल्टर उडून जाणार नाही, खराब न होता सँपल बॅगमध्येच जमा करता येईल, यासाठी यातायात करत होतो. तर याच दरम्यान आपला मोठा मुव्ही कॅमेरा सांभाळत शंकर छायाचित्रीकरणाच्या थ्रिलचा आनंद (?) लुटत असे. कितीही झालं तरी एक थ्रिल आम्ही दोघंही मुद्दामहून अनुभवत होतो. त्या झंझावाताला तोंड देत अग्रभागी दोन-चार मिनिटं तरी उभं राहत होतो. ‘टायटॅनिक’ चित्रपटातला असा प्रसंग आनंददायी असला, तरी थ्रिलबाबतीत तो किरकोळीतलाच वाटत होता. त्यानंतर ‘साठीचे भोग’. जहाज ६० द. अक्षांशावर पोहोचतं. इथून पुढचा समुद्र गोठलेला असतो. बर्फ फोडत फोडत जहाज मार्गक्रमण करत असतं. आणिक एक इंजिन लावून धडका देऊन बर्फ फोडत हा प्रवास चाललेला असतो. या तोडफोडीच्या आवाजाने आणि २४ तास बसणार्‍या धक्क्याने झोपेचं खोबरं होतं. ‘एव्हरी अ‍ॅक्शन हॅज ए रिअ‍ॅक्शन’ न्यूटन साहेबांना नियम करायला काय जातं! या नियमाचा जाच आम्हाला भोगावा लागत होता. असं सुमारे एक हजार कि.मी.चं अंतर काटावं लागतं. हा प्रवास साधारणपणे दहा दिवसांचा असतो. जहाजाचा वेगही मंदावलेला असतो. साधारणपणे तो ताशी तीन-चार कि.मी. म्हणजेच माणसाच्या मंद चालीइतका असतो. त्यापेक्षा चालत गेलेलं काय वाईट? हा विचारही शिवून जातो. तथापि चालतच काय, पोहतही जाता येणार नाही, अशी परिस्थिती असते. हा शीतसागर.

सागराचं पाणी गारेगार (५ से.पेक्षाही कमी). समजा, कुणी चुकून या पाण्यात पडलाच तर १०-१५ मिनिटांपेक्षा जास्त काळ तग धरू शकणार नाही. (म्हणूनच ‘टायटॅनिक’ चित्रपटात अशा पाण्यात चाललेली मारामारी आणि इतर प्रकार पाहताना ऑस्करविनर चित्रपटदेखील वास्तवतेपासून दूर असू शकतो, याचा प्रत्यय आला.) भारताच्या एका मोहिमेत हेलिकॉप्टर अशा पाण्यात पडलं होतं. काही मिनिटांतच दुसर्‍या हेलिकॉप्टरने या लोकांची सुटका शिताफीने केली.
अंटार्क्टिकाचं आकारमान (क्षेत्रफळ) किती? हा प्रश्न मला अनेक जणांनी विचारलेला. अंटार्क्टिकाचं किमान क्षेत्रफळ हे भारताच्या चौपटीहूनही जास्त आहे. इथं किमान हा शब्द वापरण्याचं कारण आहे. अंटार्क्टिकाचं क्षेत्रफळ बदलत असतं. याला ‘पल्सेटिंग एरिया’ म्हणतात. हिवाळ्यात समुद्र गोठतो, तेव्हा हा आकार दुपटीने वाढलेला असतो. आमची मोहीम चालली होती, ती किमान क्षेत्रफळाच्या काळात. तरीदेखील या प्रवासात काही धोके डोकं वर काढतच होते.