आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कहाणी दक्षिण गंगोत्री तळाची...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साल 1981. अंटार्क्टिक मोहिमेचं निश्चित झाल्यानंतर दिल्लीत हालचाली सुरू झाल्या. पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यात विशेष लक्ष घातलं. यासाठी जुलै (1981) महिन्यात खास विभाग उघडण्यात आला. पहिल्या मोहिमेचं नेतृत्व डॉ. एस. झेड. कासिम यांच्याकडे सोपवण्यात आलं. तेव्हा ते महासागर विकास खात्याचे(ऊडऊ) सचिव होते. अंटार्क्टिक मोहिमेचा अनुभव असलेली माणसं भारताकडे नव्हती. तसंच शीतसागरात बर्फ फोडत मार्गक्रमण करणारं जहाजही आपल्याकडे नव्हतं. अंटार्क्टिकात नेहमी जाणार्‍या एखाद्या देशाकडून ते मिळू शकत होतं. या सगळ्याची माहिती गोळा करून मोहीम आखणं गरजेचं होतं. हे सर्व गोपनीयतेने व्हावं, असं वाटलं.
या मोहिमेची फाइल बनवण्यात आली. तिचं नामकरण ‘दक्षिण गंगोत्री’ असं करण्यात आलं. त्यामुळं ही फाइल अंटार्क्टिकसंबंधात आहे, असा कुणाला संशय आला नाही. आपल्या वैज्ञानिकांचे अंटार्क्टिकाचे भरपूर अनुभव असलेल्या युरोपीय देशांचे दौरे सुरू झाले. अंटार्क्टिक वातावरणाला योग्य असा आहार, पोशाख, निवारा, तसेच अंटार्क्टिक पर्यावरणासंबंधित आवश्यक माहिती जमा करण्यात आली. परंतु सारं काही गोपनीयतेनं. बर्फ फोडणारं जहाजही भाड्याने मिळवण्यात आलं. मोहिमेसंबंधित गुप्तता राखण्याची अट जहाज कंपनीला घालण्यात आली.
1981 च्या नोव्हेंबरअखेरीस डॉ. कासिम यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेस प्रारंभ झाला. शीतसागराचा प्रथमच अनुभव घेणार्‍या भारतीयांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. अखेर 9 जानेवारी 1982 रोजी या धाडसी मोहिमेची फत्ते झाली. अंटार्क्टिकावर तिरंगा फडकला. हा सुवर्णाक्षरांत लिहिण्याचा ऐतिहासिक क्षण आणि तो तसा लिहिला गेला. दिल्लीला डीओडी ऑफिसच्या प्रांगणात या मोहिमेतील सदस्यांची नावं सुवर्णाक्षरांत कोरली गेली. अंटार्क्टिकावर तिरंगा फडकला गेल्यानंतरच इंदिरा गांधी यांनी या नेत्रदीपक यशाची जाहीर घोषणा जगापुढे केली. ‘आधी केले, मग सांगितले’ अशी ती कृती होती. अंटार्क्टिक प्रदेशात पहिल्या मानवाने 1773 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर तब्बल 208 वर्षांनी भारताने हे यश संपादन केलं; तरीदेखील अंटार्क्टिकात प्रवेशणारं भारत हे सतरावं राष्ट्र आहे, हेही नसे थोडके.
भविष्यातील मोहिमा, वैज्ञानिक अभ्यास यांच्या नियोजनासाठी ‘इंडियन नॅशनल कमिटी ऑन अंटार्क्टिक’ची स्थापना करण्यात आली. अंटार्क्टिक स्टडी ग्रुप हा या कमिटीतील शास्त्रीय गट. मोहिमेतील अभ्यासाचे विषय निश्चित करण्याचं काम या ग्रुपकडं असतं. झालेल्या संशोधनाचं मूल्यमापन कमिटी करत असते. त्यानुसार भविष्यातील अभ्यासाचे विषय ठरवले जातात. त्या त्या विषयातील तज्ज्ञांना त्यास्तव पाचारण करण्यात येतं.
दुसरी मोहीम 1983च्या अंटार्क्टिक उन्हाळ्यात तिथं गेली. उन्हाळी मोहिमेत निवार्‍याची फार मोठी समस्या नसते. तात्पुरते तंबू किंवा कुटीरं (अंटार्क्टिकावर तग धरणारी) बांधून राहता येतं. तथापि हवामान तसेच इतर काही वातावरणीय अभ्यास हा सतत वर्षभर करावा लागतो. तेव्हा हिवाळ्यातही काही वैज्ञानिकांना अंटार्क्टिकावर मुक्काम ठोकणं आवश्यक असतं. त्यासाठी अंटार्क्टिकावर भक्कम सुरक्षित तळ (स्टेशन) असणं जरुरीचं होतं. शास्त्रीय संशोधनासाठी कायमस्वरूपी तळाची आखणी केली गेली आणि 1984मध्ये तिथे पोहोचलेल्या पथकाने अंटार्क्टिकावर तळ उभारला. त्याचं नामकरण ‘दक्षिण गंगोत्री’ असं करण्यात आलं. वैज्ञानिकांचं हिवाळी पथक तिथं अभ्यासासाठी रुजूही झालं. त्यानंतर भारताचं एक उन्हाळी पथक आणि एक हिवाळी पथक दरवर्षी अंटार्क्टिकावर पाठवलं जाऊ लागलं. उन्हाळी पथकाचा कालावधी सर्वसाधारणपणे चार महिन्यांचा असतो, तर हिवाळी पथकाचा 16 महिन्यांचा.
‘दक्षिण गंगोत्री’ हा भारताचा अंटार्क्टिकावरील पहिला तळ. या स्टेशनचा पाया बर्फ होता. सारा बर्फाळ प्रदेश. नित्य कामासाठी लागणारं पाणीदेखील बर्फ वितळवून मिळवलं जाई. स्टेशनांतर्गत उष्णतेसाठी हीटर्स होते. डिझेल जनरेटरने वीज मिळवून स्वयंपाक, दिवाबत्ती, शास्त्रीय प्रयोग यांसाठी तिचा वापर केला जाई. त्यामुळे स्टेशनांतर्गत उष्णता निर्माण होऊन पायाचा बर्फ वितळला. परिणामत: स्टेशन हळूहळू बर्फाखाली गाडलं गेलं. आम्ही 1988मध्ये या तळावर गेलो तेव्हा ‘दक्षिण गंगोत्री’चं छतच काय ते बर्फावर उठून दिसत होतं. ते ओळखता यावं म्हणून रंगवलं गेलं होतं. बाहेर खिडकीवजा दरवाजा होता, त्यातून स्टेशनात प्रवेशता यायचं. 20-25 फूट खाली गेलं की सर्व सोयींनी सुसज्ज असं स्टेशन. हे स्टेशन मुळात कसं होतं, ते फोटो आम्ही पाहिले होते. त्याला चांगलाच छेद गेला.
‘दक्षिण गंगोत्री’ हे फार काळ निवासासाठी वापरता येणार नाही, याची जाणीव नियोजकांना झाली. फार फार तर साठवणीचं कोठार म्हणून त्याचा वापर करता येईल. कायमस्वरूपी नवीन स्टेशन बांधणं अगत्याचं होतं. तळाचा पाया खडक असेल तर त्याचं आयुष्य भरपूर असेल, हा विचार पक्का झाला. त्या दृष्टीने हालचालींनी वेग घेतला. सातव्या उन्हाळी मोहिमेत सर्व दृष्टीने समाधानकारक अशी जागा गवसली आणि आमच्या आठव्या उन्हाळी मोहिमेचं उद्दिष्ट निश्चित झालं, या जागी भारताचं कायमस्वरूपी स्टेशन उभारणं...