आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे संसार संसार...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋतुमान आणि घरबांधणीबाबतीत एक दंतकथा सांगितली जाते. ऐन वसंतात मुंगी वारूळ बांधण्याच्या खटपटीस लागते. दुसरा कीटक टोळ. टोळभैरवच तो. तो मुंगीची टिंगल करू लागतो- वसंताचा आनंद लुटायचा सोडून हे भलतंच काय आरंभलंस? वसंत सरतो, पावसाळा सुरू होतो. बर्‍याच कीटकांना जिणं मुश्कील होतं. मुंग्या आपल्या वारुळात सुरक्षित जीवन जगत असतात.
भारतीय पठारावर सर्वसाधारणपणे बहुतांश ठिकाणी घरटी बांधण्याची सुरुवात वसंताच्या आगमनाबरोबर होते. मोसमी पावसाळ्यापूर्वी आपल्या पालकत्वाची जबाबदारी पूर्ण करण्याचा उद्देश त्यामागे असतो. दक्षिण भारतात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर साधारणपणे एक महिन्याने उत्तर भारतात मान्सून दाखल होतो. घरट्यांचा काळ त्यानुसार बदलत जातो. उत्तर भारतात एक वेगळीच समस्या असते. हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे या भागातील बर्‍याच नद्या उन्हाळ्यात दुथडी भरून वाहू लागतात. त्यामुळे उत्तर भारतातील मोठ्या नद्यांच्या तीरी अगर पुळणीत घरटी करणार्‍या पक्ष्यांपुढे मोठे आव्हान उभे राहते. पूर येण्यापूर्वीच घरोंद्याची कामे आटोपणे भाग असते. त्या दृष्टीने जुळवाजुळव करण्यात पक्षी गर्क असतात.
वसंत! ‘वसंत वसंत आला, हासत नाचत खेळत आला.’ वसंत आगमन म्हटलं की, आंब्याची सय येणारच. आंब्याच्या डहाळ्या, गवत, मुळ्या यांत छपलेली घरटी लाल डोक्याच्या मर्लिन पक्ष्याची असू शकतात. डौलदार शाहिन पक्ष्याची बात औरच. त्याला कुणाची भीती? गवताळ कड्याच्या माथ्यावर तो निवांतपणे आपला विणीचा कारभार सांभाळत असतो. राघू-मैना थोडेसे दक्ष असतात. झाडाची उंच डहाळी ते पसंत करतात. रानकोंबड्यांची उडान एवढी उंच नसते. त्या बिचार्‍यांना अडचणीच्या जागांचा शोध घ्यावा लागतो. वाळक्या पानांच्या गर्तेतही त्यांना सुरक्षितता गवसू शकते. भटतितर हा कोरड्या प्रदेशातील द्विज. यालादेखील सुरक्षितता गवसते अडचणींच्या जागी, दगडांच्या खोबणीत. एकदा तो तिथं डेरेदाखल झाला की ‘भटाला दिली ओसरी’ ही म्हण वास्तवात येते. हुप्पी पक्षी म्हणजे रंगबहार. झाडाची उंच डहाळी किंवा भिंतीतल्या खोबणीत त्याचा सोहळा रंगत असतो. खंड्यादेखील रंगीबेरंगी पक्षी. पाण्याच्या ठिकाणी रमणारा. भर वसंतात जलप्रवाह तेवढे मुबलक नसतात. तथापि, एखाद्या ओहोळाकाठी वा चिखलांच्या बिळात खंड्याचा ‘अरे संसार संसार’ आढळून येतोही. हवेतल्या हवेत गिरक्या मारणारा हवाई वेडा राघू पाणथळीपासून थोडं दूर खडकांच्या खोबणीत अगर झाडाच्या ढोलीत निवार्‍याला येतो. इवलीशी वेडी मैना बाकी ओहोळाकाठीच संसार थाटणं पसंत करते. मातीचे ढिगारे ही तिची घरकुलं असतात. सुतार, नाचण, व्हिसलिंग थ्रश, कोतवाल, सूर्यपक्षी, नाचण, बुलबुल, यांची अंगाई गीतं झाडांवरच बहरत असतात. कोकीळ कुहू कुहू बोलत असला तरी रहिवास आयत्या बिळावर... तो स्वत: कधीच घरटं बांधत नाही. इतर पक्ष्यांनी बांधलेल्या घरट्याचा ताबा घेतो, सहसा कावळ्याच्या घरट्याचा. जिथं कावळे नसतात तिथं कोकीळ आढळत नाही, असं काहींचं निरीक्षण आहे.
पावसाळा हा सहसा छोट्या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम. नारिंगी काळी आणि निळी लिटकुरी म्हणजे पक्षी जगतातील अटकर बांध्याचं इवलंसं सौंदर्य. त्यांची वीण न्याहाळणं तसं कठीणच. छोटी झुडपं, बांबू पत्तीचे ढिगारे, अशा जागी ती निर्विघ्नपणे चालू असते. निर्झराकाठी झाडाझुडपांत शिंपी, फुलटोचे, बाया, फुटके, बगळे, सूर्यपक्षी, इत्यादींची घरटी हे वर्षावैभव. सह्यपट्ट्यात ठिकठिकाणी हा नजारा अनुभवता येतो. दर्‍याखोर्‍यांतून गवताची वेटोळी, शेवाळी अगर दलदलीत पाणकोंबडीचा हाच कार्यक्रम सुरू असतो. सागर किनारी अगर बेटांवरील उथळ पुळणीत पारशीणबाई म्हणजे पारशी कुकरी या कार्यात व्यग्र असते. थोडं दूर डोंगरकपारीत मार्टिन आणि पाकोळ्यांचे ममता, घरोंदा वगैरे चित्रपट झळकत असतात. वड, पिंपळाच्या झाडावर बुलबुलांच्या वसाहती दिसून येतात.
मोसमी पावसाचा जोर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत असतो. या काळात सार्‍या धरित्रीचं रूप म्हणजे, ‘हिरवे हिरवे गार गालिचे’. हिरवाईने सजलेली वसुंधरा. गवत, झाडीझुडपं, वेली यांचं साम्राज्य. कीटक हे पक्ष्यांचं मुख्य अन्न. या ऋतूत कीटकांची पैदास मुबलक असते. पिलांना भरवण्यासाठी पक्ष्यांना फारशी तोशीस घ्यावी लागत नाही. घरट्यातून बाहेर काढून पिलांना स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवण्याचा हा काळ. ही शाळा पाणथळी काठी गवत काड्यांची असू शकते. एखादा काळा करकोचा आपल्या पिलांचे वर्ग घेताना दिसू शकेल. अगर अशाच गवताळ भागात इवलीशी स्पॉटेड मुनिया शिक्षिकेच्या भूमिकेत अवतरलेली आढळेल. हे खास शारदीय वर्ग. आपल्याकडेही ‘ग म भ न’ला शरदात सुरुवात करण्याची परंपरा होतीच की...