आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंझील दूर नही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किती वाजले?’’ सुब्बारावचा निरर्थक प्रश्न.
‘‘अकरा वाजून गेलेत.’’ निरुत्साही उत्तर.
पायांनी कितीही निदर्शनं केली, तरी थांबून चालणार नव्हतं. हुसेनच्या नकाशानेही दगा दिला नव्हता. मार्गात असे अवाढव्य खाचखळगे आहेत, एवढंच त्या नकाशाने दाखवलं नव्हतं. पुढं एक मोठं तळं लागलं. हुसेनांच्या जिवात जीव आला. ‘इथून कँप साइट फारशी दूर नाही.’ त्यांनी दिलासा दिला. तळं पार करणं भाग होतं. तो दोन एक कि.मी.चा फेरा होता. मध्ये दोन डोंगर होते. ते पार करणं एवढंच काय ते दिव्य. त्यात भास्कर 24 तास सोबतीला होता, ही जमेची बाजू. हा भास्कर थंडीपासून आमचा बचाव करू शकत नव्हता, हेही खरं.

बारा वाजले होते. आमचेही. वज्रसदृश खडकांवर उड्या मारून पाय भरून आले होते. थकवा जाणवत होता. यातना होत होत्या. परंतु पुढं जाणं क्रमप्राप्त होतं. हायपोथर्मियाने अंटार्क्टिकावर बरेच जण दगावले, हा इतिहास आठवला. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला कुणी भेटला नाही, तरी हे मरण सुखावह यातनाहीन असतं, हे ऐकलेलं. यातनाहीन काही अघटित घडण्याला यातना सहन करणं, हाच एक पर्याय आमच्यापुढं होता. काही वेळाने जनित्राचा अस्पष्ट आवाज ऐकू आला. म्हणजे, ‘मंजिल बहुत दूर नहीं.’ कँप दिसला नाही तरी तो आवाज बुडत्याला काडीचा आधार वाटला.

आता अन्नसाठ्याला हात लावायला काही हरकत नसावी. तरीदेखील थोडं सावधानीचं धोरण. फक्त एकच चॉकलेट चौघात फस्त केलं. ‘वेळप्रसंगी’ म्हणून एक शिलकीत ठेवलं.

पृथ्वी आपल्या गतीने फिरत असते, तसंच घड्याळ आपल्या गतीने फिरत होतं. दीड वाजून गेला होता. एका शिळाखंडावर उभे होतो. आमचा कँप नजरेच्या टप्प्यात आला होता. त्याचबरोबर आमची उमेदही वाढली. दोन विचारांनी डोक्यात घर केलं. आता अन्नसाठ्याची काय जरुरी आहे? शिलकीतल्या चॉकलेटचा तुकडा प्रत्येकाने उतावीळपणे पोटात ढकलला. दुसरा विचार, तासा-दीड तासात आम्ही आमच्या माणसांत जाणार होतो. त्यांची मन:स्थिती कशी असेल?

हा विचार डोक्यात येईपर्यंत डोक्यावर घर्रघर्र आवाज आला. हेलिकॉप्टरने आम्हाला टिपलं होतं. हे काम योग्य वेळी का झालं नाही? बहुधा निसर्गाला आम्हाला ट्रेकिंगचा भन्नाट आगळा अनुभव द्यावयाचा असावा. एका सपाट खडकावर हेलिकॉप्टर उतरलं. दोन पावलं टाकायचं त्राण नसलेल्या पायांत कुठून बळ आलं कुणास ठाऊक, त्या खडक राशीवरून 100 मीटर धावत आम्ही हेलिकॉप्टर गाठलं. आमच्या मोहिमेचा नेता, डॉ. अमिताव सेनगुप्ताने आमचं सुहास्य वदनाने स्वागत केलं. (अमितावला मुद्दामहून हसावं लागत नाही. त्याचा चेहराच तसा आहे.) आम्ही हेलिकॉप्टरारूढ झालो. बोलण्यातून समजलं, हेलिकॉप्टर आमचा दुसर्‍या भागात शोध घेत होतं. (बरं होतं, म्हणजे त्या काळी टीव्ही चॅनल्सच्या पिकांनी जोम धरला नव्हता. स्पेशल बुलेटिनचं दळण दळण्यासाठी त्यांना विषय मिळाला असता!) हेही समजलं, कँपवरचे सर्वजण चिंतेत आहेत. कर्नल जगन्नाथननी एक एसओएस पथक बनवलं होतं. डॉ. वेंकटनी वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवली होती. पाचच मिनिटांत आम्ही आमच्या माणसांत आलो. आमचा मृगजलवास संपला होता. सर्वांनी आमचं जल्लोषात स्वागत केलं. ‘नेमकं काय झालं? कसं झालं?’ ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता. आम्ही बाकी, धूम पळत सुटलो. मेस हट गाठली. तोंड उघडलं ते काहीतरी गिळण्यासाठी!