Home | Magazine | Rasik | prakash-joshi-sundarban-khalfuti

सुंदरबन, खारफुटी आणि वसुंधरा

प्रकाश जोशी, केंद्र शासनाच्या अंटार्टीका मोहिमेतील संशोधक | Update - Jun 02, 2011, 01:20 PM IST

जागतिक वसुंधरा दिन 'नेमेचि येतो...' थाटात तो साजरा केला गेला. एका पर्यावरणतज्ज्ञाच्या व्याख्यानाचा योग आमच्या भाळी होता. ते खारफुटी वनांवर बोलत होते. सारांश साधारणपणे असा-

 • prakash-joshi-sundarban-khalfuti

  नदीचे पाणी समुद्राला मिळते तेव्हा त्या खाऱ्या गोड्या पाण्याच्या मिश्रणावर काठाला मॅंग्रोव्ह वने फोफावतात. त्यावर कीटकांची अमाप उत्पत्ती होत असते. त्यावर मासोळया, मोठे मासे असे अनेक जलचर पोसले जातात. सामुद्रिक जीवसृष्टीचे चक्र मूलत: वनस्पतीवर अवलंबून असते. मानवाला उपयुक्त अशा मध, लाकूड, जलचर, मेण, टरपेंटाईन, कार्बोहायड्रेटस् आदी अनेक गोष्टींनी ही वने समृद्ध असतात. तसेच वाघ, कोल्हे, हरणे, मगरी, पाणमांजरे, सरपटणारे प्राणी, अशा अनेक जीवांना ही वने आधारवत असतात. मुख्य म्हणजे चक्रीवादळे, पूर, भरती-ओहोटी, त्सुनामीसारखे प्रलय यापासून मुख्य भूभागाची बचाव कवचे म्हणून या वनांचा महिमा अनन्यसाधारण आहे. अनुपयुक्त झुडपे समजून या वनांची वारेमाप तोड झाली, त्यावर नागरी वसाहती आणि कारखाने, उद्योग उभे राहिले. या वनांचे जतन मुंबई परिसरात केले गेले असते तर २६ जुलै २५ ला मुंबईत जो जलप्रलय झाला त्याची तीव्रता बरीच कमी झाली असती. - हा सारांश त्या तज्ज्ञाच्या भाषणाचा नसून मी या विषयावर बोलतो तेव्हा हेच सांगत असतो. भाषणातील मुद्दे सर्वांनाच पटतात. आज मस्तकात 'वसुंधरा... वसुंधरा' शब्द घर करून राहिला होता.


  वाटत होतं, या भाषणात वसुंधरेच्या हिताची कितपत कळकळ आहे? की पर्यावरणतज्ज्ञ (माझं तर कामच पर्यावरणशास्त्राशी निगडित होतं) देखील मानवी हित डोळयांसमोर ठेवून आपली फिलॉसॉफी मांडत असतो? बोलण्याच्या ओघात ठाणे खाडीत या वनांची थोडीफार वृद्धी झाली आहे असं ते तज्ज्ञ बोलून गेले. परिणामत: फ्लेमिंगो पक्ष्यांची वर्दळ या वनांत वाढली. पक्षीप्रेमींसाठी ही गोष्ट आनंदाची असली तरी पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब चिंतनीय आहे.त्यांच्या या वक्तव्याने सारी सभा दिग्मूढ झाली. त्यावरचं त्यांचं समर्थन बरोबरच होतं. ते म्हणाले होते, ठाणे खाडीत सर्व बाजूंनी नद्यांची खोरी आहेत. या नद्यांचे पाणी खाडीत येत असते. पाण्याबरोबर गाळ येतो. खाडी गाळाने भरते. खाडीची खोली कमी होते. आसपासच्या वसाहती, जलवाहतूक यांच्या हिताची ही गोष्ट नव्हे. मुद्दा एकदम पॉईंटशीर. परंतु त्याने मला पुन्हा विचाराला उद्युक्त केले. वसुंधर दिनीदेखील आपण माणसाच्याच हिताचा विचार करतो का? वसुंधरेला काय हवंय? की मानवाच्या इच्छेनुसार वसुंधरेने वागायला हवे? पर्यावरणप्रेमींना काय अपेक्षित आहे? या दृष्टीने मॅंग्रोव्ह वनांच्या निर्मितीतील त्रिभुज प्रदेश आपण विचारात घेऊ. नदी जिथे सागरास मिळते तिथे तिच्या मुखाशी गाळाचा प्रदेश तयार होतो. गाळांनी निर्मिलेल्या भूमीत महत्त्वाचा त्रिभुज प्रदेश. ग्रीक लिपीतील डेल्टा या अक्षराशी सोयरीक जुळवणारा. तीन भुजांचा म्हणून त्रिभुज. असा प्रदेश तयार होण्यास काही भौगोलिक कारणे आहेत. नदीच्या मुखाशी उतार कमी असेल तसेच प्रवाहाचा वेगदेखील संथ असेल तर सर्व गाळ वाहून जाऊ शकत नाही. मग पात्रातच गाळ साचतो आणि नदीचे मुख भरून येते. समुद्र समर्पणासाठी उत्सुक प्रवाह दुसरा मार्ग शोधतो. कालांतराने हे मुखदेखील भरून जाते. प्रवाहाला तिसरा मार्ग अवलंबावा लागतो. अशा पद्धतीने नदी बहुमुखी बनते. नदीचे असे अनेक मुखप्रवाह प्रस्थापित होतात. त्रिभुज प्रदेशातील जमीन सखल असते.
  गंगेचा सुंदरबन त्रिभुज प्रदेश
  सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीपासून २ मीटर्सपेक्षाही कमी उंचीचा हा भाग असतो. तरीदेखील सर्व नद्यांना त्रिभुज प्रदेश नसतो. अमॅझोन नदीचा वेग मुखाशी एवढा प्रचंड आहे की तिचा प्रवाह ५ कि. मी. पुढं समुद्रात वाहतो. त्यामुळे गाळ साचण्याची शक्यताच नसते आणि म्हणून त्रिभुज प्रदेश निर्मिती होऊ शकत नाही. गाळाचं प्रमाण, मुखाशी समुद्राची खोली आणि प्रवाहाचा वेग, पावसाचं प्रमाण आणि जलवाहन क्षेत्राची वैशिष्ट्य या घटकांवर त्रिभुज प्रदेशाची निर्मिती अवलंबून असते. जगातील सर्वात विस्तीर्ण (सुमारे ५३ हजार चौ. कि. मी.) गंगेचा सुंदरबन त्रिभुज प्रदेश होय. सुंदरबनात गाळांनी तयार झालेली अनेक बेटं आहेत. गाळांनी नवनवीन बेटं तयार होत असतात, तशी काही बेटं नष्टही होत असतात. कुणाच्या इच्छेचा प्रश्र नाही, हा निसर्ग आहे.
  इतर मॅंग्रोंव्ह वनांबाबतीतही परिस्थिती थोडीफार अशीच असते. या निसर्गनियमाला धरून मानवाने आपली जीवनशैली आखावी की वसुंधरेला मानवी नियमांत
  बद्ध करावं? प्रश्राने डोक्यात घर केलेलं. आम्ही या या अशा योजना आखल्यात, हे वसुंधरे, तुझं वर्तन
  त्याशी सुसंगत हवं. आपण वसुंधरेला तंबी देऊ शकतो का? तरी एक मूलभूत प्रश्र पाठ सोडत नव्हता : वसुंधरा म्हणजे नेमकं काय?


Trending